मुक्तपीठ टीम
कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाचा आज ७० वा दिवस आहे. आंदोलनाला बळकटी येण्यासाठी शेतकरी सातत्याने दिल्लीत पोहोचत आहेत. तर दुसरीकडे, आज हरियाणाच्या जींद जिल्ह्यातील कंडेला गावात शेतकऱ्यांची महापंचायत बोलावण्यात आली आहे. या महापंचायतीत अंदाजे ५० हजाराहून जास्त शेतकरी सहभागी होण्याची शक्यता आहे.
या महापंचायतीत भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत सहभागी होणार आहेत. तसेच मंगळवारी टिकैत म्हणाले की, “आम्ही सरकारला कायदे मागे घेण्यासाठी मुदत दिली आहे. जर तसे झाले नाही तर देशभरात ट्रॅक्टर रॅली काढली जाईल, यात ४० लाख ट्रॅक्टरचा सहभाग असेल. तसेच या दरम्यान आंदोलनही सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सरकारला इशारा दिला आहे”.
दरम्यान, २६ जानेवारीला झालेल्या हिसांचारानंतर ज्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीसाठी संयुक्त मोर्चाने एक कायदेशीर समिती स्थापन केली आहे. यासंदर्भात समितीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली, व मुख्यमंत्र्याकडून माहिती मिळाली की, एकूण ११५ लोक तिहार तुरूंगात कैद आहेत.
शेतकरी आंदोलकांनी ६ फेब्रुवारीला राज्य तसेच राष्ट्रीय महामार्ग रोखणार असल्याची घोषणा केली आहे. भारतीय किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंह राजेवाल म्हणाले की, ६ फेब्रुवारीला दुपारी १२ ते दुपारी ३ या वेळेत रस्ते रोखण्यात येणार आहेत. एकीकडे शेतकरी आपल्या आंदोलनाची रणनीती ठरवत आहेत तर दुसरीकडे, दिल्ली पोलिसांकडून दिल्लीत जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात येत आहेत. टिकरी सीमेवर पोलिसांकडून ४ फूटची सिमेंटची पक्की भिंत उभारून ४ थरांमध्ये बॅरिकेटींग करण्यात आले आहे.
२६ जानेवारीला दिल्लीमध्ये आणि त्यानंतर २९ जानेवारीला सिंघु सीमेवर झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली आणि हरियाणामधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. हरियाणातील कॅथल, पानीपत, जींद, रोहतक, चरखी दादरी, सोनीपत आणि झज्जर या ७ जिल्ह्यात वॉइस कॉस सोडून इंटरनेट सर्विस, एसएमएस आणि मोबाइलला दिलेली डोंगल सेवा बुधवारी, संध्याकाळ ५ वाजेपर्यंत बंद करण्यात आली आहे.