मुक्तपीठ टीम
अखेर मोदी सरकारला शेतकऱ्यांसमोर झुकत तीन नवीन कृषी कायदे मागे घ्यावे लागले आहेत. ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली, तो १९ नोव्हेंबर हा दिवस माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीचा. त्यामुळे एक आठवण पुन्हा चर्चेत आली आहे. शेतकरी शक्तीपुढे झुकणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान नाहीत. त्यांच्याआधी दिवंगत राजीव गांधी शेतकऱ्यांपुढे नममस्तक झाले होते. तो दिवस दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींच्या पुण्यतिथीचा होता. योगायोग असा की आता शेतकरी आंदोलनाच्या नेत्यांपैकी एक असणाऱ्या राकेश टिकैत यांचे वडिल महेंद्रसिंह टिकैत यांनी ३२ वर्षांपूर्वीच्या त्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते.
३२ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी घडवला होता इतिहास!
- ३१ ऑक्टोबर १९८८ मध्ये इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी दिवशी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनाही शेतकऱ्यांपुढे नतमस्तक व्हावे लागले होते.
- ३२ वर्षांपूर्वी राजीव गांधींनी शेतकऱ्यांना ३५ मागण्यांवर निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर ३१ ऑक्टोबर १९८८ रोजी बोट क्लबचे आंदोलन संपले होते.
- विशेष म्हणजे त्यावेळी आंदोलनाचे नेतृत्व महेंद्रसिंग टिकैत करत होते.
३२ वर्षांनी पुन्हा शेतकरी जिंकले!
- नवीन कृषी कायदे मागे घ्यावेत आणि पिकाला किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळावी यासाठी आंदोलन करणारे शेतकरी मागे हटायला तयार नव्हते.
- पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकरी कित्येक दिवस दिल्ली सीमेवर उभे आहेत.
- तसेच ३२ वर्षांपूर्वी दिल्लीच्या बोट क्लबवर हल्ला करून शेतकऱ्यांनी दिल्ली ठप्प केली होती.
- जोपर्यंत सरकार कायदा मागे घेत नाही तोपर्यंत आपण हटणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला, तसाच त्यावेळी आपल्या मागण्यांसाठी शेतकरी उभे ठाकले होते.
काय घडले होते ३२ वर्षांपूर्वी?
- ३२ वर्षांपूर्वी २५ ऑक्टोबर १९८८ रोजी शेतकरी नेते महेंद्र सिंह टिकैत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय किसान युनियनचे लोक आपल्या मागण्या घेऊन दिल्लीतील बोट क्लबवर सभा घेणार होते.
- वीज कपात, सिंचन दर आणि पिकांचे रास्त भाव यासह ३५ कलमी मागण्यांसाठी पश्चिम उत्तर प्रदेशातून शेतकरी मोठ्या संख्येने दिल्लीत येत होते, त्यांना दिल्लीच्या लोणी सीमेवर पोलीस प्रशासनाने जबरदस्तीने रोखले.
- शेतकरी थांबले नाहीत, लोणी सीमेवर पोलिसांनी गोळीबार केला आणि दोन शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला.
- पोलिसांच्या गोळीबारात कुतबी येथील राजेंद्र सिंह आणि तितौली येथील भूप सिंह यांचा मृत्यू झाला.
- असे असतानाही शेतकरी दिल्लीत पोहोचले होते.
- दिल्लीच्या बोट क्लबपर्यंत पोहोचून देशातील १४ राज्यांतील ५ लाख शेतकऱ्यांनी दिल्ली पूर्णपणे ठप्प करून टाकली होती.
- इंडिया गेट, विजय चौक, बोट क्लब येथेच शेतकरी दिसत होते.
- शेतकऱ्यांनी आपल्या बैलगाड्या, ट्रॅक्टर बोट क्लबवर उभ्या केल्या होत्या.
काँग्रेस मेळाव्याच्या व्यासपीठावरही शेतकऱ्यांचा ताबा!
- त्या दिवसांत दिल्लीच्या बोट क्लबमध्ये माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त (३१ ऑक्टोबर) होणाऱ्या मेळाव्यासाठी रंगरंगोटी आणि रंगकाम सुरू होते.
- या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेले व्यासपीठही शेतकऱ्यांनी काबीज केले.
- लुटियन्स परिसरात ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी ताबा मिळवला होता, त्यावरून मंत्र्यापासून अधिकाऱ्यांपर्यंत नाराज झाले होते.
- महेंद्रसिंग टिकैत यांच्या नेतृत्वाखाली १२ सदस्यीय समितीने राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्ष बलराम जाखड यांची भेट घेतली, मात्र कोणताही निर्णय होऊ शकला नाही.
- शेतकऱ्यांना राजपथावरून हटवण्यासाठी पोलिसांनी ३० ऑक्टोबर १९८८ च्या रात्री शेतकऱ्यांवर लाठीमार केला होता.
- आठवडाभराहून अधिक काळ शेतकऱ्यांनी राजपथ आपल्या ताब्यात ठेवला होता.
- अखेर सरकारला शेतकऱ्यांपुढे नमते घ्यावे लागले.
तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांची माघार
- तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी शेतकऱ्यांना ३५ मागण्यांवर निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर ३१ ऑक्टोबर १९८८ रोजी बोट क्लबचे आंदोलन संपले.
- मात्र, शेतकरी रॅलीमुळे राजीव गांधींना त्यांच्या आई इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या रॅलीचे ठिकाण बदलावे लागले.
- बोट क्लबऐवजी लाल किल्ल्यामागील मैदानावर रॅली काढावी लागली.