मुक्तपीठ टीम
पोलिओ लसीकरण मोहिमेदरम्यान बारा मुलांना सॅनिटायझरचा डोस पाजल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रामधील यवतमाळ जिल्ह्यातील कापसी कोपरी या गावत घडली आहे. ही सर्व मुलं पाच वर्षाखालील होती. संबंधित बारा मुलांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास व्हायला सुरूवात झाल्याने त्यांना जिल्ह्यातील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान हे उघडकीस आले.
या प्रकरणी भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक डॉक्टर, एक आंगणवाडी सेविका आणि एक आशा वर्कर यांना आपली चूक लक्षात आल्यानंतरही ती चूक त्यांनी लपवून ठेवली. मात्र मुलांना त्रास व्हायला लागल्यानंतर हा सर्वप्रकार समोर आला. या प्रकणाची चौकशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून सुरू आहे.
लस समजून सॅनिटायझर पाजण्यात आलेल्या मुलांची नावे
गिरीश गेडाम
योगीश्री गेडाम
अंश मेश्राम
हर्ष मेश्राम
भावना आरके
वेदांत मेश्राम
राधिका मेश्राम
प्राची मेश्राम
माही मेश्राम
तनुज मेश्राम
निशा मेश्राम
आस्था मेश्राम
मुक्तपीठ भूमिका
डॉक्टर म्हणजे जीवनरक्षक देवदूत. अगदी देवासारखे मानतो त्यांना. कुठेही हल्ला वगैरे झाला तर साथ देतो. पण सध्या भंडारा अग्निकांडातील दहा बळी असो किंवा अन्य अशीच प्रकरणे सर्व नाही पण काही डॉक्टर सामान्य रुग्णांच्याबाबतीत निष्काळजीपणा दाखवत असल्याचे उघड होत आहे. तो जीवघेणा असल्याने समर्थन होऊच शकत नाही.
आरोग्यसेविकांना सन्मानानं जगता यावा असे मानधन मिळावे, या मागणीसाठीही नेहमी पाठिंबा दिला जातो. पण कुपोषणग्रस्त भागातील काही आरोग्यसेविका आणि आता तर कळस म्हणावा लागेल, असे हे प्रकरण. अशांविरोधात कारवाई झालीच पाहिजे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आरोग्य अधिकारी-कर्मचारी यांच्यातील संवेदनशीलता जागवण्यासाठी-वाढवण्यासाठी खास मोहिम आखली पाहिजे. तसेच त्यांना सन्मानानं जगता यावं असेही आर्थिक सामाजिक वातावरण असलेच पाहिजे.
चौकशी करून केवळ दाखवण्यासाठी नको तर मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या निष्काळजीपणाबद्दल तशीच कडक कारवाई गरजेची आहे.