मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामात शिवसेनेचे पदाधिकारी अडथळे आणत असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ दखल घेत थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार अरविंद सावंत यांनी थेट गडकरींना आव्हान दिले आहे. स्थानिक घटनेला राज्यव्यापी स्वरुप देणाऱ्या गडकरींनी मुंबई गोवा हायवेच्या दुरवस्थेसाठी जबाबदार कोण, ते सांगावं. तिथं कंत्राटदारांना चिखल फासणारे तुमच्यासोबत आहेत, असे सुनावले आहे. त्यामुळे भाजपात असूनही शिवसेनेचे लाडके रोडकरी असणाऱ्या गडकरी आणि शिवसेनेत संघर्ष सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले असले तरी त्यामुळे नेमकं कोण अडचणीत येईल, अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण अपवाद वगळता महाराष्ट्रभरात कंत्राटदारांकडून शिवसेना नेत्यांकडून तक्रारी दाखल झाला असण्याची शक्यता कमी आहे. उलट अनेक ठिकाणी कंत्राटदार हे स्थानिक प्रभावशाली नेत्यांना सबकंत्राट देऊन शांत ठेवण्याची काळजी घेत असतात. अनेक ठिकाणची आंदोलनं ही सबकंत्राटाच्या वादातूनच घडवली जात असतात. गडकरी आणि शिवसेना दिसणाऱ्या संघर्षामागचं नेमकं वास्तव वेगळंही असण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांकडून गडकरींच्या पत्राची तातडीनं दखल
मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदारांकडून लोकप्रतिनिधींविरुद्ध केलेल्या तक्रार अर्जाची आणि त्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यांची माहिती मागितली आहे. राज्याच्या गृह विभागाचे उपसचिव संजय खेडेकर यांनी गडकरींच्या पत्राचा संदर्भ देत राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलंय.
खेडेकर यांच्या पत्रातले मुद्दे खालीलप्रमाणे
- केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २५ जुलै रोजी एक पत्र लिहिले आहे. ते सोबत पाठवले आहे.
- महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्यातील काही महामार्गाचे काम पूर्ण झालेत, तर काही ठिकाणी काम प्रगतीपथावर आहे.
- या प्रकल्पांमध्ये काम सुरू असताना काही ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी अडथळे आणत आहेत.
- विविध नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी आणि कंत्राटदारांना भांडावून सोडणे आणि त्यांनी न ऐकल्यास काम बंद पाडत आहेत.
- वरीलप्रकरणी आपल्याकडे कंत्राटदारांकडून लोकप्रतिनिधींविरुद्ध केलेल्या तक्रार अर्ज आणि त्या अनुषंगाने गुन्हे दाखल झाले आहेत का?
- तसंच याबाबत झालेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास तात्काळ उपलब्ध करुन द्यावा.
एकीकडे मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरींच्या पत्राची तात्काळ दखल घेत थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे मात्र शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आक्रमक होत गडकरींना सवाल केला आहे. मुंबई-गोवा रोड आम्ही करतोय का? काळे फासणारे, दहशत निर्माण करणारे, उठाबशा काढायला लावणारे, चिखलफेक करणारी माणसे आज तुमच्या बरोबर आहेत. तिथे तुम्ही गप्प का?” असा सवाल त्यांनी केला आहे.
खासदार अरविंद सावतांचा गडकरींनाच प्रतिसवाल
- माननीय नितीन गडकरी यांचाविषयी पूर्ण आदर आहे, पण त्यांनी शिवसेना शब्द वापरण्याऐवजी त्या एका विशिष्ट भागाचा उल्लेख केला असता, तर बरं झालं असतं.
- पण त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा उल्लेख केला. जणू काही शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या रस्ते बांधणीच्या कामाला विरोध करत आहे, असा सूर त्या पत्रातून व्यक्त होतोय, ते गैर आहे असं मला वाटते.
- मुख्यमंत्र्यांनी तर अलिकडेच नितीन गडकरींचा गौरव केलेला आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट तर गडकरींचा उल्लेख रोडकरी करत, इतकं त्यांचं डायनॅमिक व्यक्तिमत्व आहे. जी कुठली घटना घडली आहे त्याची मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब दखल घेतली आहे. घटनेची पोलीस महासंचालकांना चौकशी करायला सांगितली आहे.
- अखंड शिवसेनेबद्दल असं विधान करणे अयोग्य आहे. कारण काही माणसे आज गडकरींसोबत आहेत, ज्यांनी मुंबई गोवा रोडवर तुमच्याच अधिकाऱ्यांना काळे फासण्याच्या घटना घडल्या. ते करणारे आज तुमच्यासोबत आहेत. त्यामुळे शिवसेना करते, असे चित्र उभे करू नका. मुंबई गोवा महामार्गाची आज काय अवस्था आहे ते पाहा.
- “चौकशीत ते खरे शिवसैनिक आहेत की आमच्या नावाने कुणी बोंबाबोंब करते, ते बाहेर येईल. त्यांनी जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये होते, असं म्हटलं पाहिजे होतं. शिवसेना का म्हणता? मुंबई गोवा रोड आम्ही करतोय का? काळे फासणारे, दहशत निर्माण करणारे, उठाबशा काढायला लावणारे, चिखलफेक करणारी माणसे आज तुमच्याबरोबर आहेत. तिथे तुम्ही गप्प का?”
- विकासाच्या कामाला कुणी विरोध करता कामा नये ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची न्याय भूमिका आहे आणि ते त्यापद्धतीने न्याय देतील.
नितीन गडकरी यांच्या पत्रात नेमकं काय?
- अकोला आणि नांदेड या २०२ किमी राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये चौपदरीकरणाची कामे चार पॅकेजेसमध्ये सुरु आहेत. गेडशी ते वाशिम या पॅकेज-२ मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (लांबी १२ किमी) निर्माण करण्याचे काम सुद्धा समाविष्ट आहे. परंतु, प्रस्तुत बायपास व मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबवले असल्याचे मला सांगण्यात आले आहे.
- या मतदारसंघात सुरु असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गेच काम एक पूल वगळता पूर्णत्वास आलेले आहे. या लांबीमध्ये पैनगंगा नदीवर उंच पुलाचे काम अर्धवट स्वरुपात आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मज्जाव केला जात आहे. काम सुरु केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने आहे त्या स्थितीत काम अंतिम करण्याबाबत विनंती केली आहे.
- पुलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम (अंदाजे किंमत १३५ कोटी) आमच्या मंत्रालयाने हाती घेतले. परंतु वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे काम पूर्णत्वास आलेले आहे. वाशिम जिल्ह्यातील काम, विशेषतः सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबवले होते, अशी माहिती मला देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरु केले असता शिवसेना कार्यकर्त्यांनी मशिनरीची जाळपोळ करुन कंत्राटदाराचे अधिकारी-कर्मचारी-कामगार यांच्यात दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद झाले आहे.
- उपरोक्त बाबी लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे यापुढेही सुरु ठेवावीत की कसे? याबद्दल आमचे मंत्रालय आता गांभीर्याने विचार करत आहे. ही कामे आहे त्या स्थितीत अंतिम केल्यास ती वाहतुकीसाठी धोकादायक ठरतील. अपघाताचे प्रमाण वाढेल आणि त्यामुळे जनतेच्या असंतोषाला तोंड द्यावे लागेल.
- हे असेच चालत राहिले तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला .विचार करावा लागेल. महाराष्ट्राचे आणि जनतेचे नुकसान होईल.
- ही कामे डिस्कोप केली तरी आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरु. तसे झाले तर महाराष्ट्रातील नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मनात कायमची खंत राहील. ही कामे पुढे न्यायची असतील तर आपला हस्तक्षेप मला आवश्यक वाटतो. आपण यातून कृपया मार्ग काढावा, अशी माझी विनंती आहे.