मुक्तपीठ टीम
आंदोलन म्हटले की अनेकांच्या कपाळावर आठ्या चढतात. आंदोलकांच्या मागण्या रास्त असतीलही पण त्यांच्यामुळे आम्हाला त्रास का, असा प्रश्न विचारला जातो. त्यामुळेच कुणालाही त्रास न देता झालेले सांगलीतील महिलांचे आंदोलन हे आंदोलन असूनही चांगल्या बातमीचा विषय ठरले. या महिलांनी स्वयंपाक घरातील सिलिंडर घराच्या दाराबाहेर ठेवले. काहींनी त्यांच्यावर घोषणा लिहिल्या. त्या माध्यमातून सरकारला चपराक मारणारा शांततामय निषेध केला.
घरगुती सिलिंडर दर वाढीमुळे महिला वर्ग जास्तच त्रासला आहे. आधी सिलिंडर घ्यायला लावायचे आणि मग ते महाग करायचे. सरकारी दुटप्पीपणाविरोधात कम्युनिस्ट पक्षांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये महिलांचे आदोलन झाले.
कसे झाले गॅस महागाईविरोधातील आंदोलन?
- महागाईच्या विरोधात घरगुती सिलिंडर घराच्या दारात ठेवुन आज जिल्हाभर आंदोलन करण्यात आले.
- या आंदोलनात शेकडो महिला पुरुष सहभागी होउन या दरवाढीस विरोध दर्शविला.
- आंदोलकांच्या आरोपांनुसार, केंद्रात भाजप आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासुन घरगुती सिलिंडरच्या किंमती दुपटीपेक्षा जास्त झाल्या आहेत.
- २०१४ साली ४५० रु. ला मिळणारा सिलिंडर आज ९२० रु. ला झाला आहे. शिवाय त्यावर मिळणारी सबसिडी देखील बंद झाली आहे.
निवडणुका आल्या की इंधन दरवाढ बंद कशी?
तेच पेट्रोल डिझेलच्या बाबतीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कमी होउन देखील त्याचा फायदा सामान्य नगरीकांना देण्याऐवजी सरकार जनतेलाच लुटत आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती सरकारच्या हातात नाहीत म्हणणाऱ्या सरकारने देशात निवडणुका जाहीर झाल्याबरोबर कमी कशा काय केल्या? असा प्रश्न आंदोलनाच्या नेत्यांनी विचारला.
एवढेच नाहीतर गेल्या महिनाभरात यात कोणतीच दरवाढ झाली नाही. यावरुन सरकार जनतेच्या डोळ्यात धुळफेक करत आहे हेच यावरुन सिद्ध होत आहे. अशा सरकारचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.
इंधन दरवाढी इतर महागाईही भडकली
पेट्रोल डिझेल च्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्यामुळे, वाहतुकीच्या दरात वाढ झाली, पर्यायाने डाळी, खाद्यतेल, अन्नधान्य, भजीपाला या सगळ्या गरजेच्या वस्तु महागल्या आहेत. यावर सरकार कोणताही मार्ग काढताना दिसत नाही उलट देशाचे पंतप्रधान , मंत्री हे निवडणुका लढण्यामध्ये गुंतलेले दिसत आहे. त्यामुळेच गुरुवारी जिल्हाभर या गगनाला भिडलेल्या महागाईच्या विरोधात आंतोलन करण्यात आले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, जनवादी महिला संघटना, लाल बावटा आशा व गटप्रवर्तक युनियन या संघटनांचे कर्यकर्ते सहभागी झाले होते. कॉम्रेड उमेश देशमुख, रेहाना शेख, हणमंत कोळी, तुळशीराम गळवे, मिना कोळी, जोहरा नदाफ, दिलशाद टिनमेकर, सुरेखा जाधव, रियाज जमादार, दिलीप कांबळे, सुधिर गावडे, नितीन पाटील, जावेद मुजावर यांनी गावोगावी नेतृत्व केले.