मुक्तपीठ टीम
दहशत पसरवण्यासाठी आणि मानवी जीव धोक्यात घालणारी स्फोटके नेण्यासाठी पाकिस्तानकडून ड्रोनचा वापर नेहमीच केला जातो. भारताने मात्र तशाच ड्रोनचा वापर मानवजातीच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी जीवरक्षक लस आणि औषधे वाहतुकीसाठी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता ड्रोन भारतीय सीमेच्या परिसरात कोरोना योद्ध्याची भूमिका बजावत आहे. जम्मूमध्ये ऑक्टाकॉप्टर ड्रोनद्वारे कोरोना लसीचे हवाई वितरण सुरू करण्यात आले आहे. या प्रात्यक्षिकादरम्यान सीएस आयआर -आयआयएम जम्मू ते सरकारी उपजिल्हा रुग्णालय, मढ, जम्मूपर्यंत ड्रोनने १५ मिनिटांत १५ किलोमीटरचे अंतर पार केले. औषधे, लस, अन्न, पोस्टल पॅकेट्स, मानवी अवयव इत्यादींच्या अंतिम स्थानावरील वितरणासाठी ऑक्टाकॉप्टरचा वापर केला जाऊ शकतो.
कोरोना लस तसेच आपत्कालीन औषधे दुर्गम आणि कठीण प्रदेशात कमी कालावधीत नेण्यासाठी प्रथमच ड्रोन द्वारा संचालित हवाई वितरण सुविधा आज सुरू करण्यात आली. यावेळी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, पाकिस्तान दहशत पसरवण्यासाठी आणि मानवी जीवन उद्धवस्त करण्यासाठी स्फोटके नेण्यासाठी ड्रोनचा वापर करतो तर भारताच्या ड्रोनने मानवजातीच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी जीवरक्षक लस आणि औषधे घेऊन जाणाऱ्या कोरोना योद्ध्याची भूमिका बजावली आहे. दोन्ही देशांमध्ये हाच मूलभूत फरक आहे, असे ते म्हणाले.
जम्मूतील मढ भागात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ (IB) ड्रोनद्वारे टाकण्यात आलेल्या कोरोना लसीच्या ५० कुप्यांच्या पहिल्या खेपेसंदर्भात डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन (CSIR) संस्थेने बंगळुरू येथे स्वदेशी पद्धतीने विकसित केलेला “ऑक्टाकॉप्टर” ड्रोन खऱ्या अर्थाने शांततेचा दूत आहे तर पाकिस्तान शांतता भंग करण्यासाठी ड्रोनचा वापर करत आहे. भारतीय ड्रोनने कोरोनामुळे जीवित हानी टाळण्यासाठी आणि प्रत्येकासाठी आरोग्य आणि कल्याण सुनिश्चित करणारा संदेश आंतरराष्ट्रीय सीमेवर पोहोचवला आहे .
डॉ जितेंद्र सिंग म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतातील लसीकरण मोहिमेचे महामोहिमेत रूपांतर झाले आहे आणि प्रत्येक नागरिक त्यात आपल्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे. ” विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने, पंतप्रधान मोदींच्या ‘हर घर दस्तक’ मोहिमेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि दुर्गम भागातील घरांपर्यंत पोहोचेल असे ड्रोन विकसित केले. एकही व्यक्ती लसीकरणाविना राहू नये यासाठी प्रत्येक घराचा दरवाजा ठोठावण्याचे कार्य ड्रोन बजावेल असे ते म्हणाले.
या प्रसंगी, जम्मू आणि काश्मीरच्या नायब राज्यपालांचे आरोग्य सल्लागार राजीव भटनागर यांच्या उपस्थितीत डॉ जितेंद्र सिंग यांनी औपचारिकपणे कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली खेप ड्रोन ऑपरेटर्सकडे सुपूर्द केली, जी हवाई मार्गे नेण्यात आली.
डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, सीएसआयआर-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसिन (आयआयआयएम), जम्मूकडून सरकारी उपजिल्हा रुग्णालय, मढ, जम्मू येथे कोरोना प्रतिबंधक लसीचे यशस्वी हवाई वितरण, मोदी सरकारची दुर्गम भागातील जनतेच्या आरोग्यसेवा गरजांप्रति वचनबद्धता दर्शवते. जम्मू ते मढ हे रस्तेमार्गे अंतर सुमारे १५ किमी असून ५० ते ६० मिनिटे लागतात, परंतु ऑक्टाकॉप्टरने १५ मिनिटांत कोरोना लसीची वाहतूक केली.