मुक्तपीठ टीम
केवळ क्रिकेट आणि फुटबॉल आता फक्त मैदानावर खेळले जात नाहीत, तर ऑनलाईन मैदानातही रंगतात. ऑनलाइन खेळल्या जाणाऱ्या खेळांचा व्यवसाय देशात झपाट्याने फोफावत आहे. यामुळेच सरकार आता यासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे आणण्याच्या तयारीत आहे जेणेकरुन, फँटसी खेळ व्यवसायात दडलेल्या प्रचंड क्षमतेचा वापर करता येईल आणि त्याचवेळी जुगाराचा धोका टाळता येईल. तज्ज्ञांच्या मते, भारतात सध्या ऑनलाइन फँटसी गेम्ससाठी कोणताही स्पष्ट कायदा नाही. गरज भासल्यास यासंबंधीची प्रकरणे १८६७ च्या दि पब्लिक गॅम्बलिंग अॅक्ट कायद्यांतर्गत ठेवता येतील.
काही महिन्यांपूर्वी, ऑनलाइन फँटसी गेम्सबाबत राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी नीती आयोगाने पुढाकार घेतला होता. त्यासंबंधी एक मसुदा जारी करण्यात आला होता. आता पुन्हा ऑनलाइन फँटसी गेम्ससंदर्भात राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे आणण्यासाठी वेगानं प्रयत्न सुरु आहेत. अशा गेम्सबाबत राज्यांनी वेगवेगळे कायदे आणले तर त्याच्याशी संबंधित व्यवसायाच्या विकासावर परिणाम होण्याची भीतीही सरकारला आहे. अलीकडेच, कर्नाटकाने ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालण्यासाठी आपल्या पोलीस कायद्यात सुधारणा केली आहे. त्यामुळे त्या राज्यात त्याला जुगाराच्या श्रेणीत ठेवले जाईल. तर उद्योग क्षेत्रातील लोकांच्या दाव्यानुसार, ऑनलाईन गेम हे जुगार नसून कौशल्याचे खेळ आहेत.
भारत जगातील सर्वात मोठी पाचव्या क्रमांकाची बाजारपेठ
- फिक्कीच्या गेमिंग कमिटीचे संयोजक आणि ऑल इंडिया गेमिंग फेडरेशनचे सीईओ रोलँड लँडर्स यांच्या मते, भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाचा ऑनलाइन गेमिंग बाजार आहे.
- हे एक नवे क्षेत्र आहे ज्यांची उलाढाल २०२५ पर्यंत ३ अब्जापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
- कर्नाटक सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयामुळे स्टार्टअप क्षेत्राला धक्का बसला आहे.
जीएसटी ३००० कोटींपर्यंत मिळू शकतो
- केपीएमजी आणि प्राइसवॉटरहाऊस कूपर्सच्या अहवालानुसार, येत्या तीन ते पाच वर्षांत ऑनलाइन फँटसी गेम्सच्या व्यवसायात भारतात १०,००० कोटी रुपयांपर्यंतची विदेशी गुंतवणूक शक्य आहे.
- एवढेच नाही तर या गेम्सच्या व्यवसायातून भारताला वार्षिक ३००० कोटींपर्यंतचा जीएसटी मिळू शकतो.
- ऑनलाइन फँटसी गेम व्यवसायामुळे पुढील तीन ते पाच वर्षांत ५००० प्रत्यक्ष आणि ७००० अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
मिळालेल्या आकडेवारीनुसार पुढील माहिती
- १०० दशलक्षाहून अधिक लोक ऑनलाइन फॅंटसी गेम खेळतात.
- १० हजार कोटींपर्यंत विदेशी गुंतवणुकीची शक्यता २१२ टक्के गेमर्स वाढले.
- २०१६ मध्ये १० कंपन्या व्यवसाय करायच्या यामध्ये सध्या १४० कंपन्यांचा सहभाग आहे.
- २०१८-१९ या आर्थिक वर्षात एकूण व्यवसाय ९२० कोटी होता.
- आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये एकूण व्यवसाय २,४७० कोटी रुपये आहे.
- सध्या एकूण उलाढाल २५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
- ऑनलाइन गेमिंगमध्ये आघाडीवर फॅंटसी गेम आहे.