मुक्तपीठ टीम
राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी नुकतीच दुबई सिलिकॉन ओअॅसिस (DSO) च्या इंटिग्रेटेड फ्री झोन टेक्नॉलॉजी पार्कला भेट दिली. राज्य शासनाच्या शिष्टमंडळासह मंत्री नवाब मलिक यांनी ‘पिपल हॅप्पिनेस ॲण्ड इनोव्हेशन’चे वरिष्ठ उपाध्यक्ष गनीम अल फलासी यांची भेट घेतली. आपल्या भेटीदरम्यान त्यांनी दुबई सिलिकॉन ओअॅसिस आणि दुबई टेक्नॉलॉजी आंत्रप्रनर कॅम्पस (DTEC) यांचा दौरा केला. या भेटीचा एक भाग म्हणून मंत्री नवाब मलिक आणि गनीम अल फलासी यांनी राज्यातील स्टार्टअप्सना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राची नोडल एजन्सी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी [MSInS] आणि दुबई टेक्नॉलॉजी आंत्रप्रनर कॅम्पस यांच्यातील संभाव्य भागीदारीच्या मुद्यांचा अभ्यास केला.
दुबई टेक्नॉलॉजी आंत्रप्रिनर कॅम्पस मध्यपूर्वेतील तंत्रज्ञान स्टार्टअप्सना पाठिंबा देण्यास कार्यरत आहे आणि सध्या ७५ देशांमधील १,००० हून अधिक स्टार्टअप्सचे केंद्र आहे. यामध्ये प्रगत तंत्रज्ञान जसे की ब्लॉकचैन, कृत्रिम बुद्धिमत्ता इत्यादि क्षेत्रांत काम करणाऱ्या स्टार्टअप्सचा समावेश आहे. तंत्रज्ञानकेंद्रित स्टार्टअप्स, नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच प्रगत सुविधा प्रदान करण्यासाठी दुबई टेक्नॉलॉजी आंत्रप्रनर कॅम्पस बांधील असून याअंतर्गत अत्याधुनिक को-वर्किंग स्पेसेस, एक्सीलेरेटर, व्हीसी फंड, आयडिया व्हॅलिडेशन, सल्लागार सेवा इत्यादी सेवा पुरवण्यात येतात.
महाराष्ट्र राज्यात भारतातील सर्वाधिक स्टार्टअप्स नोंदणीकृत असून, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, महाराष्ट्र शसनाच्या नाविन्यतेस पूरक वातावरणामुळे राज्यातून १६ युनिकॉर्नस तयार झालेले आहेत.
भागीदारीविषयी बोलताना मंत्री श्री.मलिक म्हणाले की, ” दुबई सिलिकॉन ओअॅसिस (DSO) आणि दुबई टेक्नॉलॉजी आंत्रप्रनर कॅम्पस (DTEC) या भेटीचा उद्देश भारत व दुबई यांच्यातील नाविन्यता परिसंस्थेसंबंधीत धोरणात्मक संबंध मजबूत करणे आहे. आम्हाला विश्वास आहे की दुबई टेक्नॉलॉजी आंत्रप्रनर कॅम्पस व महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जास्तीत जास्त स्टार्टअप्सना मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका (MENA) प्रदेशात विस्तार करण्यास मदत होईल. तसेच कौशल्य विकास विभागाच्या इतर क्षेत्रांसाठी दुबई टेक्नॉलॉजी आंत्रप्रनर कॅम्पस सोबत भागीदारी करण्यात येईल.
गनीम अल फलासी म्हणाले की, जगातील तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसाठी दुबई हे एक आकर्षक केंद्रबिंदू असून, दुबईने नाविन्यपूर्ण वातावरण असलेल राष्ट्र म्हणून स्वत:ची ओळख बनवली आहे. “संयुक्त अरब अमिराती आणि भारत शतकानुशतके प्रमुख व्यापारी भागीदार आहेत. खरे तर २०१९-२० मध्ये सुमारे ५९.१२ अब्ज डॉलर्सच्या द्विपक्षीय व्यापारासह संयुक्त अरब अमिराती हा भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. भारताबरोबर व्यवसाय आणि व्यापार संबंध सुलभ करण्यासाठी संयुक्त अरब अमिराती आणि दुबईने उचललेली पावले पाहता ही आकडेवारी भविष्यात अजून जास्त वाढेल याची मला खात्री आहे. याचाच एक भाग म्हणून दुबई सिलिकॉन ओअॅसिस भारतीय कंपन्यांना त्यांचे व्यवसाय धोरण आणि कामकाज सुरळीत करण्यासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रतिबद्ध आहे.
अल फलासी यांनी महाराष्ट्रातील कंपन्यांना या प्रदेशात त्यांचे व्यवसाय स्थापित करण्यासाठी आणि त्यांचा विस्तार करण्यासाठी अनुकूल वातावरण प्रदान करण्याच्या दुबई सिलिकॉन ओअॅसिसच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. उद्योजकीय परिसंस्थेस पाठिंबा देण्यासाठी आणि उद्योजकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना पडताळून स्थापित करण्यास सक्षम करण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि माहिती केंद्र म्हणून काम करण्याच्या दुबई सिलिकॉन ओअॅसिसच्या बांधिलकीवरही त्यांनी भर दिला.
भारतातील थेट परकीय गुंतवणुकीसाठी (एफडीआय) महाराष्ट्र हे सर्वात आकर्षक ठिकाण आहे आणि २००० ते २०२१ या काळात भारतात येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीच्या जवळजवळ ३० टक्के गुंतवणूक झाली आहे. या करोना साथीच्या काळात महाराष्ट्राने ऑक्टोबर २०१९ ते जून २०२१ या काळात सुमारे २७.५ अब्ज डॉलर्सची (१०१.१४ अब्ज दिराम) गुंतवणूक आकर्षित केली आहे. भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात राज्याचे योगदान सुमारे १५ टक्के आहे आणि देशासाठी निर्यात आणि रोजगार निर्मितीत त्याचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.