मुक्तपीठ टीम
कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमायक्रॉन आता वेगाने पसरु लागला आहे. या नव्या व्हेरिंएटचा संसर्गाचा वेग जास्त असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेले असतानाच भारतातही तो वेगाने लोकांना संक्रमित करत आहे. आतापर्यंत देशातील १२ राज्यांमध्ये कोरोनाच्या ओमाक्रॉन व्हेरिंएटचे १४५ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, राष्ट्रीय कोविड सुपरमॉडेल समितीने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला आहे. लोकांना सावधगिरी बाळगण्यास आणि कोरोना नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. समितीच्या इशाऱ्यानुसार, नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात, जानेवारीत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. तसेत ती फेब्रुवारी महिन्यापर्यंत शिखरावर जाण्याची भीती आहे.
ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या संसर्गाची देशात सातत्याने वाढ होत आहे. शनिवारी ओमायक्रॉनच्या ३० नवीन रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी शुक्रवारी २६ नवीन रुग्ण आढळले होते. गेल्या तीन दिवसांपासून देशात ओमिक्रॉन संसर्गाचा वेग वाढताना दिसत आहे. भारतात आतापर्यंत ओमायक्रॉनचे १४८ रुग्ण आढळले आहेत.
ओमायक्रॉनचा संसर्ग देशातील १२ राज्यात
- देशात शनिवारी ओमायक्रॉनची ३० नवीन प्रकरणे नोंदवली गेल्याने सरकारची चिंता वाढली आहे.
- तेलंगणामध्ये १२, महाराष्ट्रात आठ, कर्नाटकात सहा आणि केरळमध्ये चार अशी नवीन ओमायक्रॉन प्रकरणे आढळून आली.
- सर्व देशांनी आरोग्य सुविधा वाढवाव्यात डब्ल्यूएचओचा इशारा
- सोमवारपासून चंदीगडमध्ये शाळा बंद
- जानेवारीत भारतात तिसऱ्या लाटेची भीती
८९ देशांमध्ये ओमायक्रॉनची नवीन प्रकरणे
ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकाराचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण जग सतर्क दिसत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने असे सांगण्यात आले की, आरोग्य आणि सामाजिक उपायांनी ओमायक्रॉनचा प्रसार रोखता येऊ शकतो. आपण ओमायक्रॉनकडे दुर्लक्ष करणे टाळले पाहिजे. कोरोना रोखण्यासाठी सर्व उपायांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, दीड ते तीन दिवसांत त्याची प्रकरणे दुप्पट होतात. आतापर्यंत ८९ देशांमध्ये ओमायक्रॉनची नवीन प्रकरणे आढळून आली आहेत.
चंदीगडमधील शाळा बंद, नवी मुंबईतही १६ विद्यार्थ्यांना बाधा
- ओमायक्रॉनमुळे, चंदीगडमधील सर्व शाळा २० डिसेंबर ते ९ जानेवारी या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- सर्व राज्ये ओमायक्रॉनबाबत सतर्क आहेत.
- मुंबईतील एका शाळेत १६ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली होती.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला तिसरी लाट, देशात पुन्हा लॉकडाऊन होणार का?
- नॅशनल कोविड सुपरमॉडेल समितीने नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
- फेब्रुवारीमध्ये ही लाट शिगेला पोहोचू शकते. मात्र, ती दुसऱ्या लाटेइतकी धोकादायक ठरणार नाही.