मुक्तपीठ टीम
वंदे मातरम,नृत्य उत्सव स्पर्धेचे विजेते आता २६ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथील राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिन २०२२ च्या संचलनात भाग घेऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी जोमाने तयारी करत आहेत. राजपथ तसेच इंदिरा गांधी इनडोअर स्टेडीयम येथे प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या भव्य सादरीकरणाची रंगीत तालीम जोरात सुरु आहे.
कथक नृत्यात पारंगत राणी खानम यांच्यासह मैत्रेयी पहाडी, तेजस्विनी साठे आणि संतोष नायर हे चार प्रसिध्द नृत्य दिग्दर्शक देशाच्या विविध राज्यांतून आलेल्या वंदे मातरम,नृत्य उत्सव स्पर्धेच्या ३६ विजेत्या संघांना प्रशिक्षण देत आहेत.
केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने वंदे मातरम-नृत्य उत्सव स्पर्धेच्या चार फेऱ्यांतून ४८० कलाकारांची निवड केली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या वंदे मातरम-नृत्य उत्सव स्पर्धेचा महा अंतिम सोहळा १९ डिसेंबर २०२१ रोजी नवी दिल्ली येथे पार पडला.
जिल्हा पातळीवर १७ नोव्हेंबर रोजी वंदे मातरम स्पर्धेची सुरुवात झाली आणि त्यात ३२३ गटांच्या माध्यमातून एकूण ३,८७० स्पर्धकांनी भाग घेतला. जिल्हा पातळीवरील निवड स्पर्धेतून निवडण्यात आलेल्या स्पर्धकांनी ३० नोव्हेंबर २०२१ रोजी झालेल्या राज्य पातळीवरील स्पर्धेत कला प्रदर्शन केले.
२०० पेक्षा जास्त संघांतील २,४०० हून अधिक स्पर्धकांची नावे विभाग पातळीवरील स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आली. कोलकाता, मुंबई, बेंगलुरू आणि दिल्ली येथे ९ ते १२ डिसेंबर या कालावधीत स्पर्धेच्या विभागवार अंतिम फेऱ्या घेण्यात आल्या, या पातळीवर १०४ पथकांनी त्यांच्या नृत्यकलेतील प्राविण्य दाखविले. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ संकल्पनेमागची खरी प्रेरणा दर्शवत आता हे सर्व छोटे समूह एका मोठ्या समूहाच्या स्वरुपात रुपांतरीत होऊन प्रजासत्ताक दिनी सादरीकरण करतील, मात्र हे करताना त्या त्या गटाच्या व्यक्तिगत नृत्य सादरीकरणाचे वेगळेपणही कायम राखण्यात येणार आहे. या १०४ गटांपैकी सर्व चारही विभागांतील ७३ गटांतील ९४९ नृत्य कलाकारांनी महा अंतिम फेरीत प्रवेश केला आणि दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडीयम प्रेक्षागारात १९ डिसेंबरला झालेल्या स्पर्धेत आपली कला सादर केली.
महा अंतिम फेरीच्या शेवटी सर्वात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ४८० नर्तकांना विजेते म्हणून घोषित करण्यात आले आणि आता ते २६ जानेवारी २०२२ रोजी नवी दिल्लीच्या राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलनात नृत्याविष्कार सादर करतील.
स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच लोक-सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या सादरीकरणासाठी पथकांची निवड करण्यात आली आहे.