मुक्तपीठ टीम
केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने (CCRAS) ने कोरनाच्या सौम्य आणि लक्षणे नसलेल्या आणि सौम्य ते मध्यम लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांसाठी आयुष-६४ या प्रभावी औषधाचे तंत्रज्ञान ४६ कंपन्यांकडे हस्तांतरित केले आहे.
यापूर्वी आयुष मंत्रालयाच्या IMPCL या उत्पादन युनिटसह केवळ ७ कंपन्यांकडे परवाना होता, ज्यांचा वापर मलेरियावरील उपचारांसाठी केला जात असे. कोविडच्या प्रादुर्भावाच्या काळात कोरोनावर ते प्रभावी आढळल्यानंतर, ३९ नवीन कंपन्यांना नवीन परवाने देण्यात आले म्हणजे त्यांच्याकडे तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यात आले आहे.
आयुष-६४ हे CCRAS ने विकसित केले आहे, जी आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत आयुर्वेदातील संशोधनासाठी प्रमुख संस्था आहे. मलेरियाच्या उपचारासाठी १९८० मध्ये ते विकसित केले गेले. मार्च २०२० मध्ये कोविडच्या पहिल्या लाटेदरम्यान, काही वैज्ञानिक अभ्यासात ते कोरोनाच्या सौम्य आणि लक्षणे नसलेल्या आणि सौम्य ते मध्यम संसर्गामध्ये खूप प्रभावी असल्याचे आढळले. यात विषाणूंशी लढण्याचे गुणधर्म देखील असून शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि ताप उतरतो, रुग्णांना लवकर बरे होण्यास मदत होते.
कोविडच्या पहिल्या लाटेदरम्यान, आयुष मंत्रालय आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) सोबत याची क्लिनिकल चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये असे दिसून आले की आयुष-६४ हे कोविड रूग्णांसाठी खूप फायदेशीर औषध आहे. आत्तापर्यंत यावर ८ क्लिनिकल चाचण्या करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये घरात विलगीकरणात असलेल्या ६३ हजार रुग्णांवर आयुष-६४ देण्यात आली आणि हे औषध फायदेशीर असल्याचे आढळून आले. ८ क्लिनिकल चाचण्यांमध्ये ५ यादृच्छिक आणि दोन स्वतंत्र अभ्यास देखील होते, ज्यात रुग्णांना केवळ आयुष-६४ औषध दिले गेले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपूर्वी, आयुष मंत्रालयाचे उत्पादन युनिट आयएमपीसीएलसह सात कंपन्याकडे आयुष-६४ च्या उत्पादनाची जबाबदारी होती. मात्र आता हे तंत्रज्ञान ३९ कंपन्यांकडे हस्तांतरित करण्यात आले आहे, ज्यामुळे हा आकडा ४६ वर पोहोचला आहे.
या निर्णयामुळे त्याच्या उत्पादनात वाढ होईल आणि त्याची मागणी पूर्ण करणे देखील सोपे होईल. आजपर्यंत, या औषधाचे कोणतेही दुष्परिणाम आढळून आलेले नाहीत, तरीही तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच ते घेण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे.