मुक्तपीठ टीम
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या मायगव्ह पोर्टलने भारतीय स्टार्ट- अप्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजकांसाठी तारांगणविषयक अभिनव संशोधन स्पर्धेचे आयोजन केले आहे. ऑगमेंटेड रिअॅलीटी, व्हर्चुअल रिअॅलीटी आणि मर्ज्ड रिअॅलीटी यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वदेशी तारांगण प्रणालीचे सॉफ्टवेअर विकसित करण्याची क्षमता असणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आणि स्टार्ट-अप्स (भारताबाहेर स्थायिक असलेले) यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
मायगव्हच्या या तारांगणविषयक अभिनव संशोधन स्पर्धेसाठीची नोंदणी १० ऑक्टोबर २०२१ पर्यंत करता येईल.
या स्पर्धेद्वारे स्टार्ट-अप्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजकांना आपल्या तारांगणांसाठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याच्य हेतूने आमंत्रित करण्यात येत आहे. भारतातील विशेषतः छोटी शहरे आणि ग्रामीण भागातील तारांगणांसाठी (ऑगमेंटेड रिअॅलीटी, व्हर्चुअल रिअॅलीटी आणि मर्ज्ड रिअॅलीटी) आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाण्यासाठी ही मोठी संधी आहे.
तारांगण उभारणी तंत्रज्ञानाशी संबंधित सर्व क्षेत्रांतील तज्ञांसाठी https://innovateindia.mygov.in/ या संकेतस्थळावर ही स्पर्धा खुली आहे. अर्जदारांमध्ये स्टार्ट-अप्स, भारतीय कायदा क्षेत्रातील संस्था, व्यक्ती अथवा संघांचा समावेश असून त्यांना त्यांच्या संकल्पना सादर करण्यासाठी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला अनुक्रमे 5 लाख, 3 लाख आणि 2 लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. त्याचबरोबर, या स्पर्धेतील विजेते आणि सहभागी स्पर्धकांना तारांगण क्षेत्रातील इतर सहकाऱ्यांना भेटण्याची आणि या क्षेत्रातील नवीनतम घडामोडींची माहिती समजून घेण्याची संधी मिळणार आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या विशाल छायेखाली देशाच्या प्रगतीशील डिजिटल परिवर्तनाच्या उद्दिष्टाला ही तारांगण स्पर्धा अगदी उत्तमपणे संरेखीत करते आहे.