शिव घोडके
मियावाकी वनीकरण म्हणजे नेमके काय आहे?
ते कुठे तयार करता येईल?
त्यासाठी किती जागा आवश्यक आहे.
यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मी आवडीने अनेक प्रयोग केले. सहकाऱ्यांच्या सोबत केलेल्या प्रयोगाचा स्वअनुभव आपल्या माहितीसाठी सादर करीत आहे .
वनाचे क्षेत्र कमी होत चालल्याने पर्यावरणासाठी पृथ्वीवरील वनावरण वाढवणे आवश्यक आहे. मात्र, जागा कुठे आहे. त्यामुळेच उपलब्ध कमी क्षेत्रामध्ये जास्त वृक्षांचे आवरण आणि घनवन ( Dense Forest ) निर्माण करण्याचा प्रयोग जपानमध्ये श्री.मियावाकी या वनस्पती शास्त्रज्ञाने सुरू केला. तेथे तो चांगलाच यशस्वी ठरला. त्यानंतर जगभर तो प्रयोग आपलासा केला गेला. भारतामध्ये मुंबई आणि बंगळुरू, हैद्राबाद इत्यादी ठिकाणी हा प्रयोग यशस्वीपणे राबविला गेला आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात जालना, औरंगाबाद, हिंगोली, बीड, लातूर, पुणे, जळगाव, नांदेड अशा जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर गेल्या दोन वर्षांपासून घनवन वृक्ष लागवड करण्यात आली आहे. आनंदवन, वरोरा, चंद्रपूर या जिल्ह्यातील महारोगी सेवा समितीच्या जमिनीवर हा प्रकल्प उत्तमरित्या विकसित केला आहे .
आपणास पर्यावरणात आवश्यक असलेले जंगल क्षेत्र ३३ टक्क्यांपर्यंत नेऊन निसर्ग समतोल साधायचा असेल तर मियावाकी घनवन हा यशस्वी रोपलागवड प्रकार रिकाम्या जागी, कंपनीच्या जागेत, शासनाच्या पडीत जमीनीवर व ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये स्मशानभुमी, शाळा, पेयजल योजनेच्या टाक्या येथील परिसरात मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड केल्यास या परिसराच्या सुशोभीकरणासह आवश्यक असलेल्या ३३% जंगलाचीही कमतरता भरून निघेल. म्हणून, शहरातील अगदी छोट्या जागेवर मियावाकी घनवन राबवता यईल.
मियावाकी वनीकरणात स्थानिक झाडांचे महत्व
मियावाकी पध्दतीची सुरूवात जपानमधील वनस्पती पर्यावरण शास्त्रज्ञ व योकोहामा राष्ट्रीय विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ.अकीरा मियावाकी हे मागील ४० वर्षांपासून वनस्पती पर्यावरणाचा दांडगा अभ्यास स्थानिकरीत्या ही पद्धत वन लागवडीसाठी वापरत आहेत. जंगलनिर्मितीसाठी विविध स्थानिक प्रजातींची झाडे एका चौ.मी. मध्ये ३ ते ५ या घनतेने लावून या मियावाकी पद्धतीने जपान, अमेरिका, केनिया, भारत या देशांमध्ये कोट्यावधी रोपांची लागवड झालेली आहे. मियावाकी पद्धतीने लागवड करताना स्थानिक प्रजातींचा वापर केला जातो.
कोणताही ठराविक क्रम न राखता तर्कशुद्ध अशी अगदी दाट लागवड केली जाते.आपल्या सजीव सृष्टीचा ढासळलेला तोल सांभाळायचा असेल, तर आपण शंभर टक्के स्थानिक प्रजातींचा वापर करून वने निर्माण केली पाहिजेत, असा डॉ. मियावाकी यांचा आग्रह आहे. एक चौ.मी. मध्ये ३ झाडे, १ हेक्टरमध्ये ३०,००० झाडे अशी कमी जागेत जास्त झाडे लावता येतात.
मियावाकी वनीकरणासाठी आवश्यक घटक कोणते?
शहरी भागातील लहान जागेत तसेच जंगल क्षेत्रातील मोठ्या जागेत याची लागवड करता येते. ह्या पद्धतीने रोपांची झपाट्याने वाढ होते. घनदाट जैवविविधतेयाठी १०० % सेंद्रीय पदार्थांचा वापर करावा. मियावाकी घनवन लागवडीत स्थानिक प्रजातींची निवड करावी. वेगवेगळ्या थराप्रमाणे झुडूप, उपवृक्ष, वृक्ष व मोठी पसरणारी झाडे असे वर्गीकरण करुन रोपांची निवड करावी. जागेची सुयोग्यता, मातीचे परिक्षण जमिनीचा पोत, सेंद्रीय कार्बन, नायट्रोजन, मातीचा सामू, उपलब्ध सुक्ष्म जीवांची माहिती घेऊन मातीचे परिक्षण झाल्यानंतर मातीचे पोषणमूल्य वाढविण्यासाठी कोणत्या साहित्याची गरज आहे, हे ठरविता येते.
जमिनीचे पोषणमूल्ये वाढविणारे घटक:
- सच्छिद्र पदार्थ: – गव्हाचा कोंडा, भाताचा कोंडा, मक्याचा कोंडा, भुईमूग टरफलांचा कोंडा, इतर कृषी पिकांचा कोंडा.
- जल प्रतिधारक पदार्थ:- ऊसाचे पाचट, कोकोपीट, लाकडी भुसा.
- मृदासंवर्धक साहित्य:- कंपोस्टखत, शेणखत, गांडुळखत, लिंबोळीखत, लेंडीखत.
- आच्छादन साहित्य:- धानाचे तनस, गव्हाचे तूस, कडबा, काडीकचरा.
- सूक्ष्म जीववर्धक द्रव पदार्थ – जीवामृत, अमृतपाणी, गोमूत्र, व्हर्मीवॉश धन सूक्ष्मजीवर्धक घनपदार्थ – घन जीवामृत.
मियावाकी वनीकरण जमीन कशी तयार कराल?
- वरील सर्व सेंद्रिय पदार्थांचे जमिनीच्या पोतानुसार प्रमाण ठरवता यईल.
- जमिनीच्या पोषणमुल्यांचा विचार केल्यानंतर लागवडीसाठी स्थानिक प्रजातींची, जवळपास असणाऱ्या नैसर्गिकरित्या आलेल्या वनस्पतींची यादी बनवावी.
- वनस्पतींची संख्या व त्यांची गुणात्मक माहिती एकत्र करून घ्यावी.
- स्थानिक परिसरात नैसर्गिकरित्या असलेल्या वनस्पतींची झुडूपवर्गीय, मध्यम उंचीचे झाड, उंच झाड, पसरणारे झाड अशी वेगवेगळी यादी बनवावी.
- त्याच प्रकारची रोपे एकत्र करावीत आणि वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या थरात चांगले वाढणाऱ्या वनस्पतींच्या रोपांची संख्या ठरवावी.
- नंतर प्रत्यक्ष जमिनीवर नांगरणी वखरणी करावी त्यात आपण वर्णन केलेले सेंद्रिय पदार्थ यांचे मिश्रण करून घ्यावे.
- सेंद्रिय पदार्थांचे व मातीचे प्रमाण समान आसावे.
मियावाकी वनीकरणासाठी पूर्वतयारी कशी कराल ?
- लागवडीपूर्वी जागेची स्थळ निश्चिती व मोजणी करावी.
- लागवडीपूर्वी चाचणी खड्डे घेणे काम करावे.
- शहरात लगवडीचे काम करण्यासाठी दहा मीटर बाय दहा मीटर म्हणजे शंभर चौ.मी. (१०×१०=१००चौ.मी.) क्षेत्र निवडावे.
- त्यात एक मीटर खोलीचा खड्डा खोदावा व त्यात निघालेली अर्धी माती परत त्याच खड्डय़ात टाकावी.
- बाकीच्या अर्ध्या खड्डय़ात सेंद्रिय पदार्थ टाकावेत.
- हे खड्डे लागवड करावयाच्या ठिकाणी करावेत.
- नांगरटी करताना सेंद्रिय पदार्थ टाकूनच माती खालीवर करावी.
- त्यानंतर लागवडीसाठी रोपांची निवड करावी, त्यात झुडूपवर्गीय, उपवृक्ष, मध्यम झाड, उंच वाढून पसरणारी झाडे निवडून प्रती चौरस मीटर क्षेत्रात तीन झाडांची लागवड करता यईल.
- त्याठिकाणी जमिनीत कंपोस्ट खत टाकावे.
- खोदकामात कोकोपीट, माती, कंपोस्ट व लाकडाचा भुसा एकत्र मिसळून चांगल्या प्रकारे एकत्र करून लागवडीच्या ठिकाणी पसरून घेतल्यानंतर परत रोटाव्हेटरच्या साहाय्याने एकजीव करून घेतल्यावर जमीन लागवडीसाठी तयार होते.
मियावाकी वनीकरण कसे कराल?
- झाडे लागवड करण्यासाठी प्रथम जागेवर दहा बाय दहा मीटर उभ्या, आडव्या चून्याने रेषा मारून एक एक चौरस मीटरचे शंभर डब्बे आखणी करून घ्यावेत.
- प्रत्येक चौरस मीटर मध्ये वेगवेगळ्या स्तरानुसार झाडे ठेवून घ्यावीत.
- जागेवर ठेवलेल्या रोपांना जीवामृत मिश्रीत पाण्यात बुडवूनच लागवड करावी. रोपांची लागवड केल्याबरोबर माती लावावी नंतर एक चौरस मीटर डब्यात पाच लिटर पाणी टाकावे.
- कायम तण काढत राहावे. लागवड केलेल्या दोन रोपातील अंतर शक्यतो साठ सें.मी. ठेवावे थोडेसे कमी जास्त असले तरी चालते. परंतु, रोपे एकाओळीत दिसू नयेत ह्याची काळजी घ्यावी.
- एका डब्यात एकाच प्रकारातील दोन रोपांची लागवड होणार नाही याची काळजी घ्यावी.
- म्हणजे एका चौरस मीटरच्या डब्यात आंबा, सिताफळ, आवळा अशी मध्यम वाढणारे झाडे आलटून पालटून आले पाहिजेत. त्यामुळे झाडांना सूर्य प्रकाश मिळेल व वाढ लवकर होईल.
- सदर लागवड केलेल्या क्षेत्रास रोज पाणी द्यावे.
- पाणी देण्याची वेळ सकाळ संध्याकाळ ठेवावी. रोपांना जनावरांपासून संरक्षण द्यावे, त्यामुळे लवकरच नैसर्गिक जंगलासारखे दाट व उंच जंगल लवकरच तयार होते.
मियावाकी जंगलाचा प्रवास…छायाचित्रांमधून
- जमिनीची निवड आणि आखणी
२१ फेब्रुवारी २०२० लागवड
मार्च २०२० एका महिन्यानंतर
एप्रिल २०२० दोन महिन्यांनंतर
मे २०२० तीन महिन्यांनंतर
जून २०२० चार महिन्यांनंतर
जुलै २०२० पाच महिन्यांनंतर
ऑगस्ट २०२० सहा महिन्यांनंतर
सप्टेंबर २०२० सात महिन्यांनंतर
ऑक्टोबर २०२० आठ महिन्यांनंतर
नोव्हेंबर २०२० नऊ महिन्यांनंतर
डिसेंबर २०२० दहा महिन्यांनंतर
(शिव घोडके लेखक हे वनप्रेमी असून त्यांचा वन, झाडे, पक्षी, फुले, फुलपाखरे, पक्षी अशा सर्व निसर्ग घटकांचा चांगला अभ्यास आहे)