मुक्तपीठ टीम
आर्यन खान प्रकरणातील एनसीबीचा साक्षीदार प्रभाकर साईल याने शपथपत्राद्वारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि इतरांवर केलेल्या आरोपांमुळे संपूर्ण प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. याप्रकरणी वरिष्ठच प्रतिक्रिया देतील असे समीर वानखेडे यांनी सांगितले होते. त्यानुसार उपसंचालक मुथा अशोक जैन यांनी एक प्रसिद्धी पत्रक प्रकाशित केले आहे. त्यानुसार त्यांनी सदर शपथपत्र हे एनसीबीच्या महासंचालकांकडे पाठवले आहे. तसेच प्रभाकर साईल याने साक्षीदार असल्याने सोशल मीडियाऐवजी न्यायालयात बोलावे असे सुचवले आहे.
काय आहे एनसीबीच्या प्रसिद्धी पत्रकात?
एनसीबीच्या मुंबई युनिटच्या गुन्हा क्र. ९४/२०२१ मधील एक साक्षीदार प्रभाकर साईल याचे शपथपत्र सोशल मीडियातून निदर्शनास आले आहे.
ज्या दिवशी गुन्हा घडला त्या दिवशी म्हणजे २ ऑक्टोबरच्या त्यांच्या सर्व हालचाली त्यांनी मांडल्या आहेत.
प्रभाकर साईल या न्यायप्रविष्ट प्रकरणातील साक्षीदार असल्याने त्यांनी सोशल मीडियाऐवजी न्यायालयासमोर निवेदन मांडावे.
त्याशिवाय, प्रभाकर यांनी मांडलेले काहींविरोधातील आरोप हे त्यांनी ऐकलेल्या माहितीवर आधारित आहेत.
एनसीबी मुंबईचे झोनल संचालक समीर वानखेडे यांनी त्या आरोपांचा इंकार केला आहे.
त्यातील काही माहितीमुळे ते शपथपत्र एनसीबीच्या महासंचालकांकडे पाठवले असून त्यांना पुढील कार्यवाहीसाठी विनंती केली आहे.
मुथा अशोक जैन
उप महासंचालक
एनसीबी मुंबई