मुक्तपीठ टीम
आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने गुरुवारी ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाने पणजी मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या बंडखोरीचा भाजपावर नेमका काय परिणाम होईल, यावर चर्चा सुरु झाली आहे. २०१९मध्ये महाराष्ट्रातील ओबीसी नेते आणि तत्कालिन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपाला विदर्भात फटका बसल्याचे मानले जाते. आता गोव्यातही सारस्वत समाजातील उत्पल पर्रिकरांच्या बंडखोरीचा भाजपाला तसाच फटका बसेल का, अशी चर्चा सुरु आहे.
भाजपा नेते देवेंद्र फडणवीस सध्या गोव्यात भाजपाची रणनीती ठरवत आहेत, तेच २०१९च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये भाजपाचे नेतृत्व करत होते. त्यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि तत्कालिन ऊर्जामंत्री ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. बावनकुळे यांनी त्यावेळी बंडखोरी केली नव्हती, तरीही त्यांना उमेदवारी नाकारल्याने सामाजिक असंतोषाचा फटका भाजपाला विदर्भात काही मतदारसंघांमध्ये बसला, असे मानले जाते. २०१४मध्ये एकटी लढूनही १२३ जागा मिळवणारी भाजपा २०१९मध्ये शिवसेनेसोबत युती असताना १०५वर येण्यासाठी तेही एक कारण जबाबदार ठरल्याचे मानले जाते. आता गोव्यात भाजपा रुजताना मूळ आधार असणाऱ्या सारस्वत समाजाच्या मतदानावर उत्पल पर्रिकरांच्या बंडखोरीचा परिणाम होईल की तो समाज भाजपाशी एकनिष्ठ राहत उत्पलना एकटे सोडत यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे. सारस्वत समाज हा गोव्यात बहुसंख्येनं नसला तरी प्रभाव पाडणारा समाज मानला जातो. आपने भंडारी समाजाच्या यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करून आधीच ओबीसी कार्ड खेळले आहे. भाजपाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेही बहुजन असल्याने त्या समाजांची मते विभागण्याची शक्यता आहे.
पर्रिकरांच्या पुण्याईपेक्षा बाबूश का ठरले मोठे?
पणजीच्या ज्या मतदारसंघातून त्यांचे वडिल आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत मनोहर पर्रिकर पाचवेळा निवडून आले त्या मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या मतदारसंघातून भाजपाची उमेदवारी मिळालेले माजी काँग्रेस नेते बाबुश मॉन्सेरात यांची निवडणुका जिंकण्याची अफाट क्षमता लक्षात घेता भाजपाने मनोहर पर्रिकरांच्या प्रतिमेचा विचार न करता त्यांना महत्व दिले. केवळ पर्रिकर हेच बाबुशना पुरुन उरले होते. त्यांच्यानंतर बाबुशनी पणजी मनपा आणि इतर सर्व निवडणुकांमध्ये आपली ‘क्षमता’ सिद्ध करून दाखवली. केवळ पणजीच नाही तर सभोवतालच्या चार-पाच मतदारसंघांमधील निकालांवर परिणाम घडवण्याची त्यांची क्षमता सांगितली जाते. त्यामुळेच सध्याच्या भाजपा मंत्रिमंडळात त्यांची पत्नी मंत्री आहे, तर मुलगा हा पणजीचा महापौर आहे.
वडिलांच्या मूल्याधिष्ठित राजकारणाचा वारसा पुढे चालवण्यासाठी बंडखोरी – उत्पल पर्रिकर
- उत्पल पर्रिकर यांनी आपल्याला पणजी मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली होती.
- भाजपाने वादग्रस्त आमदार बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी दिली.
- त्यामुळे नाराज झालेल्या उत्पल यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.
- ‘मतदारांनी केवळ मनोहर पर्रिकरांना मतदान दिलं होतं. कारण पर्रिकर हे मूल्यांच्या बाजूने होते.
- त्यामुळे मी या मुद्द्यांच्या बाजूने आहे.
- माझ्या वडिलांनी पक्ष मजबूत केला.
- मलाही पणजीत मजबूत करायचा आहे.
- मला पणजीतून उमेदवारी दिली नाही.
- केवळ संधीसाधूला तिकीट दिलं आहे.
- दोन वर्षापूर्वी पक्षात आलेल्यांना तिकीट दिलं.
- त्यामुळे मी पणजीतून अपक्ष म्हणून लढणार आहे.
माझं राजकीय करिअर पणजीच्या लोकांच्या हाती
- ‘मी खूप मोठी रिस्क घेत आहे. मी फार कठीण मार्ग निवडला आहे.
- माझ्या करियरवर खूपजणांनी चिंता व्यक्त केली.
- माझ्या राजकीय भवितव्याची कुणी चिंता करू नये, गोव्याची जनता माझी चिंता करेल.
- ‘गेल्यावेळीही मला संधी नाकारली आहे.
- आताही नाकारले आहे.
- इथल्या लोकांना माहीत आहे.
- हा मनोहर पर्रिकराच्या पार्टीतील निर्णय वाटत नाही.
- कधी तरी जनतेसाठी थांबावं लागतं.
- मी अपक्ष लढतोय.
- माझं राजकीय करिअर मी पणजीच्या लोकांच्या हाती ठेवलं आहे.
- मी कोणत्याही पद आणि मंत्रीपदासाठी मी लढत नाही. मूल्यांसाठी माझी लढाई आहे.
- हे युद्ध कठीण आहे.
- मला काही तरी मला मिळेल यासाठी मी काही करत नाही. पणजीचे लोक ३० वर्ष माझ्या लोकांसोबत होते.
- येथील वर्ग उच्च शिक्षित आहे.
- त्यामुळे मी त्यांच्यासोबत जात आहे.
- माझ्या वडिलांची जी इमेज होती तीच इमेज मला द्यायची होती.
- मी पक्षातून त्यासाठी प्रयत्न केला.
- पण त्यात मी यशस्वी झालो नाही.