डॉ.जितेंद्र आव्हाड
काही नावे अशी असतात की खरोखरच त्यांचा परिचय करून देणे म्हणजे बॅटरीने सूर्य दाखविणे! पुलं हे त्यातलेच एक नाव. महाराष्ट्रीय साहित्य-संस्कृतीतील हा एक अवलिया खेळिया. विनोदी लेखक, नाटककार व पुरोगामी समाजचिंतक. अभावग्रस्ततेच्या धस्कटांनी रोजची वाटचाल रक्तबंबाळ होत असतानाच्या काळात येथील मराठी मध्यमवर्गाला त्यांनी हसत हसत जगण्यास शिकवले. बाजार हा सगळ्या जीवनव्यवहाराचा स्थायीभाव बनत चालल्याच्या काळात त्यांनी येथील मराठी जनांना सुसंस्कृतता हे मुल्य किती अमुल्य असते याचा प्रत्यय दिला.
व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णने, कथा, कविता, नाटक, एकांकिका, सांगीतिका, अशा विविध साहित्यप्रकारांतून त्यांनी महाराष्ट्राला जगण्यातील सौंदर्य, उत्तमता, उदात्तता यांचे भान दिले. बहुरूपी प्रयोग, नाटक, चित्रपट, श्रुतिका, काव्यवाचन, संगीत मैफिली, भाषणे यांद्वारे त्यांनी महाराष्ट्राला रिझवले आणि रिझवताना, हसवताना सत्य-शिव-सुंदर म्हणजे नेमके काय ते दाखवले. व्यक्ती आणि वल्ली, असा मी असामी, गणगोत, मैत्र, गुण गाईन आवडी, खिल्ली, हसवणूक-फसवणूक, नस्ती उठाठेव, मराठी वाड्मयाचा (गाळीव) इतिहास, अपूर्वाई , पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा, वंगचित्रे, एक झुंज वाऱ्याशी, ती फुलराणी, सुंदर मी होणार, तुका म्हणे आता, नवे गोकुळ, पुढारी पाहिजे, विठ्ठल तो आला आला, तीन पैशाचा तमाशा….किती नावे सांगावित त्यांच्या पुस्तकांची? असंख्यांनी असंख्य वेळा वाचली असतील ती. त्यातील जीवनरसाने कित्येकांच्या जगण्यातील माधुर्य वाढले असेल.
त्यातलेच एक पुस्तक म्हणजे – बटाट्याची चाळ. मुंबईतील मराठी चाळजीवनाचे आत्मवृत्त आहे ते. हे पुस्तक गाजले. त्यावरील बहुरूपी प्रयोग गाजले. आज इतक्या वर्षांनंतरही युट्युबवर ‘बटाट्याची चाळ’ची ध्वनीनीचित्रफीत पाहिली जाते. तेथे पाच वर्षांपुर्वी कोणीतरी अपलोड केलेली एक ध्वनिचित्रफीत दहा लाखांहून अधिक लोकांनी पाहिलेली आहे. मुंबईतील चाळ संस्कृतीवरील पुलंचे हे प्रेम कदाचित त्यांना बाळकडू म्हणून मिळाले असावे! कारण – पुलंचा जन्म मुंबईतील अशाच एका चाळीत झालेला आहे. तिचे नाव कृपाल हेमराज चाळ.
पुलंचे वडील लक्ष्मणराव देशपांडे हे जे. बी. अडवाणी या कागद कंपनीत सेल्समन म्हणून नोकरीला होते. त्यांच्या मातोश्रींचे नाव लक्ष्मीबाई. ते मुंबईतील गावदेवी पुलाखालच्या कृपाळ हेमराज नावाच्या चाळीत राहत असतानाच ८ नोव्हेंबर १९१९ रोजी पुलंचा जन्म झाला. फार काळ ते त्यात राहिले नाहीत. अवघी दीड-दोन वर्षेच त्यांची बालपावले त्या घरात बागडली.
नंतर देशपांडे कुटुंबीय जोगेश्वरीला सरस्वती बागेत राहायला गेले. ही पुलंच्या आजोबांच्या पुढाकाराने काही गौड सारस्वत मंडळींनी वसवलेली वसाहत. त्यानंतर १९२८-२९ साली पुलंचे कुटुंब जोगेश्वरी सोसायटीतून विलेपार्ल्याला ५, अजमल रोडवरील त्र्यंबक सदन या स्वतःच्या घरात राहावयास आले. पण, सरस्वती बाग – जिला तेथील सगळेच सोसायटी याच नावाने ओळखत – ती काय किंवा पार्ल्यातील त्र्यंबक सदन काय, या वास्तूंच्या पायात होती ती चाळकरी मराठी संस्कृतीच. पुलंचे निकटचे मित्र, साहित्यिक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांनी त्यांच्या ‘स्मरणसावल्या’ या पुस्तकात म्हणून ठेवले आहे, की –
‘पुलंचा जन्म चाळीत झाला हा केवळ अपघात. तिथे जरा समज येईपर्यंतचे मूलपण गेले असणार फार तर. पण चाळही अक्षरशः घेण्याचे कारण नाही; ती एक प्रतीक आहे. पहिल्या महायुद्धानंतर मोडकळीस येऊ लागलेल्या पांढरपेशा मध्यमवर्गाच्या राहणीचे प्रतीक. हा खालचा मध्यमवर्ग; वरच्या इयत्तेत जाण्याच्या आशेवर ओढाताणीचे आयुष्य खपवून घेणारा. ही आशा आणि खडतर वास्तव यांच्यातील अप्रकट संघर्षाने गांजलेले आयुष्य. चाळ म्हणजे तुरुंगातील कोठडीवजा साठ गाळ्यांची माळ. बिळांची म्हणा. (कोणाच्या अबोध मनात मर्ढेकरांचे उंदीर येतील!) माणसांतील विविधतेत रमलेल्या पुलंना अशी घाऊक विविधता अन्यत्र कुठे सापडणार? कलावंत म्हणून तिचा त्यांनी फायदा घेतला; मात्र त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगून. त्यांच्याशी समरस होऊन. ती सहानुभूती व्यापक आहे. चाळीपार जाणारी आहे. चाल ही एक सबब किंवा नमुना.
‘सामान्यांची ही नि:श्वसिते | जीवन न्यारे इथे स्पंदते’.
असे खुद्द पुलंनीच तिचे वर्णन केले आहे.’
पुलंच्या मनातील चाळ ही अशी होती. तिच्यात त्यांना जुन्यातील चांगुलपणा दिसत होता. ते सनातनी मुळीच नव्हते; पण जुन्यातील सारेच त्याज्य, असे मानणारेही नव्हते. मूलभूत मुल्ये जुनी म्हणून टाकाऊ होत नसतात यावर त्यांचा विश्वास होता. म्हणूनच त्यांच्यावर बाजारू वृत्तीचे घाव पडताना पाहून ते हळहळत होते.
‘बटाट्याची चाळ’मधील अखेरच्या चिंतनात ते लिहितात – पण आता इलाज नाही. चाळ कोलमडत आली आहे. शेवटला घाव कोण घालणार याची ती वाट पाहत आहे. तिला चिंता आहे ती एकच : हा घाव घालणारा, तिने ज्यांचा आजवर भार वाहिला, त्या माणसांच्या नातवंडा-पतवंडांना सिमेंट कॉंक्रीटच्या प्रचंड कपाटाच्या खणात बंद करून ठेवणार आहे. त्या कपाटात. -“त्रीलोकेकरशेट, येता काय बेझिक खेळायला?”
– “जनोबा, आज काय पापलेटबिपलेट गावलो की नाय चांगलो?”
– “शांताबाई, यमीबरोबर वाटीभर डाळीचं पीठ द्या पाठवून.”
– “कुशाभाऊ, रजा झाली का सॅंक्शन? ”
असे मोकळे आवाज ऐकू येणार नाहीत. पहिलटकरणीच्या पाठीवरून हात फिरवून ना जातीची ना पातीची अशी शेजारची म्हातारी “अगं बावीस बाळंतपणे झालीं माझीं” – असा धीर देणार नाही. सासरी निघालेल्या चाळीतल्या पोरीकडे पाहून आनंदाने रडणाऱ्या डोळ्यांची संख्या मर्यादित होईल. मॅट्रिकला निघालेला गंपू साऱ्या वडीलधाऱ्या मंडळींच्या पाया पडला होता. नव्या ब्लॉकातला अभिजीत किंवा अमिताभ कदाचित रॉक रॉक रॉक म्हणत एक्झाम द्यायला जाईल. आणि चाळीला वाटते, जमिनीसपाट झालेला आपला देह तीन मजल्यांनी उठून वर येईल आणि म्हणेल, “अरे नाही रे, माझ्या पोटात ह्यापेक्षा खुप खुप माया होती! ”
महाराष्ट्राला व्यंगातून हसवणारा, त्या हसवण्यात पण बरंच काही शिकवून जाणारा, चाळसंस्कृतीमध्ये जन्म होऊन ती मुल्ये साहित्यिक माध्यमातून जनमानसातील पुढल्या पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या या धृवताऱ्याने १२ जून २००० रोजी मानवजगतातून अखेरचा निरोप घेतला.
(लेखक डॉ. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत.)
शाहीर साबळे: चाळीमधून कलेच्या जोरावर यशाचे शिखर गाठणारे महान कलाकार!