डॉ.जितेंद्र आव्हाड
धीरुभाई… रिलायन्स उद्योगसमूहाचे निर्माते शून्यातून विश्व निर्माण करणे म्हणजे नेमके काय, हे पाहायचे असेल तर त्यांचे चरित्र पाहावे. सुरुवातीच्या काळात भुलेश्वरं येथील एका चाळीत राहून सुरू केलेल्या व्यवसायातून त्यांनी ‘रिलायन्स’च्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. भागीदारीत केवळ १५ हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून स्वतःचा उद्योग सुरू केला. पाहता पाहता तो हजारो-लाखो कोटींचा टप्पा ओलांडून आता देशावर ‘राज्य’ करत आहे. रिलायन्स उद्योगसमूहाची सध्याची संपत्ती आहे ‘फक्त’ १० लाख कोटी रुपये आणि हा गाडा हाकत आहेत सुमारे दोन लाख कर्मचारी.
धीरुभाई हे व्यापार गुणसूत्रांतच असलेल्या गुजरातमधले. जुनागढ जिल्ह्यातील चोरवाड हे त्यांचे गाव. जन्मतारीख २८ डिसेंबर १९३२. वडील हिराचंद अंबानी हे शिक्षक. त्यांना एकूण पाच अपत्ये; धीरजलाल हे त्यातले तिसरे. लहानपणी ते अन्य सामान्य विद्यार्थ्यांसारखेच होते. इंग्रजी चांगले होते त्यांचे; पण आज विश्वास बसणार नाही अनेकांचा, लहानपणी गणितात कच्चे माठ होते ते. १९४९ मध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून, वयाच्या सोळाव्या वर्षी ते येमेनमध्ये एडनला गेले. त्यांचे वडीलभाऊ रमणिकभाई तेथील ए. बेस्सी अॅण्ड कंपनीत काम करीत होतेच. त्यांच्या ओळखीने धीरुभाई तेथे चिकटले. सुरुवातीची दोन वर्षे त्यांनी डिस्पॅच क्लार्क म्हणून काम केले. पुढे ही कंपनी शेल कंपनीच्या उत्पादनांची वितरक बनली आणि धीरूभाईची बदली एडन बंदरातील कंपनीच्या ऑईल-फिलिंग स्टेशनवर झाली. या स्टेशनचे मॅनेजर म्हणून ते काम करू लागले. पगार होता मासिक ३०० रुपये. स्थापन करण्याची स्वप्ने उतरू लागली. त्या दृष्टीने ते तेथे स्वतःला तयार करीत होते. बाजारात फिरून, अन्य व्यापाऱ्यांचा व्यवसाय पाहून शिकत होते.
१९५१ मध्ये धीरुभाई यांचे वडील हिराचंद अंबानी यांचे निधन झाले. आई जमनाबेन यांच्या पुढाकाराने १९५४ मध्ये धीरुभाईचा विवाह जामनगरच्या कोकिलाबेन पटेल यांच्याशी झाला. धीरूभाईना आधीपासूनच दुसऱ्याची नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय असावा, असे वाटत होते. आपला स्वतंत्र व्यवसाय भारतातच उभा करावा हेही धीरुभाईनी पक्के केले. शेवटी ३१ डिसेंबर १९५८ रोजी धीरुभाईनी एडनला कायमचा रामराम केला आणि आपल्या कुटुंबीयांसह ते भारतात परतले. चंपकलाल दमाणी हे त्यांचे मामेभाऊ. त्यांच्याशी त्यांनी भागीदारी केली १५ हजार रुपयांचे भांडवल गुंतवले आणि मशीद बंदर येथे ‘रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन’ची स्थापना केली. एक टेबल, तीन खुर्च्या व एक टेलिफोन हे तेथील सामान, मसाल्याचे पदार्थ आणि रेयॉन कापड यांचा व्यवसाय ते करू लागले. या काळात ते राहत होते भुलेश्वर येथील जयहिंद इस्टेट चाळीत. सुमारे ५०० कुटुंबांची ही चाळ; तिच्या तिसऱ्या मजल्यावरील घरात धीरुभाईचे वास्तव्य होते. आजच्या भाषेत सांगायचे तर अपार्टमेंटच होते ते. एक छोटासा दिवाणखाना, दोन छोटी शयनगृहे, स्वयंपाकघर व न्हाणीघर तेथे धीरुभाईंची मुले खेळली, वाढली, मोठी झाली. १० वर्षे, १९६८ पर्यंत ते तेथे राहत होते.
१९६६ मध्ये धीरुभाई अंबानी यांनी अहमदाबादजवळील नरोडा येथे अत्याधुनिक टेक्स्टाईल मिल सुरू केली. १९७१ हे वर्ष धीरुभाईसाठी प्रगतीचे ठरले. भारत सरकारचे निर्यात धोरण अनुकूल होते त्याचा फायदा उचलत धीरुभाईंनी आपले कापड रशिया, सौदी अरेबिया, पोलंड, झांबिया, युगांडा आदी देशांमध्ये निर्यात करण्यास सुरुवात केली. १९७७ मध्ये धीरूभाईनी ‘रिलायन्स’चे रूपांतर पब्लिक लिमिटेड कंपनीत केले. लहान लहान गुंतवणूकदारांकडून भागभांडवल गोळा करणारे धीरुभाई भारतातील पहिलेच उद्योगपती. त्या वेळी ५८ हजार जणांनी त्यात आपले पैसे गुंतवले. १९७८ मध्ये धीरुभाई कापड व्यवसायात पूर्णपणे उतरले. त्यांनी विमल या ब्रॅण्ड नेमने कापडविक्रीस सुरुवात केली. साधारणपणे दिवसाला एक या सरासरीने धीरुभाईनी १९७७ ते १९८० या काळात देशभरात ‘विमल’ची शोरूम थाटली. १९९९ = २००० मध्ये ‘रिलायन्स’ने गुजरातमधील जामनगर येथे जगातील सर्वांत मोठी रिफायनरी सुरू केली. त्याच सुमारास इन्फोकॉम क्षेत्रातही प्रवेश केला. २४ जून २००२ या दिवशी धीरुभाईंना मेंदूत रक्ताची गाठ झाल्याने पक्षाघाताचा तीव्र झटका आला. ६ जुलै २००२ या दिवशी धीरुभाई अंबानींचे निधन झाले. भारताच्या उद्योग इतिहासातील एक धगधगते पर्व संपले.