मुक्तपीठ टीम
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आज मतदान होत आहे. जिल्हा बॅंकेचे एकूण २५७३ मतदार असून जिल्ह्यात एकूण १२ ठिकाणी मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. जिल्हा बॅंकेच्या एकूण १८ संचालक जागांसाठी ४६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर २३ नोव्हेंबरला मंगळवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
सहकारी सोसायटी गट , इतर शेती संस्था गट , कृषी पणन व प्रक्रिया संस्था गट , नागरी बँका व पतसंस्था गट अशा गटामधून ही निवडणूक होत आहे. या निवडणुकी साठी इतिहासात प्रथमच भाजपाचे पॅनल लागले आहे. भाजपाच्या शेतकरी विकास पॅनल विरोधात महाविकास आघाडी चे सहकार विकास पॅनल अशी लढत होत आहे. सहकार विकास पॅनलने १८ तर शेतकरी विकास पॅनलने १६ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
या बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व राजकीय मुद्दे बाजुला ठेवून सर्व पक्ष निवडणूकीत उतरले आहेत. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संपूर्ण जिल्ह्यात २१९ शाखा आहेत. तर १२५० कर्मचारी असलेल्या या बँकेत ६४२३ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. साखर कारखाने , सूतगिरण्या , औद्योगिक संस्था अशा विविध प्रकारच्या संस्थांना बँकेने ५ हजार ३०० कोटींचे कर्ज दिले आहे. तर २०२०-२१ या आर्थिक वर्षात बँकेने १२ हजार कोटींचा व्यवसाय केला आहे.
शिराळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मानसिंगराव नाईक , खानापूरमधून शिवसेनेचे आमदार अनिल बाबर , तर पलूस मधून काँग्रेसचे नेते महेंद्र लाड हे यापूर्वी च बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा जिल्हा बॅंकेत एंट्री करते की जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेच वर्चस्व राहते हे स्पष्ट होणार आहे.