तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. कर्मचाऱ्यांचा त्यात दोष नाही. दोष असलाच तर आपल्या भारतीयांच्या मानसिकतेचा आहे. आपण अवतारांची वाट पाहत बसतो. कोणीतरी येईल, आपला उद्धार करेल. त्यात अनेकदा जीवन संपतं, पण समस्या आहे तशाच राहतात. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना एक कळकळीची विनंती आहे, त्यांनी आता अवतारांची वाट पाहत बसू नये. जे त्यांच्या शक्तीचा वापर करून आपलं दुकानं चालवू पाहतात, त्यांना कट मारून पुढे जावं. आपले निर्णय आपण घ्यावे. आज एसटीतील मित्रांसाठी त्यांच्या भाषेतीलच काही शब्द वापरून लिहितो.
ड्रायव्हिंग सीटवर बसलेला एसटी चालक मागे बसलेल्यांचं ऐकून बस चालवेल, तर जसा गाडीसह तोही अपघातग्रस्त होण्याची भीती वाढते, तसंच एसटी संपाचं बाहेरच्या पुढाऱ्यांमुळे होऊ शकतं. त्यातही तसं मार्गदर्शन करणारे जर आपलं कौशल्य असलेला व्यवसाय सोडून भलत्याच धंद्यात घुसू पाहणारे असतील तर जास्तच काळजी घ्यावी. अर्थात हे हायवेला गाडी चालवताना ओव्हरटेक करणाऱ्या उतावळ्यांना सफाईनं टाळणाऱ्या एसटीवाल्यांना माझ्यासारख्यानं सांगायची गरज आहे, असं नाही. ते जाणते आहेत. फक्त आपल्या डोळ्या-कानांनी पाहत-ऐकत आपल्याच डोक्यानं त्यांनी विचार करण्याची गरज आहे.
मुळात दीर्घ काळानंतर मिळालेल्या वेतनवाढीनंतरही एसटी कर्मचारी संपावरच का अडलेत, हेही थोडे समजून घेतले पाहिजे. त्यांचा कोणावर म्हणजे कोणावरच विश्वास राहिलेला नाही. ते ज्यांची चाकरी करतात, ते एसटी महामंडळ फक्त सेवेसाठी त्यांना वापरत आलं. ते वेळेवर वेतनाचं साधं कर्तव्यही बजावत नाही. त्यांनी वर्षानुवर्षे ज्यांना वर्गणी देत आपले नेता मानले तेही अनेकदा संघटनेची राजकीय निष्ठा पाहत धोरण ठरवत राहिले. त्यांची बांधिलकी राजकीय पक्षांशी, नेत्यांशी जेवढी दिसली तेवढी कर्मचाऱ्यांशी कधीच दिसली नाही. त्यांना आजवर मिळाली ती आश्वासनं, आश्वासनं आणि फक्त आश्वासनंच! त्यामुळे आधी त्यांनी मान्यताप्राप्तचा मळवट भरलेले गायब होताच वेगळा मार्ग घेतला. त्यानंतर जेव्हा ते नेतृत्वविहीन लढत होते, तेव्हा तिथं आलेले भाजपा नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतांना त्यांनी फार विचार न करता आपलं नेते मानलं. कोणीतरी आधार त्यांनाही पाहिजेच होता. पण पडळकरांच्या तोंडाळपणाचा एकच छंद त्यांना भोवू लागला. त्यात परिवहन मंत्रीपदी बसलेले अॅड. अनिल परब हेही ताठरच राहिलेत. त्यामुळे संप लांबला. पुढे सुदैवाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अनिल परब यांना अजित पवारांसह बोलवून समजवले. परिवहन मंत्र्यांनी वागण्याची गाडी योग्य मध्यम लेनमध्ये नेली. त्यातूनच वेतनवाढ, वेळेवर पगाराची हमी अशा महत्वाच्या घोषणा झाल्या. खरंतर वरवर पाहिलं तर मग ताणून धरण्यात कर्मचारीच अति करत असल्याचं वाटू शकतं. पण थोडा शांतपणे विचार केला तर लक्षात येतं, ते तसे का वागत आहेत?
वंगण नसेल तर खडखडाट होणारच!
जर बसच्या आवश्यक त्या भागांमध्ये वंगण नसेल, इंजिन ऑइल नसेल तर जसा खडखडाट होतो, तसाच खडखडाट व्यवस्थापन – कर्मचारी यांच्यात संवाद नसेल तर संस्थेच्या कामकाजातही होतो. एसटीत नेमकं तेच घडताना-बिघडताना दिसतं. किमान आता तरी हडेलहप्पी सोडून व्यवस्थापनानं कर्मचाऱ्यांशी आपुलकीचा संवाद साधावा. त्यातून बरंच काही साध्य होईल.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी सुरुवातीपासूनची नकोशी ताठर भूमिका सोडून मध्यम मार्ग स्वीकारला, हे चांगलं केलं. त्यांनी वेतनवाढ दिली. त्यांनी वेतनाची हमी दिली. चांगलंच. पण फक्त आताही त्यांनी थेट कारवाईचा ताठरपणा दाखवू नये, असे वाटते. उठता-बसता, दिसला कॅमेरा की दे इशारा, यातून नेता नाही हुकूमशहा दिसतो. लोकशाहीत नाही चालत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृषी कायदे माघारीतून तेवढा धडा तरी प्रत्येकानं शिकलाच पाहिजे. त्यातही तीन पक्षांच्या सत्तेत आणि समोर मजबूत विरोधी पक्ष असताना तर तसं चालणार नाहीच नाही. त्यांचा ताठरपणा हा एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकवणाऱ्यांसाठी इंधनांचं काम करतोय. त्यांनी तसं होऊ देऊ नये. शिस्त आवश्यकच. पण जसं एसटी कर्मचाऱ्यांनी ताणू नये, तसं त्यांच्या हक्काच्या मत्र्यांनीही थोडं समजून घ्यावं!
एसटी कर्मचाऱ्यांनी भलत्यांचं ऐकू नये!
सध्या आऊटसोर्सिंगचा काळ आहे. एसटीतही स्वच्छतेची सेवा आऊटसोर्स केली गेली तशी अनेक कामे सध्याच्या काळात आऊटसोर्स केली जातात. सर्व आऊटसोर्स करावं, पण स्वत:ची विचार प्रक्रिया स्वत:चीच असावी. थॉट प्रोसेस आऊटसोर्स करू नये. कुणी म्हणजे कुणीच. आपली विचारप्रक्रिया अन्य कुणाची नसावी. आपलं डोकं आपणच चालवावं. दुसऱ्याच्या डोक्यानं चाललं तर नुकसानच. जसं एसटी चालकानं मागच्याचं ऐकून गाडी चालवली तर अपघाताची भीती वाढते, तसंच या संपाचंही होईल.
विलिनीकरणाचं काय?
एसटीचं सरकारमध्ये विलिनीकरण झालंच पाहिजे. आजही त्याबाबतीत दुमत असू शकत नाही. इतर महामंडळे आणि एसटीत फरक आहे. एसटी ही सर्वसामान्यांच्या हिताची सार्वजनिक वाहतूक सेवा आहे. ग्रामीण – निमशहरी भागाच्या प्रगतीसाठी एसटीची लालपरीच गती देते. एसटीसारख्या जनहिताच्या उद्देशानं खासगी सेवा चालणारच नाही. त्यामुळे एसटीचं सरकारी विलिनीकरण गैर नाही. आवश्यकच. पण एसटी कर्मचाऱ्यांनीही एक लक्षात घेतलं पाहिजे की पडळकर-खोतांनी त्यांच्या शैलीत कितीही आक्रमक तोंडाळपणा दाखवला, तरी पुढे सत्ता सांभाळलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका कळताच त्यांनी मध्यम मार्ग स्वीकारला. ताठरपणा दाखवणाऱ्या अनिल परब यांना अनुभवी मुरब्बी नेते शरद पवारांच्या सल्ल्यानंतर मध्यम मार्ग पटला. तशीच एसटी कर्मचाऱ्यांकडून अपेक्षा आहे.
सरकारी सेवेत गेल्यामुळे पगाराची हमी मिळेल हा सर्वात मोठा फायदा होईल. आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी सरकारतर्फे दहा तारखेच्या आत पगाराची हमी दिली आहे. त्यामुळे वेतनवाढीच्या जोडीने ते वेळेवर मिळण्याची हमी मिळाली आहे. त्यामुळे थोडा समजूतदारपणा एसटी कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित आहे. याचा अर्थ असा नाही की एसटी विलिनीकरणाची मागणी सोडून द्यावी. ती कायमच ठेवावीच. पण आता काहीसं यश मिळवून त्याबळावर पुढच्या मुख्य लढ्यासाठी आणखी बळ मिळवावे. त्यासाठी बेगमी करावी.
नको त्यांना दूर ठेवा!
सुप्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांना आझाद मैदानात अतिआक्रमकतेने बोलताना पाहिलं. त्यांचं ते बोलणं-वागणं कायदेतज्ज्ञापेक्षा गल्लीबोळातील कार्यकर्त्यालाही न शोभणारा थयथयाट वाटला. त्यांनी तसं वागू नये. त्यांनी लढाऊपणा दाखवावाच. पण आक्रमकता हा तर्कशुद्ध असावा. तसा तो नसेल तर फसतो. असं नेतृत्व तयार होतं नसतं. त्यांना एक विनंती, संघर्ष असा करा की यशस्वी होईल. ताणून एसटी कर्मचारी संपेल असा नसावा.
सदावर्तेसाहेब समजूतदारपणे वागतील अशी खात्री आहे. कारण मराठा आरक्षणाच्या काळात टोकाची भूमिका घेत कोरोना वायरस वगैरे शब्द वापरणारे सदावर्ते आता एक मराठा लाख मराठा घोषणा देताना दिसतात. तो त्यांचा सर्वसमावेशकतेकडचा प्रवासासाठीचा समजूतदारपणाच म्हणावा लागेल. तसंच एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्यातील किती आणि कसे कमालीचे बदल होऊ शकतात, ते दाखवणारा इशाराही!
एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांना उपयोगी अशी मदत घ्यावी. पण अशी घेऊ नये जी भोवेल. ते समजुतदार आहे. भरलेली एसटी खड्ड्यांच्या रस्त्यावर, घाटांच्या वळणांवर कौशल्यानं चालवतात. त्यांना त्यांच्या स्वत:च्या जीवनातील हे अवघड वळण कौशल्यानं घ्यावंच लागेल. ते यशस्वी होतीलच. याची खात्री आहे.
(तुळशीदास भोईटे हे मुक्तपीठ मुक्त माध्यम उपक्रमाचे संपादक आहेत)
संपर्क 9833794961 ट्विटर @TulsidasBhoite