मुक्तपीठ टीम
ड्रायव्हिंग लायसन्ससह गाड्यांच्या सर्व कागदपत्रांना आणखी एक महिना म्हणजेच ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
मोटार वाहन कायदा १९८८ आणि केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८९ यांच्याशी संबधीत कागदपत्रांच्या वैधतेला मुदतवाढ देण्यासंबधी अधिसूचना ३० मार्च, २०२०, ९ जून २०२०, २४ ऑगस्ट २०२०, २७ डिसेंबर २०२०, २६ मार्च २०२१ आणि १७ जून २०२१ रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने जारी केल्या होत्या. या अधिसूचनांनुसार फिटनेस वैधता, सर्व प्रकारचे परवाने, वाहन चालन परवाना, नोंदणी किंवा इतर संबधित कागदपत्रे यांची वैधता ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत कायम राखली गेली होती.
कोरोनाचा प्रसार रोखण्याची आवश्यकता लक्षात घेऊन, वरील सर्व कागदपत्रांची वैधता ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत कायम राखण्याची सूचना करण्यात आली आहे. यामध्ये १ फेब्रुवारी २०२० पासून वैधता संपलेल्या सर्व कागदपत्रांना तसेच ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत वैधता संपत आलेल्या सर्व कागदपत्रांना ही अधिसूचना लागू आहे. अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी अश्या कागदपत्रांना ३१ ऑक्टोबर २०२१ वैध मानावे अशी सूचना केली आहे. यामुळे नागरिकांना सामाजिक अंतराचे नियम पाळत वाहतूकसंबधित सेवा मिळवण्यास मदत होईल.