मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शुभहस्ते मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये संपन्न झालेल्या इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन नवी दिल्ली च्या ५० व्या वार्षिक पुरस्कार परिषद कार्यक्रमांमध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांची कुलगुरूपदी निवड झाल्याबद्दल आणि ए.आय.सी.टी.ई. व आय.एस.टी.ई. या संस्थांच्या विकासासाठी मोलाचा सहभाग व भरीव योगदान दिल्याबद्दल सन्मानचिन्ह देवून त्यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, गृहनिर्माण व परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे आठवे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचा मुख्यमंत्रांच्या हस्ते कुलगुरू झाल्यानंतर प्रथमत: सत्कार झाल्याबद्दल आणि विद्यापीठाच्या गौरवात भर पडल्याबद्दल विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, संवैधानिक अधिकारी, विविध प्राधिकारणींचे सदस्य, शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
प्रा.दिलीप एन.मालखेडे सध्या पाच वर्षांहून अधिक काळ एआयसीटीई, नवी दिल्ली येथे सल्लागार – 1 म्हणून कार्यरत होते. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती, येथून मेकॅनिकल अभियांत्रिकीमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर त्यांनी आयआयटी मुंबईमधून आचार्य पदवी प्राप्त केली. त्यांना तीस वर्षांपेक्षा जास्त शैक्षणिक आणि औद्योगिक कार्याचा प्रदीर्घ अनुभव आहे.
एआयसीटीईमध्ये सल्लागार म्हणून त्यांनी तंत्रशिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. निष्पक्षता आणि संपूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी त्यांनी आर.पी.एस., मोडरॉब्स, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, परिषदांसाठी अनुदान आणि इतर उपक्रमांच्या निधीसाठी ए.आय.सी.टी.ई. मध्ये त्यांनी पूर्णपणे ऑनलाइन प्रणाली स्थापित केली. मुली, दिव्यांग, विद्यार्थी, तसेच एम.टेक., पीएच.डी. विद्याथ्र्यांना शिष्यवृत्ती नियमित मिळावी, यासाठी सुद्धा कार्यप्रणाली विकसित केली. याशिवाय ईशान्य भारतासाठी त्यांनी विशेष योजना आखल्या आहेत. प्राध्यापकांच्या प्रशिक्षणाद्वारे गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांनी नेहमीच प्राध्यान दिले आहे. एआयसीटीईद्वारा मान्यताप्राप्त संस्थांमध्ये (एन.डी.एफ.) पीएच.डी. अभ्यासक्रम सुरु करण्यास त्यांनी प्राध्यान दिले. विदेशातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारतीय विद्यार्थी संघ पाठवण्याच्या त्यांच्या पुढाकाराने देशाचे नाव जगात उंचावले आहे. इंटर्नशिपसाठी कॅनेडियन विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना पाठवण्याची योजना त्यांनी सुरू केली. नवनिर्मितीची भावना जागृत करण्यासाठी त्यांनी २०१७ आणि २०१८ मध्ये स्मार्ट इंडिया हॅकेथॉन आयोजित केली, त्यामध्ये मोठा संख्येने विद्याथ्र्यांचा सहभाग होता. तो उपक्रम आता देशव्यापी चळवळ झाली आहे.
‘आयसी इंजिन, त्याचे मॉडेलिंग आणि सिम्युलेशन आणि इलेक्ट्रॉनिक नियंत्रणे’हा त्यांचा संशोधनाचा विषय असून पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यायामध्ये ते यापूर्वी मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. विभागप्रमुख म्हणून त्यांनी बाजा, इफिसायकल, गो-कार्ट, सौर उर्जा कार यासाठीच्या संशोधनासाठी प्रयोगशाळा स्थापित केली. त्यांच्या विद्याथ्र्यांनी वर्षानुवर्ष बाजा – दक्षिण आफ्रिका आणि बाजा – यूएसए मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या देशाचे नाव उंचावले. ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये पी.जी. अभ्यासक्रम, अत्याधुनिक किर्लोस्कर आयसी इंजिन प्रयोगशाळा उभारणी, पीएच.डी. च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आदी व्यवस्था त्यांनी आपल्या विभागात उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यांचे नामांकित जर्नल्समध्ये, परिषदांमध्ये अनेक संशोधन पेपर प्रकाशित झाले आहेत. याशिवाय अभ्यासक्रमामध्ये त्यांच्या धडांचा समावेश असून त्यांना आजवर दोन पेटेन्टने सन्मानित करण्यात आले आहे.
देशभरातील तंत्रशिक्षण व व्यावसायिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी ए.आय.सी.टी.ई. मधील विविध धोरण प्रक्रियेमध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग राहिला असून पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे अभ्यासक्रम वेळोवेळी अद्ययावत करण्यामध्ये त्यांचा पुढाकार महत्वपूर्ण राहिला आहे. आंतरराष्ट्रीयकरण, रँकींग, स्वायत्तता आदी क्षेत्रांमध्ये त्यांचा अभ्यास असून त्याची त्यांना विशेष आवड आहे.
जम्मू-काश्मीर भागातील विद्याथ्र्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, तसेच त्यांना देशभरामध्ये शिक्षण घेता यावे, यासाठी पंतप्रधान विशेष शिष्यवृत्ती योजना सुरु केली. राष्ट्रीय शुल्क समिती, शारीरिकदृष्टा अपंग विद्याथ्र्यांसाठी सुलभतेचे निकष ठरविणे, ओ.एल.डी., ऑनलाईन शिक्षण, स्वायत्तता, व्यावसायिक संस्था आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० वरील धोरणात्मक निर्णयामध्ये त्यांचा विशेष समन्वय राहिला आहे.
भारताचे उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरणासह दुबई, कुवेतमध्ये कार्यरत भारतीय अभियंत्यांच्या तांत्रिक समस्या सोडविण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. ऑक्सफोर्ड, केंब्रिज, क्वीन मेरी आणि वेस्टमिन्स्टर विद्यापीठांना त्यांनी भेटी दिल्या असून न्यूयॉर्क विद्यापीठ, मॅसाच्युसेट्स टेक्नीकल इन्स्टिटुट, हावर्ड विद्यापीठ, पेन सिल्व्हेनिया विद्यापीठ येथे गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे त्यांनी नेतृत्व केले आहे. एज्युकॉन २०१५ मधील सहभागासह त्यांनी जर्मनी, स्वीत्झरलँड, स्पेन, फ्रान्स आणि पोर्तुगोल देशांना भेटी दिल्या आहेत.
स्वयंम, अर्पित, मुक्स यावरील व्हिडीओ अभ्यासक्रम त्यांच्या प्रोत्साहनामुळे शिक्षणक्षेत्रात आमुलाग्र बदल होत घडवून आणत आहे. भारत सरकारच्या अनेक महत्वपूर्ण समित्यांवर त्यांनी अध्यक्ष व सदस्य म्हणून कार्य केले आहे. कुलगुरूंचे सार्वत्रिक अभिनंदन होत आहे.