मुक्तपीठ टीम
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा अधिकृत निर्णय २६ जुलै रोजी घेतला आहे. मात्र, त्यांना सत्तेची खुर्ची सोडावी लागणार असल्याचे १९ दिवसांआधीच नक्की झाले होते. त्यांच्या कडवट समर्थक शोभा करंदलाजे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात शपथ घेतली तेव्हाच राजकीय वर्तुळात येडियुरप्पांच्या सत्तेचं काऊंटडाऊन सुरु झाल्याचं मानलं गेलं होतं.
आता झालंही तसंच.
शोभा करंदलाजे या कर्नाटक भाजपच्या उपाध्यक्ष आहेत. त्या कर्नाटकातील चिकमंगळूरमधून लोकसभेवर निवडून आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळालं. पण त्याचवेळी त्या ज्यांच्यासाठी सर्वात जास्त विश्वासातील आहेत त्या येडियुरप्पांसाठी धोक्याची घंटी वाजल्याचं मानलं गेलं होतं. नव्हे तसं काही ठरवूनच शोभा करंदलाजेंना केंद्रातील सत्तेत स्थान देण्यात आल्याचीही चर्चा झाली.
बंगळुरुत झालेल्या धन्वंतरी होमहवनाला हजेरी लावल्यानंतर गेल्या गुरुवारी येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याबाबत भाष्य केलं होतं. त्यांनी तेव्हा सांगितलं होतं, २५ जुलैला हायकमांडकडून मला नोटीस मिळणार आहे. त्यानुसार मी पुढचा निर्णय घेईन, असं ते म्हणाले होते. बहुधा रविवारी त्यांना तसे आदेश मिळाले आणि त्यांनी सोमवारी सत्तेला दोन वर्षे झाल्याचा मुहूर्त निवडला.
सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीसाठी थांबले येडियुरप्पा
बी. एस. येडियुरप्पा यांनी अखेर राजीनामा दिला तो काही फार आनंदाने असं नाही. त्यांनी अगदी शेवटच्या दोन दिवसात आक्रमकतेनं लिंगायत कार्डही वापरून पाहिलं. त्याआधी त्यांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या मोठ्या नेत्यांची दिल्लीत भेट घेतली होती. मात्र, निर्णय आधीच झालेला असल्यानं त्यांना कुठूनही दिलासा देण्यात आला नाही. फक्त सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीपर्यंतची सवलत देण्यात आली असावी.
ऑपरेशन लोटसनंतर भाजपा सत्तेत
- कर्नाटकात सत्तेचं नाटक रंगलं होतं.
- जनता दल सेक्युलरच्या एच.डी. कुमारस्वामी यांचं सरकार २३ जुलै २०१९ रोजी कोसळलं होतं.
- कुमारस्वामी बहुमत सिद्ध करु शकले नव्हते.
- त्याधी कर्नाटकच्या राजकारणात खूप नाट्यमय घडामोडी झाल्या होत्या.
- यामुळे कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळून भाजपचं सरकार आलं.
- बी. एस. येडियुरप्पा यांनी २६ जुलै २०१९ रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.