मुक्तपीठ टीम
शांघाय (चीन) येथे पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक स्किल्स चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी राज्यात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कल्पक तरुणांना जागतिक पातळीवर त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी प्राप्त झाली आहे. कौशल्य विकासात देशाला अग्रेसर बनविताना महाराष्ट्र त्यात महत्वपूर्ण योगदान देईल, असे कौशल्य विकास मंत्री मलिक यांनी यावेळी सांगितले.
कुर्ला येथील डॉन बॉस्को आयटीआय येथे काल हा उद्घाटन सोहळा झाला. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, कौशल्य विकास विभागाच्या सहसचिव सुवर्णा खरात, तंत्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे सिनियर हेड जयकांत सिंह, डॉन बॉस्को संस्थेचे प्रशासक फादर मॅकएन्रो लोपेज आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
ब्युटी थेरपी, कुकींग, सायबर सिक्युरीटी, ग्राफीक डिझाईन, हेअर ड्रेसिंग अशा विविध ४५ क्षेत्रातील कौशल्ये सहभागी
राज्यातील युवक-युवतींमधील कौशल्य आणि नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी आयोजित या स्पर्धेत २० हजार ०९० उमेदवारांनी सहभाग घेतला होता. त्यातील जागतिक पातळीवर चांगली कामगिरी दाखवू शकतील अशा निवडक उत्कृष्ट २६३ युवक-युवतींची या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आता यातील उत्कृष्ट कामगिरी करणारे युवक-युवती पुढे राष्ट्रीय आणि जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. या युवक-युवतींनी विविध ४५ क्षेत्रातील कौशल्यावर चमकदार अशी कामगिरी दाखवली आहे. इलेक्ट्रीकल इन्स्टॉलेशन, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, सीएनसी मिलिंग, सीएनसी टर्निंग, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन टेक्नॉलॉजी, हेल्थ आणि सोशल केअर, आयटी नेटवर्क केबल, मेकॅनिकल इंजिनिअरींग, प्लंबिंग आणि ॲम्प हिटींग, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग, वेल्डींग, ३ डी डीजीटल गेम आर्ट, ऑटोबॉडी रिपेअर, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, बेकरी, ब्युटी थेरपी, ब्रुकलेयींग, कॅबिनेट मेकींग, कार पेंटींग, कारपेन्ट्री, क्लाऊड कॉम्पुटींग, सीएनसी मिलींग, कॉन्क्रींट कन्स्ट्रक्शन वर्क, कुकींग, सायबर सिक्युरीटी, फ्लॉरिस्ट्री, ग्राफीक डिझाईन टेक्नोलॉजी, हेअर ड्रेसिंग, इंडस्ट्रीयल कंट्रोल, ज्वेलरी, जॉईनरी, लँडस्केप गार्डनिंग, मेकॅट्रॉनिक्स, प्लंबिंग, प्रिंट मेडीया टेक्नॉलॉजी, प्रोटोटाईप मॉडेलिंग, रेस्टॉरंट सर्व्हीस, वॉटर टेक्नॉलॉजी, वेब टेक्नॉलॉजी या सेक्टरमध्ये हे युवक-युवती आपले कौशल्य दाखवत आहेत.
ऑलिम्पिकच्या पद्धतीने युवकांची तयारी
कौशल्य विकास मंत्री मलिक म्हणाले की, ज्याप्रमाणे ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडूंची तयारी करुन घेतली जाते, त्याच पद्धतीने या स्पर्धेत सहभागी युवक-युवतींची जागतिक स्पर्धेत यशस्वी होण्याच्या दृष्टीने तयारी करुन घेतली जाईल. यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत आवश्यक ते सर्व पाठबळ या युवकांना दिले जाईल. स्पर्धेत सहभागी तरुणांनीही जिद्दीने जागतिक स्पर्धेत यश मिळविण्याचे ध्येय्य ठेवावे. २०२३ मध्ये फ्रान्स येथे होणाऱ्या स्पर्धेसाठीही आतापासूनच तयारी सुरु करावी. जागतिक पातळीवर कौशल्य क्षेत्रात देशाचे नाव उज्वल करताना त्यात महाराष्ट्रातील युवक-युवती महत्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा म्हणाल्या की, राज्यातील सर्व स्पर्धक विविध कौशल्य क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करत आहेत. या स्पर्धकांनी राज्यातील इतर युवक-युवतींनाही तयार करण्याच्या अनुषंगाने काही मौलिक सूचना द्याव्यात, त्याची निश्चित अंमलबजावणी करण्यात येईल. राष्ट्रीय आणि जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरणाऱ्या युवकांना विभागामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य देण्यात येईल. उर्वरित विद्यार्थ्यांनाही त्यांच्यातील कौशल्याला चालना देण्याच्या अनुषंगाने कौशल्य विकास विभाग संपूर्ण मदत करेल, असे त्यांनी सांगितले.
कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह म्हणाले की, जागतिक स्पर्धेसाठी तयारी करण्याबरोबरच या युवक-युवतींना विविध नामवंत उद्योगांशी कशा पद्धतीने जोडता येईल यासाठी विभाग प्रयत्न करेल. स्पर्धेत यश मिळविण्याबरोबरच या युवकांना त्यांच्यातील नवसंकल्पना आणि कौशल्याचा उद्योजकतेसाठी वापर करता येईल. कौशल्य विकास सोसायटीमार्फत यासाठी चालना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
ही स्पर्धा तीन दिवस चालणार असून ज्युरींमार्फत छाननी करुन रविवारी (५ सप्टेंबर रोजी) परेल येथील आयएसएमई स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड एंटरप्रिनरशीप येथे होणाऱ्या समारोप कार्यक्रमात विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात येणार आहे.