तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
ट्विटरवर कालपासून “महाराष्ट्रातून सैन्यदलात भरती होणाऱ्या तरुणाची संख्या तुरळक आहे.” हे विधान गाजत आहे. त्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे फेक की फॅक्ट हे तपासण्यासाठी प्रयत्न केला असता समोर आलेलं वास्तव मांडत आहे.
१०००००० व्यक्तीमागे, राज्यातील किती व्यक्ती सैन्यदलात भरती होतात?
राष्ट्रीय सरासरी – ३७
महाराष्ट्र – ३३छत्रपती शिवाजी महाराज, शंभू राजे आणि बाजीराव पेशवे ह्यांचा दैदिप्यमान इतिहास लाभलेल्या महाराष्ट्रातून सैन्यदलात भरती होणाऱ्या तरुणाची संख्या तुरळक आहे. #म
Shameful 👎 pic.twitter.com/oJFjR8RDZi
— मराठी रोजगार (@MarathiRojgar) January 2, 2022
मराठी माणसांना रोजगारांची माहिती देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी रोजगार @MarathiRojgar या ट्विटर हँडलने काल वरील ट्वीट केले. त्यातील महाराष्ट्रातून सैन्यदलात भरती होणाऱ्या तरुणाची संख्या तुरळक आहे, या विधानामुळे खळबळ माजली. त्यावर उलटसुलट मतं मांडली जात असतानाच वास्तवाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
११ मार्च २०२० रोजी लोकसभेत आंध्र आणि तेलंगणातील लष्कर भरतीविषयीचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाला संरक्षण मंत्रालयाने उत्तर दिले होते. त्याच्या आधारे ट्विटरवरील एका सांख्यिकी विश्लेषण हँडलने ट्वीट केले होते. त्यातील ग्राफिक्स चार्टला अटॅच करत मराठी रोजगारचे ट्वीट आहे. त्यामुळे ते अगदीच वाट्टेल तसे बिनबुडाचे दावे करणारे नाही. टक्केवारीत पाहिले असता, खरोखरच महाराष्ट्रातील देशरक्षणासाठी लष्करात जाणे आता खूपच कमी झाले की काय, असा ग्रह होतो. त्यातही लोकसंख्येच्या प्रमाणात पाहिलं गेलं तर तसंच आहे, असं वाटतंही. पण जर संरक्षण दलाने त्याच लोकसभेत दिलेली आकडेवारी तपासली तर महाराष्ट्र संख्येच्याबाबतीत देशात तिसरा क्रमांक राखून असल्याचे दिसते. तसेच लष्कराच्या एकूण संख्याबळातही महाराष्ट्र तसाच तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे इतर छोटी राज्य टक्केवारीत पुढे दिसत असली तरी भरतीच्या संख्याबळात महाराष्ट्र अगदीच मागे पडलेला आहे, असे म्हणणे योग्य वाटत नाही.
संरक्षण मंत्रालयाने संसदेत मांडलेल्या माहितीनुसार विविध राज्यातील लष्करातील लष्करी जवानांची संख्या पुढील प्रमाणे आहे:
लष्करात संख्याबळाने पहिली तीन राज्ये
1. उत्तर प्रदेश
- १ लाख ६७ हजार ५५७ सैनिकांसह उत्तर प्रदेश क्रमांक एकवर आहे.
2. पंजाब
- ८९ हजार ०८८ सैनिकांसह पंजाब दुसऱ्या क्रमांकावर आहे.
3. महाराष्ट्र
- ८७ हजार ८३५ सैनिकांसह महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- त्यानंतर इतर राज्ये आहेत. राजस्थान ७९ हजार ४८१ सैनिकांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
- इतर राज्यांमध्ये, हरियाणा राष्ट्रीय क्रमवारीत सहाव्या तर जम्मू आणि काश्मीर आणि हिमाचल प्रदेश अनुक्रमे ११व्या आणि १२ व्या स्थानावर आहेत.
- मात्र, आकडे आणि टक्केवारीमुळे येणारा फरक इथे स्पष्ट होतो. या राज्यांचे लष्करातील संख्याबळ टक्केवारीत पाहिले तर देशाच्या लोकसंख्येतील त्यांच्या टक्क्यांच्या तुलनेत लक्षणीय आहे. अर्थात याचा अर्थ असा नाही की उत्तरप्रदेश, महाराष्ट्र या टक्केवारीत कमी वाटणाऱ्या राज्यांमधून सैन्यभरतीत खूपच कमी प्रतिसाद आहे.
भारतीय लष्कराला आहे जवानांची गरज!
- भारतीय लष्कराचे मंजूर संख्याबळ १२ लाख २९ हजार ५५९ आहे.
- भारतीय लष्करात सध्या ११ लाख ५१ हजार ७२६ जवान आहेत.
- याचा अर्थ भारतीय लष्करात ७७ हजार ८३३ जवान कमी आहेत.
लष्करातील एकूण संख्याबळाच्या आधारे महाराष्ट्राचे स्थान पहिल्या तीन क्रमांकात दिसत आहे. मात्र, त्याचवेळी भारतीय लष्करातील तब्बल ७७ हजार ८३३ रिकाम्या जागा अस्वस्थ करून जातात. अर्थात त्यासाठी एकटा महाराष्ट्र जबाबदार आहे, असे नाही. पण कुठेतरी योग्य भरती सुविधा आणि योग्य प्रक्रियेचा अभावही जबाबदार ठरतोय, असे म्हटले तर वावगे ठरू नये. राज्य आणि केंद्र दोन्ही सरकार मिळून प्रयत्न करणे आवश्यक वाटते.
महाराष्ट्रात लष्कर भरतीला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दलच्या काही बातम्या मांडत आहे.
महाराष्ट्रात लष्कर भरतीला प्रतिसाद मिळतच नाही असेही नाही. त्यासाठी काही बातम्या मांडत आहे.
बातमी -१
फेक पोस्टमुळेही नाशिकच्या देवळालीत लष्कर भरतीसाठी गर्दी
२०१७मध्ये (या आकडेवारीत समावेश असलेले वर्ष) घडलेली एक घटना बोलकी आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर ऑक्टोबर महिन्यात लष्कराच्या ११६ इन्फंट्री बटालियनमध्ये भरती असल्याची पोस्ट व्हायरल झाली होती. ती पोस्ट वाचून हजारोंच्या संख्येने तरुण नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये दाखल झाले होते.
बातमी – २
लष्करातील महिला भरतीसाठी पुण्यात गर्दी
गेल्या वर्षी २०२१च्या एप्रिलमध्ये पुण्यातील वानवडीच्या आर्मी इंस्टिट्यूटच्या मैदानावर महिलांसाठीच्या पहिल्या भरतीची प्रक्रिया सुरु होताच आदल्या रात्रीपासूनच तरुणी आणि त्यांच्या पालकांची गर्दी उसळली होती.
बातमी – ३
बारावी पात्रतेच्या ६३ जागांसाठी हजारोंची गर्दी!
ऑक्टोबर २०१९मध्ये सैन्य भरतीसाठी नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये तरुणांची तुफान गर्दी उसळली होती. भरतीसाठी आलेल्या तरुणांची राहण्याची झोपण्याची सोय नसल्याने अनेकांना रस्त्याच्या कडेला, बसथांब्यावर जिथे जागा मिळेल तिथे रात्र काढावी लागली. ६३ जागांसाठी १५ ते २० हजार तरुण पोहचले होते. त्यात महाराष्ट्रातील जळगावपासून गोंदिया-भंडाऱ्यापर्यंत मोठ्या संख्येने युवक आले होते. दुसऱ्या राज्यातूनही भरती होती. बारावी पात्रता असणाऱ्या या जागांसाठी महाराष्ट्रातून आलेल्या तरुणांमध्ये एमएससी, बीए आणि इंजिनिअर्सही आले होते.
सर्वात महत्वाची बातमी गेल्या वर्षातील आहे.
बातमी – ४
मुंबईतील लष्कर भरतीवरील स्थगिती उठवण्याची मागणी, वयोमर्यादाही वाढवा!
मुंबईतील ए.आर.ओ. लष्करी भरतीवरील स्थगिती त्वरित उठवण्याबरोबरच कोरोनात दोन वर्षे भरतीची संधी हुकलेल्या तरुणांसाठी वयोमर्यादा नव्याने वाढवून देण्याची मागणी सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी सप्टेंबर २०२०मध्ये केली. त्यांच्या तालुक्यामधील तरुणांनी सैन्य भरती रखडल्यामुळे होणाऱ्या नुकसानाचा प्रश्न त्यांच्यापुढे मांडला आहे.
सातारमधील भाजपा नेते राज्यसभा खासदार उदयन राजे यांनी साताऱ्यात लष्कर भरती केंद्र व्हावे यासाठी सातत्याने मागणी करत आहेत.
या साऱ्या बातम्या वाचल्या आणि आकडेवारी पाहिली की सहजच कळते की टक्केवारीच्या भाषेत देशाच्या रक्षणापासून महाराष्ट्र मागे फिरतो आहे, असे भासत असले तरी वास्तव तसं नसावं. आजही महाराष्ट्र हा संख्याबळात पहिल्या तीन क्रमांकात आहेच. अर्थात मराठी टक्का लोकसंख्येच्या प्रमाणातही वाढवायची अपेक्षा चुकीची नाही. पण त्यासाठी हिणवून नाही तर पोषक वातावरणनिर्मिती करुन प्रयत्न आवश्यक आहेत. टक्केवारी अनेकदा घोळ करते. तिच्या आधारे मिरवू आणि हिणवू नये.
तुळशीदास भोईटे हे ‘मुक्तपीठ’ या मुक्तमाध्यमाचे संपादक आहेत.
संपर्क – ट्वीटर @TulsidasBhoite मोबाइल 9833794961 ई-मेल tulsidasv@gmail.com