मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे आपत्ती, रोगराई, कोरोना, पाऊस, वादळ या सगळ्या काळात माणसाला, शेतकऱ्यांना जगवण्यासाठी धडपड करताना दिसले नाही दुर्दैवाने मृत्यू पडलेल्यांचे आकडे जाहीर करणारे हे सरकार आहे, त्यातही लपवाछपवी केली गेली, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी जळगाव येथे टीका केली.
उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असणाऱ्या आमदार अॅड आशिष शेलार यांनी जळगाव भाजपा जिल्हा कार्यालयात पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक घेऊन संघटनात्मक आढावा घेतला.
यावेळी जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, आ संजय सावकारे, महाराष्ट्र उपाध्यक्ष बबन चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, जळगाव महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आणि जिल्हा कोर टीम सदस्य उपस्थित होते
यानंतर पत्रकार परिषदेत आमदार अॅड आशिष शेलार म्हणाले की, कोकणात, मुंबईत आपत्तीच्या अगोदर पुर्व कल्पना असूनही काहीही उपाययोजना न केलेल्या सरकारने आता संपूर्ण खानदेशाकडे पुर्ण दुर्लक्ष केले आहे. खानदेशात पाऊस कमी झाल्याने शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते, पिक कर्ज याबाबत काळजी करतना सरकार दिसत नाही.खानदेशात सुमारे १० हजार हेक्टरवर दुबार पेरणी करावी लागली.
धुळे, नंदुरबार मध्ये पावसाची हिच परिस्थिती राहील तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल, शेतीचे नुकसान होईल पण याकडे लक्ष कोण देणार? याबाबत उपाययोजनांची काही तयारी करताना सरकार दिसत नाही. म्हणून असे वाटतेय की, माणसं जगवण्यासाठी धडपड, योजना, प्रयत्न करावेत अशी या सरकारची तयारी दिसत नाही, अशा शब्दांत आमदार अॅड आशिष शेलार यांनी सरकारवर टीका केली.