डॉ. जितेंद्र आव्हाड
शेरलॉक होम्सच्या घराचा पत्ता होता – २२१,बी बेकर स्ट्रीट, लंडन. लोक हा पत्ता शोधत यायचे होम्सला भेटण्यासाठी, पाहण्यासाठी. त्याला पत्र पाठवायचे. आपल्या समस्या, अडचणी कळवायचे. हे शहर खरे होते. तो रस्ता, ती इमारत, हे सारे खरे होते. पण, शेरलॉक होम्स मात्र काल्पनिक होता. ऑर्थर कॉनन डॉयल हे लेखक त्या पात्राचे निर्माते होते. पण, त्यांच्या कथांची मोहिनी लोकमानसावर इतकी पडली होती, की वाचकांना ते जिवंत पात्रच वाटायचे; ते सारे काही खरे वाटायचे. असेच भाग्य आणखी दोन पात्रांना मिळाले होते; तेही मुंबईतल्या. त्यांची नावे – झुंजार आणि धनंजय.
मुंबईतल्या मरीन ड्राईव्हवरील झुंजार महालात झुंजार, त्याची पत्नी विजया आणि नोकर नेताजी यांच्यासह राहत असे; तर धनंजयचे घर होते गावदेवीत. त्या, म्हणजे स्वातंत्र्याच्या आगेमागच्या काळात अनेक तरुण मुले झुंजार वा धनंजय यांची घरे शोधण्यासाठी काखेत त्यांच्या कादंबऱ्या घेऊन रात्रीच्या वेळी फिरत असत. रात्री का, तर सहसा याच वेळेत झुंजार, धनंजय आपल्या मोहिमांवर निघत असत, म्हणून. अशा अपसमयी फिरणाऱ्या या तरूणांना पोलीस पकडत. पुस्तक काढून घेऊन, त्यांना घरी पाठवून देत. धनंजय, झुंजार यांच्या नावांनी वाचक पत्रेही पाठवत असत त्या कादंबऱ्यांच्या लेखकाला. या लेखकाचे नाव होते – चंद्रकांत सखाराम चव्हाण.
पण, या नावाने त्यांना कोणीच ओळखत नाही. त्यांना ओळखले जाते ते बाबुराव अर्नाळकर या नावाने. ते मूळचे अर्नाळ्याचे, म्हणून अर्नाळकर. तसे ते पक्के मुंबईकरच. अवघे दहा महिन्यांचे होते ते, तेव्हा त्यांच्या मावशीने त्यांना मुंबईत आणले. अर्नाळ्यात आई-बापाच्या घरातल्या दारिद्र्यात हाल होण्यापेक्षा पोर मुंबईत जरा सुखात तरी राहील हा त्यामागचा हेतू. ही मावशी राहायची ग्रॅंट रोड स्टेशनजवळच्या जुन्या चिखलवाडीतील मानाजी राजुजीच्या एकमजली चाळीत. तेथेच बाबूरावांचे बालपण गेले. १९१६ साली पहिल्या महायुद्धाच्या काळात जर्मनांच्या बॉम्बहल्ल्याच्या भयाने मुंबईत मोठी पळापळ झाली. त्यावेळी त्यांना अर्नाळ्याला परतावे लागले; पण तिसरी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा मुंबईला आणण्यात आले. येथील आर्यन हायस्कूलमध्ये त्यांचा दाखला घेण्यात आला. ही चाळ, ही शाळा यांनी बाबूरावांना खुप काही शिकवले. या शाळेत चौथी इयत्तेत असताना त्यांनी शाळेच्या हस्तलिखित मासिकाचे संपादन केले. येथेच त्यांना पुढाऱ्यांची भाषणे ऐकण्यात रस निर्माण झाला. कळत फारसे नसे; पण बाबूराव ती भाषणे ऐकत. मुगभाटातील शांतारामच्या चाळीच्या पटांगणात त्यांनी पहिले भाषण ऐकले होते ते महात्मा गांधींचे. पुढे स्वातंत्र्याच्या चळवळीत १९३८ साली प्रक्षोभक लिखाणाबद्दल बाबूरावांना १८ महिने कारावासाची शिक्षा झाली, तेव्हा विसापूर जेलमध्ये त्यांना महात्मा गांधी व पं. नेहरू यांचा सहवास लाभला. लहानपणी तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही भेटले होते. सहस्रबुद्धे नावाचे एक कामगार पुढारी होते. ते बाबूरावांच्या मामांचे मित्र. त्यांच्यासमवेत बाबूराव अनेकदा परळच्या बीआयटी चाळीत आंबेडकरांच्या घरी जात असत. तेथे गप्पागोष्टी रंगत. बाबूराव बाबासाहेबांना न्याहाळत बसत. कधी कधी रमाई त्यांना चहा-साखर आणण्यासाठी दुकानातही पाठवत असत. असे समृद्ध बालपण या चाळीने दिले बाबूरावांना.
आपल्या कुटुंबीयांच्या पोटापाण्यासाठी अगदी हमालीपासून, ज्यांच्याविरोधात आंदोलन केले त्या ब्रिटिशांचीच नोकरी करण्यापर्यंत बाबूरावांनी अनेक व्याप केले. नंतर एका चष्म्यांच्या दुकानात त्यांनी व्यवस्थापक म्हणून नोकरी धरली. पुढे १९४१ साली त्यांनी गिरगावात स्वतःचा चष्म्याचा व्यवसाय सुरू केला. याच दुकानात त्यांची पहिली रहस्य कादंबरी जन्माला आली. साल होते १९४२.महिना फेब्रुवारी. कादंबरीचे नाव – चौकट राणी. विसापूर कारागृहात एडगर वॉलेसची ‘थ्री जस्ट मेन’ ही कादंबरी त्यांनी वाचली होती. तिने त्यांना रहस्यकथेची ओळख करून दिली. ती येथे कामाला आली. पाहता पाहता या कादंबरीने वाचकांना वेड लावले आणि बाबूराव अर्नाळकर नावाचे एक साहित्यिक गारूड येथे जन्मास आले.
किती रहस्य कादंबऱ्या लिहिल्या असतील बाबूरावांनी?
तब्बल एक हजार चारशे ऐंशी. हा विश्वविक्रमच. गिनीज बुकने त्याची नोंद घेतली; पण आपल्या साहित्यविश्वाने मराठी बाण्यास जागून याकडेही दुर्लक्ष केले. मात्र, रसिकांच्या मनाच्या ‘अंडरवर्ल्ड’मध्ये आता बाबूराव अर्नाळकरांच्या झुंजार, काळा पहाड, धनंजय, गोलंदाज, तिरंदाज, फू मांच्यू यांसारख्या हिरोंचे साम्राज्य निर्माण झाले होते. ते कोण कसे खालसा करणार? या रसिकांत कोण नव्हते? आचार्य अत्रे, लता मंगेशकर, बालगंधर्व यांसारखी दिग्गज मंडळी त्यांत होती. आणि सर्वसामान्य रसिक, ते तर मुबलक होते. असे सांगतात, ती बाबूराव हे ज्या चष्म्यांच्या दुकानात बसून कादंबऱ्या लिहित असत, तेथे त्यांना पाहण्यासाठी कधी कधी या रसिकांची एवढी गर्दी होत असे, की बाबूरावांनाच दुकानात प्रवेश करणे कठीण होऊन जाई. अशा वेळी चक्क पोलिसांना पाचारण करावे लागे. ही होती बाबूरावांची लोकप्रियता. केवळ लेखणीच्या बळावर, तिचे पावित्र्य जपत मिळवलेली लोकप्रियता. रहस्यरंजनाच्या हा बादशहाने ९० व्या वर्षी ५ जुलै १९९६ ला या जगाचा निरोप घेतला.
(लेखक डॉ. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत.)
साहित्यिक चंद्रकांत खोत: गिरणगावातून मराठीतील प्रस्थापित साहित्यविश्वाला जोरदार हादरवलं!