मुक्तपीठ टीम
“लतादिदींचे जाणे केवळ मंगेशकर कुटुंबियांवरच नव्हे तर त्यांच्या करोडो रसिक चाहत्यांवर आघात आहे. एक स्वरयुग संपलं. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला,” या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मनातील भावनांना शब्दरुप दिलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “लतादीदी आपल्यात नसतील, ही कल्पना सहन होत नाही. लतादीदी जगात एकमेव होत्या. त्यांच्यासारखी गानकोकीळा पुन्हा होणे नाही… अशा लतादीदी आता पुन्हा होणे नाही…” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्रातील अन्य नेत्यांनीही लतादीदींना श्रद्धांजली अर्पण केली.
लतादिदींचे जाणे केवळ मंगेशकर कुटुंबियांवरच नव्हे तर त्यांच्या करोडो रसिक चाहत्यांवर आघात : उद्धव ठाकरे
लता दीदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वरसम्राज्ञी लतादीदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात की, आपल्या लाडक्या लतादीदी आज आपल्यात नाहीयेत, हे सून्न करणारं आहे. पण त्या स्वरांनी, सुरेल गाण्यांनी, चिरपरिचित आवाजाने त्या अजरामर आहेत आणि राहतील. आपल्या आयुष्यातील जवळपास सर्वच प्रसंग,क्षण लतादिदींनी आपल्या सुमधुर सुरावटींनी जिवंत केले आहेत. त्यांच्या स्वरांनी मंगल क्षण सजले. दुःखद क्षणी याच स्वरांनी सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला. लढाई, संघर्षात याच स्वरांनी उर्मी,स्फुर्ती जागवली. जगाचा क्वचितच एखादा कोपरा असेल,जिथे त्यांचा स्वर पोचला नसेल, ऐकला गेला नसेल. भाषा, सीमा-प्रांत, वंश-धर्म असे अनेक बंध तोडून त्यांच्या स्वरांचाच एक प्रदेश, भवताल निर्माण झाला आहे.
ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबियांचे जुने स्नेहबंध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे लतादीदी, हृदयनाथ, आशाताई यांच्यासह सर्वांशीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्या निष्णात छायाचित्रकार होत्या. उत्तम कॅमेरे, वेगवेगळ्या लेन्सेस यांचा त्यांचा अभ्यास होता. त्यांच्याशी मध्यंतरी कधीमधी फोटोग्राफी, कॅमेरे याबाबत चर्चा व्हायची. माझ्या दोन्ही छायाचित्र संग्रहांविषयी त्यांनी आवर्जून दाद दिली होती. काही निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी, काही कारणांनी चौकशी करण्यासाठी, त्यांचा फोन येत असे. मध्यंतरी मी रुग्णालयात असतांना त्या सातत्याने माझी विचारपूस करून आशीर्वाद देत असत. त्यांचा तो आपुलकीचा सुमधुर स्वर आता पुन्हा कानी पडणार नाही. त्यांचा तो स्वर हे आमच्यासाठी परमसौख्य होते. हे सौख्य नियतीने हिरावून घेतले आहे. ही त्यांची उणीव जाणवत राहील.
लतादिदींचे जाणे केवळ मंगेशकर कुटुंबियांवरच नव्हे तर त्यांच्या करोडो रसिक चाहत्यांवर आघात आहे. कुणी कुणाचं सांत्वन करायचं?
लता मंगेशकर या भारतीय आणि जागतिक संगीत विश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न : अजित पवार
“‘अजीब दास्ताँ है ये…. कहाँ शुरु कहाँ खतम, ये मंजिलें हैं कौनसी…? ना वो समझ सके, ना हम…’ सारख्या हजारो सूमधुर गाण्यांनी कोट्यवधी रसिकांच्या हृदयसिंहासनावर आठ दशकांहून अधिक काळ अधिराज्य करणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे भारतीयंच नव्हे तर, जागतिक संगीत विश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न होतं. लतादीदींच्या निधनानं ते स्वप्न आज भंगलं आहे. संगीतविश्वातला स्वर्गीय सूर हरपला आहे. लतादीदींच्या सुरेल सूरांनी रसिकांचं भावविश्व आणि देशाचं कलाक्षेत्र समृद्ध केलं. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रातला, देशातला प्रत्येक जण, प्रत्येक घर आज शोकाकूल आहे. स्वर्गीय आनंद देणारी लतादीदींची गाणी, त्यांचे दैवी सूर हे आकाशात सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील, परंतु लतादीदी आपल्यात नसतील, ही कल्पना सहन होत नाही. लतादीदी जगात एकमेव होत्या. त्यांच्यासारखी गानकोकीळा पुन्हा होणे नाही… अशा लतादीदी आता पुन्हा होणे नाही…” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गानकोकीळा, भारतरत्न, महाराष्ट्रभूषण लता मंगशेकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
“लतादीदी अमर आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ कधीच येणार नाही हा भाबडा समज आज खोटा ठरला आहे,” असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मातीला संगीतकलेचा गौरवशाली वारसा आहे. महाराष्ट्राच्या मातीत अनेक दिग्गज गायक, संगीतकार जन्मले. परंतु पंडित दिनानाथ मंगेशकरांच्या पोटी जन्मलेल्या लतादीदींनी भारतीय संगीत क्षेत्रात चमत्कार घडवला. अठ्ठावीस सूरांच्या दुनियेत लीलया संचार करणाऱ्या लतादीदींनी आठ दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकापेक्षा एक सरस गाणी दिली. संगीतक्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळवलं. ‘अद्वितीय’ अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली. भारतीय, जागतिक संगीतक्षेत्र समृद्ध केलं. देव आणि स्वर्ग आहेत की नाही ते माहित नाही, परंतु लतादीदींमध्ये अनेकांनी देव पाहिला. त्यांच्या सूरांनी रसिकांना स्वर्गीय आनंदाची अनुभूती दिली. लतादीदींनी सामाजिक बांधिलकीही जाणीवपूर्वक जपली.
१९६२ च्या चीनविरुद्धच्या युद्धात शहिद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ त्यांनी गायलेल्या ‘मेरे वतन के लोगो…’ गाण्यानं तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुजींच्या डोळ्यात पाणी आलं होतं. पंडित दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णसेवेच्या क्षेत्रातलं त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील. विश्वरत्न, भारतरत्न, महाराष्ट्रभूषण लतादीदी महाराष्ट्रकन्या होत्या. त्यांचं निधन ही महाराष्ट्राची, देशाची फार मोठी हानी आहे. लतादीदींचं नसणं कायम सलत राहील, मात्र त्यांची गाणी आपल्याला सदैव त्यांची आठवण देत राहतील. मी लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दु:खद प्रसंगात मी आणि संपूर्ण महाराष्ट्र मंगेशकर कुटुंबियांसोबत आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या दु:खात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
लतादीदींच्या निधनामुळे संगीताचा आवाज लोपला – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे आज संगीताचे सूर हरपले असून संगीताचा आवाज लोपला आहे, त्यामुळे प्रत्येक चाहता आज नि:शब्द आहे, या शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
तीन पिढ्यांशी समरस झालेल्या लतादीदी या ईश्वराची देण होत्या, त्या पुन्हा होणे नाही. “मेरी आवाज ही पहचान है”, हे त्यांचे शब्द अजरामर ठरणार आहेत. संगीत क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या लतादीदींच्या जाण्याने देशाची मोठी हानी झाली आहे असे सांगून मंत्री अशोक चव्हाण यांनी लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
नीलम गोर्हे
“भारतरत्न व देशाच्या, जगाच्या गानसरस्वती लताताई मंगेशकर यांचे दु:खद निधन झाले.त्यांनी संगीताला जीवन समर्पित केलें व अत्यंत खडतर परिश्रम करून त्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोचल्या. देश व देवावर त्यांची अविचल निष्ठा होती.भावपुर्ण श्रद्धांजली”
जयंत पाटील
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. अनेक दशकं भारतात आणि भारताबाहेर संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज आज हरपला आहे. संगीत क्षेत्रातील ध्रुवतारा निखळल्याची भावना आहे.
यशोमती ठाकूर
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं जाणं सुन्न करणारं आहे. त्यांचे स्वर आणि सूर अमर आहेत. लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली
राजेश टोपे
विश्वविख्यात, प्रतिभावंत गायिका, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. लता दीदींनी आपल्या अतीव सुरेल, मुलायम व परिपूर्ण अशा स्वरांनी लक्षावधी रसिक श्रोत्यांना सुरांची माधुरी व सौंदर्य प्रत्ययास आणून देण्याचे मोलाचे कार्य केले.भावपूर्ण श्रद्धांजली..!
चित्रा वाघ
“काल सरस्वती पूजन झाले आणि आज गानसरस्वतीने आपला रियाज आटोपता घेतला..
लता नावाचा स्वर्गीय आवाज अनंताच्या प्रवासाला निघून गेलाय..अनेक पिढया येतील जातील पण लतादीदी कायम अजरामर राहतील.
एक सूर्य
एक चंद्र
एक लता मंगेशकर!
आज खऱ्या अर्थाने सूर मूक झालेत..भावपूर्ण श्रद्धांजली!”