मुक्तपीठ टीम
अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळं शेती करणं अवघड होत चाललं आहे. रोजच वाईट बातम्या येत असतात. मात्र, शेतीच्या नकारात्मक बातम्यांच्या गर्दीत नांदेडची ही सकारात्मक बातमी नवी उभारी देणारी. नांदेड येथील मुदखेडमध्ये बालाजी राचेवार राहतात. आता ते पूर्णवेळ शेतकरी आहेत. पूर्वी नव्हते. पण त्यांनी डोकं वापरून परिश्रमानं यश असं मिळवलं की इतर व्यवसायांपेक्षा शेतीच फायद्याची ठरली.
बालाजी राचेवार यांच्या शेतीतून पूर्वी काही कॅरेट टॉमेटो निघत होते. आता तिथे पन्नास कॅरेट टोमॉटो निघतात. तब्बल पाच एकरात लावलेल्या टॉमेटोमुळे राचेवार यांना वर्षाअखेर तीस लाखांचे उत्पन्न मिळत आहे. पूर्वी बालाजी टेलरिंगसह फोटोग्राफीचा व्यवसाय करत असत. पूर्ण वेळ शेतीला देता यावा म्हणून ते व्यवसाय सोडले. समाजाने मुलांना नोकरीपेक्षा शेती व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे असे बालाजी राचेवार सांगतात.
शेतीचे नित्य नवे प्रयोग
राजेवार हे सातत्याने शेती विषयक वेगवेगळे प्रयोग करत असतात. मागच्या वर्षी बालाजी यांनी काकडीचे पीक घेतले. ती जागा रिकामी होताच त्याच क्षेत्रात आंतरमशागत न करता नॉन बीटी संकरीत कापसाची लागवड केली . या कपाशीला रसशोषक किडींचा प्रादुर्भाव बीटी कपाशीपेक्षा कमी होतेा, असे बालाजी सांगतात.
एकरी 28 टन पपई
त्यांनी सन 2017 मध्ये पपई ह्या पीकाचे एकरी 28 टन उत्पादन मिळवले. आता साडेतीन एकरावर पपईची लागवड करून एकरी 28 टनांपर्यंत विक्रमी उत्पादन ते घेत आहेत. यातून एक ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळत आहे.
फळाचा आकार एकसारखा व फळे रसाळ असल्याने मोठी मागणी होती. 7 रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाली. नांदेडसह परभणी व लातुरमध्येही त्यांच्या पपईला कायम मागणी होती.
अठरा महिन्यांत केळीचे दोन हंगाम
केळीचा पहिला हंगाम घेतल्यानंतर पिलबाग हमखास ठेवतातच. त्यात दोन सरींआड एक सरी काढून टाकतात. या रिकाम्या सरीत केळीची खोडे व अन्य अवशेष टाकले जातात.
केळीच्या ऊतिसंवर्धित रोपांची लागवड केली जाते. अठरा महिन्यांत पाच एकरांत केळीचे दोन हंगाम यशस्वीपणे घेतले आहेत. केळीचा सरासरी 23 ते 26 किलोचा घड मिळतो. एकरी सुमारे 1500 झाडे आहेत. केळी दर्जेदार असल्याने प्रचलित बाजारभावापेक्षा दर चांगला मिळतो.
विविध पिकांची लागवड
राचेवार यांनी आपल्या 20 एकरातील शेतीत विविध पिकांची लागवड करून पिके घेतली आहेत. सन 2009 साली वरकस जमिनीत बोरवेल या जलस्त्रोताने ठिबक सिंचनाद्वारे कोल्हापुर जी- 9 या जातीच्या केळ्यांच्या 800 झाडांची लागवड करून 3 वर्ष उत्पादन काढले. यात त्यांना 2 लाख रूपये फायदा झाला. सन 2012 पासून ते टोमॅटोचे उत्पादन घेत आहेत. टोमॅटोतून त्यांना लाखोंचे उत्पादन मिळत आहे. पुढे कोबी, फ्लॉवरचे उत्पादन घेतले. विविध पिकांचे प्रयोग करीत असताना त्यांनी गत वर्षी घेतलेले कांद्याच्या पिकात 18 क्विंटल उत्पादनात साडे चार लाख रूपये नफा कमविला होता. आपल्या शेतात लागवड केलेला माल हा निजामबाद, परभणी, लातुरसह पुणे येथील बाजारात पाठवत असतात.
पाहा व्हिडीओ: