मुक्तपीठ टीम
कोरोना संकट काळात सर्वांनाच ऑक्सिजनचं महत्व जास्तच कळलं. त्यातही वैद्यकीय ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक ठिकाणी टांगणीला लागलेले जीव ऑक्सिजनविषयी सामान्यांपासून सरकारपर्यंत जागरुकता निर्माण करून गेले. वैद्यकीय ऑक्सिजनची जीवनरक्षक सार्वजनिक आरोग्य बाब म्हणून भूमिका लक्षात आली. त्याचबरोबर वैद्यकीय ऑक्सिजन हाताळण्यासाठी आरोग्य सेवा कर्मचार्यांची क्षमता वाढवण्याची गरज जाणवली. त्यामुळेच नॅशनल ऑक्सिजन स्टुअर्डशिप प्रोग्राम सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी नवी दिल्लीत एम्समध्ये केले. हा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा कार्यक्रम आहे.
ऑक्सिजन व्यवस्थापन आणि प्रशासनातील सर्व आरोग्यसेवा कर्मचार्यांना ऑक्सिजनचा तर्कसंगत वापर सुनिश्चित करण्यासाठी आणि त्याचा अपव्यय टाळण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्यांसह संबंधिताना सक्षम करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे, विशेषत: संसाधनांच्या मर्यादीत स्थितीमधे.
देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक “ऑक्सिजन स्टुअर्ड” नेमणे किंवा निश्चित करणे आणि त्यांना प्रशिक्षित करणे हा योजनेचा उद्देश आहे. हे प्रशिक्षित व्यावसायिक, संबंधित जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन उपचार आणि व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणाचे नेतृत्व करण्यासाठी जबाबदार असतील आणि मागणी वाढली असता अशा परिस्थितीत ऑक्सिजन वितरण तसेच सज्जतेच्या परिनिरीक्षणाला (ऑडिटला) देखील मदत करतील.
“ऑक्सिजन” हा जीव वाचवणारा असून केवळ कोरोनाच नव्हे तर अनेक आजारांवरील उपचारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. महामारीच्या काळात देशात ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तर्कसंगत वापर अनिवार्य आणि काळाची गरज बनला आहे असे असे याप्रसंगी संबोधित करताना डॉ. पवार म्हणाल्या.
ऑक्सिजनची वाढीव उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांची माहिती देताना, केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले की “भारत सरकारने १५०० पेक्षा जास्त प्रेशर स्विंग ऍडसॉर्प्शन (पीएसए) ऑक्सिजन निर्मिती संयंत्रांना मंजुरी दिली आहे, त्यापैकी १४६३ कार्यान्वित करण्यात आले आहेत, ज्यामध्ये १२२५ पीएसए प्रकल्प देशातील प्रत्येक जिल्ह्यात पीएमकेअर्स निधी अंतर्गत स्थापित आणि कार्यान्वित केले गेले आहेत.
नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य), डॉ. व्ही के पॉल यांनी ऑक्सिजन प्रशासनात कार्यक्षमता सुनिश्चित करण्यावर भर दिल्याबद्दल या उपक्रमाचे कौतुक केले.
त्यांनी अलीकडेच सुरु केलेल्या केलेल्या ‘ऑक्सीकेअर’ डॅशबोर्डला ऑक्सिजन प्रशासनाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून अधोरेखित केले.
कोरोना महामारीमुळे वैद्यकीय ऑक्सिजनची मागणीच वाढली नाही तर तो वेळेवर पोहोचवण्याची गरज देखील वाढली आहे असे राजेश भूषण, सचिव (आरोग्य) यांनी नमूद केले.
या कार्यशाळेचे उद्दिष्ट “विद्यमान मनुष्यबळाचा पुनर्उद्देश, पुनर्भिमुखता आणि कोशल्यउन्नती” हे आहे यावर त्यांनी भर दिला.