मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या खाद्यतेल उत्पादकांविरोधात महाराष्ट्र अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग आणि अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) यांनी धडाकेबाज कारवाई सुरु केली आहे. हे खाद्यतेल उत्पादक हलक्या दर्जाच्या आणि आरोग्याला हानीकारक असलेल्या पामतेलाची महागड्या सूर्यफूल तेलात भेसळ करून ते पॅकबंद स्वरुपात विकत असत. स्थानिक स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने एफडीएने मुंबई आणि परिसरातील खाद्यतेलांच्या उत्पादकांवर छापे घातले. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने वाशी येथील गौतम अॅग्रो इंडिया वर छापा घातला तर राज्य अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) विभागाने भिवंडी मधील श्री गॅलक्सी एन्टरप्राईझ आणि मीरारोडवरील आशीर्वाद ऑईल डेपोवर छापे घातले. दर्जा, गुणवत्ता आणि आरोग्यविषयक मापदंड पाळले जात आहेत की नाहीत हे तपासण्यासाठी गेले काही आठवडे हे छापे घालण्यात आले.
काही उत्पादकांच्या खाद्यतेलात भेसळ होत असून रिफाईंड सूर्यफूल तेलात हलक्या दर्जाच्या आणि आरोग्याला हानिकारक पाम तेलाची भेसळ होत असल्याच्या फूड अँड ड्रग्ज कन्झ्युमर वेलफेअर कमिटी या मुंबईस्थित ग्राहक कल्याण स्वयंसेवी संस्थेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर हा छापा घालण्यात आला. ही विविध आकारातील भेसळयुक्त तेलाची पाकिटे पनवेल, अलिबाग, रायगड आणि राज्याच्या इतर भागांत तसेच मुंबईभर शुद्ध सूर्यफूल तेल म्हणून विकली जातात. जिथे तेल बनवले जाते ते कारखाने अस्वच्छ असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठाच धोका निर्माण होत आहे.
मंगळवारी, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने वाशी येथील गौतम अॅग्रो इंडियाच्या कारखान्यावर छापा घातला. गौतम अॅग्रो गौतम तरल, सनटॉप, सनटाईम, गोल्डन डीलाईट, दिव्या आणि गॅलक्सीज फ्रेशलाईट या नावांखाली तेल बनविते आणि विक्री करते. वर नमूद केलेल्या नावाची तेल ही शुद्ध रिफाईंड सूर्यफूल तेल असल्याचा दावा केला जातो पण त्यांच्यामध्ये पाम तेलाची भेसळ असल्याचे निदर्शनास आले आहे. विभागाने या तेलाच्या पाकिटांचे नमुने जप्त केलेले असून भेसळीचे प्रमाण आणि घातक पदार्थांचे प्रमाण मोजण्यासाठी आणि पुढील तपासणीसाठी पाठवून दिले आहेत.
गेल्या आठवड्यात, राज्य अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) विभागाने भिवंडी मधील श्री गॅलक्सी एन्टरप्राईझ आणि मीरारोडवरील आशीर्वाद ऑईल डेपोवर छापे घातले. सूर्यफूलाच्या तेलात पाम तेलाची भेसळ करत असल्याचा त्यांच्यावर संशय होता. श्री गॅलक्सी एन्टरप्राईझेस गोल्डन डीलाईट रिफाईंड सूर्यफूल तेल, गॅलक्सीज फ्रेशलाईट रिफाईंड सूर्यफूल तेल, सुपर सनलाईट रिफाईंड सूर्यफूल तेल, दिव्य रिफाईंड सूर्यफूल तेल, सुपर सन रिफाईंड सूर्यफूल तेल, सौराष्ट्र शेंगदाणा तेल, श्री राजवाडी शेंगदाणा तेल, गॅलक्सीज गजानन आणि रुद्राक्ष शेंगदाणा तेल या नावाने तेलाचे उत्पादन आणि विक्री करतात. तर मीरारोड वरील आशीर्वाद ऑईल डेपो सूर्य रिफाईंड सूर्यफूल तेल, सुपर सन गोल्ड रिफाईंड सूर्यफूल तेल आणि सन सिल्व्हर रिफाईंड सूर्यफूल तेल या नावांखाली तेलाचे उत्पादन आणि विक्री करतात. एफडीए विभागाने या तेलाच्या पाकिटांचे नमुने जप्त केलेले असून भेसळीचे प्रमाण आणि घातक पदार्थांचे प्रमाण मोजण्यासाठी आणि पुढील तपासणीसाठी पाठवून दिले आहेत.
वाशी मध्ये करण्यात आलेल्या या कारवाईबद्दल बोलताना महाराष्ट्राच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे अधिकारी कमलेश डी.केदारे म्हणाले, “काही उत्पादक खाद्यतेलांच्या भेसळीमध्ये गुंतल्याची माहिती आम्हांला आमच्या स्त्रोतांकडून मिळाली होती तसेच काही तक्रारीही आल्या होत्या. यामध्ये काही प्रमुख उत्पादकांची नावेही होती. त्यामुळे हा छापा घालण्यात आला. त्यांनी बनवलेले तेल पनवेल, अलिबाग, रायगड आणि राज्याच्या इतर भागांत तसेच मुंबईभर विकली जातात. अस्वच्छ आणि आरोग्याला हानिकारक वातावरणात बनवलेले भेसळयुक्त अन्नपदार्थ विकून हे तेल उत्पादक लोकांच्या हिताला बाधा पोहोचवत आहेत. आम्ही वाशी येथे घातलेल्या छाप्याच्या जोडीलाच अन्न आणि औषध प्रशासनाने गेल्या दोन आठवड्यात भिवंडी आणि मिरारोड वरील तेल उत्पादकांवरही छापे घातले.”
फूड अँड ड्रग्ज कन्झ्युमर वेलफेअर कमिटी (एफडीसीडब्ल्यूसी)चे सचिव केथ डेव्हिड म्हणाले, “खाद्यतेलात भेसळ करण्याचा सर्रास प्रकार काही ज्ञात तेल उत्पादकांकडून केला जात आहे. हे ग्राहकांच्या हिताच्या विरुद्ध आहे. मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यांतच ही समस्या मूळ धरू लागली आहे. संशयित उत्पादकांवर तातडीने कारवाईची पावले उचलल्याबद्दल आम्ही अन्न आणि औषध प्रशासनाचे आभारी आहोत. या कारवाईमुळे तेलात भेसळ करणाऱ्या उत्पादकांना जरब बसेल. एफडीसीडब्ल्यूसी मध्ये आम्ही ग्राहकांच्या हितासाठी बांधील असून ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाची आणि सुरक्षीत उत्पादने मिळतील याकडे कटाक्षाने लक्ष देतो.”
भारताच्या आघाडीच्या अन्न नियंत्रकांनी, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडिया किंवा FSSAI ने डिसेंबरमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, ४,४६१ खाद्यतेल नमुन्यांपैकी २.४२% नमुने सुरक्षिततेच्या निकषांना धरून नव्हते तर २४.२% नमुने गुणवत्तेच्या निकषांवर अपयशी ठरले. यावरून बाजारपेठेत खाद्यतेलात भेसळीची शक्यता झाल्याचे सूचित होते.