तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
महाराष्ट्रातील सर्वपक्षीय राजकारण्यांना लाज वाटली पाहिजे. त्यातही सध्या सत्तेत असलेल्यांना जास्तच शरम वाटावी अशी घटना आपल्या महाराष्ट्रात घडली आहे. प्रजासत्ताक दिनी या सर्वांनीच तावातावाने भाषणे दिली असतील. ज्यांनी भाषणे दिली नसतील त्यांनी ट्विटर, फेसबुकवर मोठ्या बाता मारल्या असतील. रटाळ भाषणं देणाऱ्यांच्या कृतिशून्यतेमुळे प्रजा कंटाळत असतानाही त्यांना आपल्या सोयीनं प्रजासत्ताकाचं महत्व समजवण्याचा निरर्थक उपद्व्याप केला असेल. पण त्याचवेळी त्याच प्रजेतील एक चिमुरड्याने मात्र योग्य उपचाराअभावी प्राण गमावले. तेवढंच नाही तर नंतर त्याचा हकनाक मृत्यू ओढवल्यावर त्याच्या पालकांना रुग्णवाहिकाही दिली गेली नाही. त्यामुळे त्यांना आपल्या चिमुरड्या लेकाचा मृतदेह बाइकवरून न्यावा लागला.
मंत्रालयापासून पावणेदोनशे किलोमीटरवर महापाप!
हे पाप महाराष्ट्रात घडलं. त्याच महाराष्ट्रात जिथं राज्यकर्ते आणि विरोधक यांच्यात सध्या हिंदुत्वावरून सामना रंगलाय. विरोधी पक्षात असणाऱ्या भाजपाला मतांच्या ध्रुविकरणासाठी टिपू सुलतान हे महाराष्ट्रावर कोसळलेले सर्वात मोठे संकट वाटत आहे. तर सत्ताधाऱ्यांना आघाडीतील बिघाडी आणि उरलेला वेळ भाजपाच्या तोंडाळपणाला सवाई तोंडाळपणे उत्तर देणे, यातच महाराष्ट्राचं, राष्ट्राचं हित असल्याचं भासू लागलंय. या तोंडाळांच्या निष्क्रिय असंवेदनशीलतेचा फटका बसतोय तो मात्र अजयसारख्या निरागस चिमुरड्यांना! तोही राज्याचं मुख्यालय असणाऱ्या मंत्रालयापासून अवघ्या पावणे दोनशे किलोमीटरवर असलेल्या तालुक्यात.
पैसे नाहीतर रुग्णवाहिका नाही!
पालघरच्या मोखाड्यातील अजय युवराज पारधी अवघ्या सहा वर्षांचा चिमुरडा. पायरवाडीत राहायचा. पहिलीत शिकणाऱ्या अजयने जगही धड पाहिलं नव्हतं. त्याला दोन दिवसांपूर्वी ताप आला होता. त्यानंतर त्याच्या आईवडिलांनी त्याला उपचारासाठी २४ जानेवारीला नाशिकच्या त्रिंबकेश्वर येथील दवाखान्यात नेले. परंतु तेथे एक दिवसाच्या उपचारानंतर सरकारी दवाखान्यात दाखल करण्याचा सल्ला त्या रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला. त्यानंतर त्यांनी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले. परंतु तेथील डॉक्टरांनी जव्हार कुटीर रुग्णालयात दाखल करा असे सांगितले. त्यानंतर त्यांनी लगेचच मुलाला जव्हार कुटीर रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापेक्षा त्यासाठीची धावपळच जास्त झालेल्या अजयचा २५ जानेवारीच्या रात्री ९ वाजता मृत्यू झाला. मुळातच अजयचे आई-वडिल गरीब. नेहमीच आर्थिक ओढताण असणारे. त्यामुळे त्यांच्यासमोर प्रश्न उभा ठाकला, आता मुलाचा मृतदेह घरी कसा न्यायचा? त्यांनी रुग्णवाहिकेसाठr विचारणा केली असता पैस देणार असाल तरच गाडी मिळेल, असे रुग्णवाहिका चालकाने बजावले. पैसे नसतील तर पायीपायी मृत्युदेह घेऊन जा, असेही उद्दामपणे सुनावल्याचे अजयचे वडिल सांगतात. त्यांच्याकडे होते नव्हते ते पैसे मुलाच्या उपचाराच्या धावपळीत संपले होते. पैसे द्यायला नसल्याने ते हताश झाले. थंडीत कुडकुडत ३५-४० किमी अंतरावर बाईकवर मृतदेह घेऊन गावी पायरवाडीला गेले.
जिल्हा झाला, रुग्णालय नाही!
या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. आता जव्हार कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ रामदास मराड म्हणतात की, हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई कार्यवाही केली जाईल. आपल्याकडे अडचण हीच आहे. माणूस जिवंत असताना कुणी दखल घेत नाही. मेला की सर्व जागे होतात. माध्यमांनी खरं तर याआधीही अनेकदा पालघरमधील आरोग्य सुविधांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधले पण कोणीच काही केले नाही. सत्तेतील चेहरे बदलतात, पण प्रवृत्ती तीच दिसते. मी लेखाच्या सुरुवातीला भाजपा नेत्यांनाही झोडले ते केवळ त्यांच्या धार्मिक राजकारणाच्या शॉर्टकटमुळे नाही. ते सत्तेवर असताना पालघर हा महाराष्ट्रातील नवा जिल्हा अस्तित्वात आला. मात्र या जिल्ह्यात आजवर जिल्हा रुग्णालय बांधले गेले नाही. भाजपा सत्तेत असताना झाले नाही. आघाडीच्या सत्तेतही झाले नाही. पालघरमध्ये अपघात जरी झाला तरी ज्या गुजरातच्या नावाने आघाडीचे नेते कडाकडा बोटे मोडतात त्या गुजरातमधील वापीला किंवा सिल्व्हासाला जखमी रुग्णाला न्यावे लागते. लाज वाटावी असं सारे. पूर्व डोंगराळ पट्ट्यात तर अधिकच वाईट परिस्थिती. तेथून तर थेट नाशिक गाठावे लागते किंवा ठाणे – मुंबईकडे जावे लागते.
स्थानिक समाजसेवकांना विचारात घ्या…
पालघरच्या ग्रामीण पट्ट्यात जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था स्वखर्चाने आरोग्य सेवा पुरवते. तिथं रुग्णालय नसल्याने त्यांचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी मोफत रुग्णालय सुरु केले आहे. शुक्रवारी त्यांच्या रुग्णालयाच्या विस्तारीकरणाच्या उद्घाटनासाठी त्यांनी निमंत्रण दिले आहे. त्यांना या घटनेबद्दल विचारण्यासाठी कॉल केला तेव्हा ते दु:ख आणि संतापाने म्हणाले, आमच्या पट्ट्यात माणसांना माणसासारखं जगायचा अधिकारच ठेवलेला नाही. एवढा मोठा निधी येतो. पण शेकडो कोटींचा निधी न वापरला गेल्यामुळे सरकारकडे परत जातो. येथे राजकीय नेते, एनजीओ येतात. खूप काम केले असे दाखवतात. पण प्रत्यक्षात त्यातील खूप कमी काम प्रत्यक्षात होते. आरोग्य आणि शिक्षण हे दोन सामान्यांचे अधिकार आहेत. आम्ही आमच्या व्यवसायातील फायदा त्यासाठी वापरत प्रयत्न करत आहोत. सर्व मोफत. पण कुठेकुठे पुरं पडणार?
पालघर म्हणडे पैसे खाण्याचे कुरण किंवा काळापाणी!
सर्व नाही पण अनेक सरकारी अधिकारी आणि कर्मचारी पालघरमधील नियुक्तीला एकतर पैसे खाण्याची संधी नाही तर किंवा काळ्यापाण्याची शिक्षा मानतात. आरोग्यसेवेतील किती अधिकारी येथे राहतात, किती रुग्णालयात, आरोग्य केंद्रांवर असतात, याचा सरकारने भरारी पथक पाठवून शोध घ्यावा. तशीच स्थिती शिक्षण खात्याची. आलेला निधीही वापरला जात नाही. अनेक लोकप्रतिनिधी फक्त निधी मिळवण्यासाठी राजकारण करतात. त्यांना मतदार हीसुद्धा माणसंच आहेत, असे वाटत नाही. खुपेल पण मी वास्तव मांडतो. आपला समाज, आपली माणसं यांच्यासाठी आपण संवेदनशीलतेने काम केले पाहिजे. सरकारी अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून काम करून घेतले पाहिजे. पण तसे केले जात नाही. वेगळीच कामं असतात. त्यासाठी साटंलोटं तयार होते. आणि त्यातीन मग पालघरमधील भकास अवस्था तशीच राहते. नेते मोठे होतात. नाव कमवतात. काही तर मंत्रीही होतात. पण पालघर आहे तेथेच राहतो.
पालघरसाठी खास अधिकारी नेमा!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मोखाडा-जव्हारकडे खास लक्ष देतात. पण त्यांची पाठ वळली की पुन्हा सरकारी यंत्रणा तशीच थंड पडते. त्यांनी या भागासाठी खास अधिकारी मंत्रालयात नेमावा. त्याचं रिपोर्टिंग थेट मुख्यमंत्र्यांकडे असावे. तरच काही होऊ शकेल. अनेक चांगली स्थानिक माणसं इथं जे काम करतात, त्यांना स्थानिक वास्तव माहित आहे. त्यांच्याकडून माहिती घ्यावी. खडानखडा माहिती मिळू शकेल.
राज्य काय मुडद्यांवर करणार?
विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही हात जोडून विनंती. राजकारण होत राहिल. पण आधी माणसं जगवण्याचं पाहा. आता त्यांचं सरकार, पण आधी तुमचंही सरकार होतं. जिल्हा निर्मितीचं श्रेय घेतलंच तसं योग्य व्यवस्था न उभारल्याच्या गेल्या ७० वर्षांच्या सर्वपक्षीय पापात तुमचेही अपश्रेय आहेच आहे. राजकारण थांबवत अशा मुद्द्यांवर लक्ष द्या. केवळ साधूंच्या हत्याकांडाला धार्मिक रंग देत ट्रेंड करण्यासाठी पालघर आठवू नका. तसेच आघाडीतील तीन पक्षांनीही पुरोगामित्व म्हणजे केवळ धर्मनिरपेक्षता एवढ्यापुरते मर्यादित मानू नये. माणसांना माणसांसारखं सन्मानाने जगता यावं, अशी व्यवस्था उभारणे हे खरं पुरोगामित्व हे लक्षात घ्यावं. नाही तर सत्तेतील चेहरे बदलल्यानं आपलं जीवन बदललेलं नाही, हे लक्षात येताच सामान्य माणसं तुम्हालाही सत्तेतून बदलतील. अमरपट्टा कुणालाच नाही. सामान्यांची हाय घेवू नका! तसं करणं हे महापाप आहे!!
तुमचं राजकारण होत राहिल. माध्यमं तुमच्या उखाळ्या-पाखाळ्या दाखवत राहतील. पण शेवटी मतं देणारे मतदारही जिवंत असणं तुमचीच गरज आहे, हे विसरु नका. समाजमाध्यमांवरील फेक फॉलोवर्स तुम्हाला फेक ट्रेडिंगमध्ये ठेवतील पण सत्ता मात्र हेच मतदार देतील, टिकवतील हे विसरु नका! माणसं राहिलीत तर तुमची सत्ता राहिल, नाही तर राज्य काय मुडद्यांवर करणार?
तुळशीदास भोईटे हे ‘मुक्तपीठ’ या मुक्तमाध्यमाचे संपादक आहेत.
संपर्क – ट्वीटर @TulsidasBhoite मोबाइल 9833794961 ई-मेल tulsidasv@gmail.com