मुक्तपीठ टीम
लखीमपूर शेतकरी हत्याकांड प्रकरणी फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या (एफएसएल) अहवालात गोळीबार झाल्याची पुष्टी झाली आहे. एफएसएल अहवालानुसार, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आणि हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा आणि त्याचा साथीदार अंकित दास यांच्या शस्त्रांमधूनच गोळीबार झाल्याची बॅलिस्टिक अहवालात पुष्टी झाली आहे. तसेच पत्रकार रमण कश्यप यांचा मृत्यू हा जमावाच्या मारहाणीत नाही तर शेतकऱ्यांप्रमाणेच गाडीखाली चिरडून झाल्याची माहितीही उत्तर प्रदेश सरकारची मांडणारे ज्येष्ठ वकील हरिष साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली आहे.
तीन ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरीतील टिकुनिया भागात आंदोलक शेतकऱ्यांवर झालेल्या हिंसाचारादरम्यान परवानाधारक शस्त्राने गोळीबार झाल्याचा आरोप झाला होता. आता एसआयटी तपासादरम्यान लखिमपूर पोलिसांनी आशिष मिश्राची रायफल आणि रिव्हॉल्व्हर,अंकित दासची बंदूक, पिस्तूल जप्त केले होते. या चार शस्त्रांमधूनच गोळीबार झाल्याचे एफएसएल अहवालातून उघड झाले आहे. शेतकरी लावत असलेल्या आरोपांवर त्यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे.
लखिमपूर शेतकरी हत्याकांडावर सर्वोच्च न्यायलयाची कडक भूमिका
लखिमपूर खेरी हिंसाचाराच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेमुळेच मत्रीपुत्रासह साथीदारांना अटक झाली आहे.
सोमवारच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले होते की, सीबीआय प्रत्येक समस्येवर उपाय नाही. आम्हाला ही जबाबदारी एका स्वतंत्र न्यायाधीशाकडे द्यायची आहे, जो आरोपपत्र दाखल होईपर्यंत रोजचा आढावा घेत राहतील. पोलिसांचा तपास एका विशेष व्यक्तीला वाचवण्यासाठी सुरु असल्याचे दिसते. पुढील सुनावणी शुक्रवारी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. यादरम्यान उत्तर प्रदेश सरकारला तपासासाठी योग्य नावं सुचवावी लागतील.