मुक्तपीठ टीम
जम्मू -काश्मीरमधून ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० हटवल्यानंतर जवळजवळ २५ महिन्यांनी गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदा जम्मू -काश्मीरला भेट देत आहेत. ते श्रीनगरला पोहोचतील. खोऱ्यामध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी घटनांमध्ये सामान्य लोकांवर हल्ले झाल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहा यांची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. शहा जम्मू -काश्मीरमध्ये तीन दिवस राहतील आणि अनेक महत्त्वाच्या बैठका घेतील. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठीचे हे अमित शाहांचं मिशन काश्मीर मानले जाते.
शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने काश्मीरमध्ये खास स्नायपर, ड्रोन आणि शार्पशूटर तैनात केले आहेत. त्यांना स्ट्रॅटेजिक पॉईंटची काळजी घेण्यासाठी पाठवण्यात आले आहे. श्रीनगरला पोहोचल्यानंतर शाह एलजी मनोज सिन्हा यांच्यासोबत राजभवनात गेले. येथे ते रॉ प्रमुख सामंत कुमार गोयल, वरिष्ठ लष्कर अधिकारी, आयबी प्रमुखांसह १२ मोठ्या सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठकही घेत आहेत.
युनिफाइड कमांड मीटमध्ये कोण-कोण सहभागी?
- आयबी प्रमुख अरविंद कुमार
- डीजीपी सीआरपीएफ आणि एनआयए कुलदीप सिंह
- डीजीपी एनएसजी आणि सीआयएसएफ एमए गणपती
- डीजीपी बीएसएफ पंकज सिंह, डीजीपी जे अॅंड के दिलबाग सिंह
- आर्मी कमांडर आणि तीन टॉप कॉर्प्स देखील सहभागी होणार आहेत.
शाहांच्या दौऱ्याच्यावेळी खोऱ्यात सुरक्षा कडक!
- गृहमंत्र्यांच्या भेटीसाठी संपूर्ण काश्मीरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
- आयबी, एनआयए, सैन्य, सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी सध्या जम्मू -काश्मीरमध्ये तळ ठोकून आहेत. ते प्रत्येक गुप्तचर माहितीवर लक्ष ठेवून आहेत.
- श्रीनगरमध्ये अतिरिक्त निमलष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत.
- सीआरपीएफच्या १० अतिरिक्त कंपन्या आणि बीएसएफच्या १५ अतिरिक्त कंपन्या केंद्रशासित प्रदेशात तैनात करण्यात आल्या आहेत.
- यासोबतच ड्रोन आणि इंटेलिजन्स कॅमेऱ्यांद्वारे चोवीस तास नजर ठेवली जात आहे.
- सीआरपीएफचे एक पथक दाल सरोवर आणि झेलम नदीत गस्त घालत आहे.
- प्रत्येक रस्ता आणि गल्लीबोळात कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे.
गृहमंत्री अमित शाहांचं मिशन काश्मीर
- अमित शाह श्रीनगर ते शारजाह या पहिल्या आंतरराष्ट्रीय विमानाचे उद्घाटनही करणार आहेत.
- श्रीनगर आणि अरब इमिरातला थेट जोडणाऱ्या विमानाची घोषणा नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या काश्मीर दौऱ्यादरम्यान केली होती.
- शाह श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, काश्मीर ट्रान्सपोर्ट असोसिएशन, हाऊस बोट असोसिएशन, काश्मीर चेंबर्स ऑफ कॉमर्स, सुरक्षा एजन्सी आणि काश्मीर सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहेत.
- या बैठकीच्या पार्श्वभूमीवर काश्मीरचा विकास हा प्रमुख मुद्दा असेल.
- गृहमंत्री २४ ऑक्टोबर रोजी जम्मूमध्ये भाजपच्या रॅलीला संबोधित करतील. 25 ऑक्टोबर रोजी ते शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, श्रीनगर येथे एका सभेला संबोधित करतील.
- ते दाल तलावाजवळ आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमातही सहभागी होतील.
अलीकडेच दहशतवाद्यांच्या टार्गेट किलिंगमध्ये शहीद झालेल्या काश्मिरी पंडित माखनलाल बिंदरू यांच्या कुटुंबाला शहा भेटू शकतात ५ ऑक्टोबर रोजी बिंदरू यांना गोळी मारली. याशिवाय, शाह ७ ऑक्टोबर रोजी ठार झालेल्या प्राचार्य सुपिंदर कौर आणि अर्शद अहमद मीर यांच्या नातेवाईकांनाही भेटण्याची अपेक्षा आहे.
दहशतवाद संपवण्याचंही लक्ष्य
शाह यांच्या दौऱ्याचा संबंध खोऱ्यातील अलीकडच्या दहशतवादी कारवायांशीही जोडला जात आहे. खरं तर, गेल्या १५ दिवसांमध्ये, दहशतवादी वेगवेगळ्या घटनांमध्ये निरपराधांना लक्ष्य करत आहेत. ताज्या घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा दलांनी संपूर्ण खोऱ्यात ऑपरेशन क्लीनही राबवले आहे. गेल्या १५ दिवसांत काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या ११ चकमकींमध्ये १७ दहशतवादी ठार झाले आहेत. त्याचबरोबर ९ जवानही शहीद झाले आहेत. या भेटीतून शाह यांना दहशतवाद्यांनाही संदेश द्यायचा आहे. दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी सुरक्षा दलांना दिल्या आहेत.