मुक्तपीठ टीम
राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागली नसली तरी या विद्यार्थ्यांचे गुण भरण्यासाठी शिक्षकांना परीक्षा द्यावी लागत आहे. राज्य शिक्षण मंडळाची संगणकीय प्रणाली खंडित झाली व ती बऱ्याच उशिराने सुरु झाली असली तरी ती अत्यंत संथ असल्यामुळे शिक्षकांचे प्रचंड हाल होत आहेत.
राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असताना, वाहतुकीची साधने नसताना, सुट्टी असताना, निकालाचे काम करण्यासाठी बारावीचे शिक्षक शाळा महाविद्यालयात उपस्थित होते परंतु सर्व्हर डाऊन झाल्याने या शिक्षकांना नुसते बसून रहावे लागले. मुंबईतील महाविद्यालयात तर शिक्षक रात्रभर थांबले होते, पण सर्वर डाऊन झाल्याने त्यांचे हे परिश्रम पाण्यात गेले.
याबाबत मान शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त, राज्य मंडळ यांना मेल तसेच संदेश पाठवून त्यांचे लक्ष वेधण्यात आले असता मान शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी त्यात लक्ष घालत असल्याचे सांगितले. तर राज्य मंडळाचे सचिव डॉ अशोक भोसले यांनी तातडीने त्याची दखल घेत संगणक प्रणाली पूर्ववत पूर्ण क्षमतेने सुरू रहावी यासाठी स्वतः कार्यालयात जाऊन पाठपुरावा केला व ती सुरू केली. त्याबद्दल संघटना समाधान व्यक्त करीत आहे.
मुंबईत बारावीचे जवळपास तीन लाख विद्यार्थी असून त्यापैकी एक लाखाहून अधिक विद्यार्थ्याचे गुण अद्याप भरावयाचे बाकी आहेत. तर एक लाख विद्यार्थ्यांचे गुण अद्याप अंतिम झालेले नाहीत. राज्यातील सव्वा तेरा लाख विद्यार्थ्यांपैकी सव्वा पाच लाख विद्यार्थ्यांचे गुण भरावयाचे बाकी असून पाच लाख विद्यार्थ्यांच्या गुणांचे अंतिम निश्चितीकरण व्हावयाचे आहे. २३ जुलै ही गुण भरण्याची अंतिम तारीख असून तोपर्यंत हे काम संपणे शक्य नाही.
निकालाचे काम करण्यासाठी बारावीच्या शिक्षकांना दहावीच्या शिक्षकांच्या तुलनेत कमी दिवस देण्यात आले आहेत. या शिक्षकांना दहावी, अकरावी व बारावी असे तीन इयत्तांचे गुण भरावयाचे आहेत. त्यात पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे गुण भरताना शिक्षकांना प्रचंड परिश्रम घ्यावे लागत आहेत. शिक्षकांसाठी हा अनुभव नवा आहे, यापूर्वी ही सगळी कामे मंडळामार्फत केली जात असत, शिक्षक केवळ मूल्यमापनाचे कार्य करीत असत. यावर्षी हे कामही शिक्षकांना करायला सांगितले आहे, विद्यार्थी हित लक्षात घेऊन संघटनेने त्याला विरोध केला नाही व शिक्षकही विद्यार्थी हितास्तवच हे कार्य करीत आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच अकरावीच्या प्रवेशासाठीसुध्दा विद्यार्थ्यांना सुध्दा प्रवेश परीक्षेसाठी अर्ज दाखल करावे लागत असल्याने संगणक प्रणाली वर प्रचंड ताण पडून ती मंदावते आहे. गुण भरण्यासाठी चार-पाच दिवस वाढवून देण्यात यावेत या संघटनेच्या भूमिकेबाबत परिस्थिती पाहून उद्या निर्णय घेतला जाईल असे राज्य मंडळामार्फत सांगण्यात आले असल्याचे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक प्रा मुकुंद आंधळकर यांनी सांगितले आहे.