डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
डॉ. तेजस वसंत लोखंडे
प्रत्येक वारकरी ज्याची आतुरतेने वाट पहात असतो त्या गोल रिंगणांचा तोरा भारी मोठा असतो. इथेच वारकऱ्यांना निरनिराळे खेळ खेळायला मुबलक जागा उपलबद्ध असते त्यामुळे रिंगणानंतर होणारे खेळ वारकऱ्यांचे मन रिझवताना, शरीरावर आलेला चालण्याचा ताण कमी करतात.
खरंतर दिंडी सोहळ्यात प्रत्येक गोष्टीला विचारपूर्वक स्थान दिले आहे. मग या सोहळ्यात रिंगणाचे प्रयोजन काय असावे हा एक प्रश्न सगळ्यांनाच सतावत असतो. रोजच्या वाटचालीत शरीरातील काही ठराविक स्नायूच कार्यरत असतात. रिंगणाच्या ठिकाणी खेळल्या जाणाऱ्या या निरनिराळ्या खेळामुळे थकलेल्या शरीराच्या इतर स्नायूंचाही वापर होतो. त्यांच्या चलनवलनाने वारकऱ्याच्या शरीरात नवी ऊर्जा येते. कदाचित यासाठी ही रिंगण सोहळ्याची आखणी केलेली असावी.
षष्ठीला सदाशिवनगरला आणि सप्तमीला खुडूस फाट्यावर ही पहिली दोन गोल रिंगण होतात. या दोन्ही रिंगणांचा सोहळा फारच बहारदार असतो. माऊली रिंगणात येण्यापूर्वी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले अनेक रांगोळी कलाकार निरनिराळ्या चित्ताकर्षक रांगोळ्या काढतात. माऊलीसाठी रांगोळीच्या पायघड्या घालतात. या लेखांचे सुलेखनकार डॉ तेजस लोखंडे हेही त्यांच्या बरोबरीने या रांगोळ्या काढतात.
विठ्ठलाच्या दर्शनाची लागे आस,
धावतच जाऊ, घेऊ पंढरी विसावा
सुखाची ही वारी संपणार आता,
लागे रुखरुख माझीया जीवा..
सप्तमीला सकाळी ठाकूरबुवांच्या समाधीजवळ तिसरे गोल रिंगण संपन्न होते. पंढरीनाथाची नगरी म्हणजेच पंढरपूर जवळ आल्यानंतर वारकऱ्यांच्या कडून ‘धावा’ परंपरा जोपासली जाते. याची उत्पत्ती सांगताना असे सांगितले जाते की, वारी करत असताना पंढरीच्या वाटेवर वेळापूरच्या जवळ आल्यानंतर तुकाराम महाराजांना एका उंच ठिकाणावरून विठ्ठलाच्या मंदिराचा कळस दिसला अन् आता पांडुरंग अगदी जवळ आल्याचे पाहून ते त्याला भेटण्यासाठी पळू लागले. तीच ही ‘धावा’ परंपरा. वेळापूरपासून जवळच असलेल्या धावाबाबी माउंट येथे माउलींच्या सोहळ्याचा ‘धावा’ होतो, तर तुकोबांच्या पालखी सोहळ्यात ही परंपरा तोंडले-बोंडले येथे पार पाडली जाते.
पुढे माऊलींचे बंधू श्री सोपानकाका यांची पालखी भंडीशेगावपूर्वी श्री माऊलीस भेटते. या सोहळ्याला ‘बंधूभेट’ असे म्हणतात. यावेळेस दोन्ही भावंडांचे रथ एकमेकांना भेटतात. मानकरी व विश्वस्त मंडळी दर्शन करून श्रीफलांचे आदान-प्रदान करतात. वारीतल्या भावुक प्रसंगांपैकी हा एक भावुक प्रसंग असतो. अष्टमीला भंडीशेगावात सोहळ्याचा मुक्काम असतो.
नवमीचा दिवस फार उत्साहाचा असतो. पंढरपूर हाकेच्या अंतरावर राहिलेले असते. विठूरायांच्या दर्शनाला आता काही तासच उरलेले असतात. वारकऱ्यांची मांदियाळी पंढरीच्या सुखसागरात विलीन व्हायला उतावीळ झालेली असते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले निरनिराळे रस्ते इथे एकत्र होतात. निरनिराळ्या ठिकाणहून येणाऱ्या संतांच्या अनेक पालख्या इथे एकत्र येतात. वाखरीलाच दुसरे उभे रिंगण त्यानंतर चौथे गोल रिंगण आणि थोड्या काळात तिसरे उभे रिंगण होते. नवमीला सगळ्या पालख्या रात्री वाखरीला मुक्कामी असतात.
इथले आणखी एक आश्चर्य म्हणजे श्री पांडुरंग स्वत: नामदेवासह माऊलीस आणण्यासाठी वाखरीला येतो. “भक्त समागमे सर्व भावे हरि | माझे भक्त गाती जेथे | नारदा मी उभा तेथे ||” हे वाखरीस प्रत्यक्ष पहायला मिळते. पुरंदरे मळ्यानंतर पंढरीतून आलेल्या श्री भाटे यांच्या रथात माऊलीच्या पादुका ठेवल्या जातात. हा रथ वडार समाजाचे लोक ओढत असतात. पांडुरंगाच्या पादुकांजवळ पुन्हा एकदा गोल रिंगण होते.
त्यानंतर सोहळ्याचे मालक आरफळकर, माऊलीच्या पादुका शितोळे सरकारच्या गळ्यात बांधतात. तेथून पंढरपूरपर्यंत शेवटची आरती होईपर्यंत पादुका त्यांच्या गळ्यातच असतात. पंढरीत आलेला वारकरी एकादशीला चंद्रभागेत स्नान, नगर प्रदक्षिणा, भजन कीर्तन, हरीजागर केल्यानंतर कळस दर्शनाने शांत होतो.
पंढरीचे वाळवंट टाळ मृदंग भजनाच्या आवाजाने दुमदुमून जात असते. वारकऱ्यांना त्यांच्या वारीचे सार्थक झाल्याची भावना मनात असते. मुखदर्शन झाले नाही तरी एकादशीला चंद्रभागेत स्नान, नंतर नगर प्रदक्षिणा आणि शेवटी कळस दर्शन झाल्याने विठू माऊली भेटल्याचे समाधान प्रत्येक माऊलीच्या चेहऱ्यावर दिसत असते. हौशे, नवशे अन गवशे सहामजली दर्शन मंडपातून बाहेर चार-पाच किलोमीटर लाईन लाऊन जिवाच्या आकांताने मुखदर्शनासाठी चोवीस तर कधी अठ्ठेचाळीस तास उभे राहून दर्शन घेतात. वारीचा वारकरी मात्र विठ्ठलाच्या निव्वळ सानिध्याने समाधान पावतो. विठ्ठलाचे दर्शन झालेच पाहिजे असा त्याचा अट्टाहास कधीही नसतो. किंबहुना कोणताही वारकरी दर्शनाच्याच नाही तर मुखदर्शनाच्या लाईनच्याही वाट्याला जातच नाही. (पंढरीत देवाच्या दर्शनाची आणि मुखदर्शनाची वेगळी लाईन असते) रस्त्यात एकमेकांना माऊली म्हणत त्यांच्यातच देव पहाणाऱ्या या भगवंतांना देव समाधानाचे दर्शन देतो.
सर्व पालख्यांचे मुक्काम आषाढ शुद्ध दशमी ते आषाढ शुद्ध चतुर्दशीपर्यंत पंढरीतच असतात. पौर्णिमेला गोपाळपुरात काला करून दिंडया परतीच्या वाटेला लागतात. बरेचसे वारकरी द्वादशीला भोजन करून परतीला लागतात.
परत वारी
ज्येष्ठ वद्य अष्टमी ते आषाढ शुद्ध दशमी आळंदी ते पंढरपूर उत्साहात गेलेली माऊली, आषाढ वद्य प्रतिपदा ते आषाढ वद्य दशमीपर्यंत परतीच्या प्रवासाला लागते. याला परतवारी असे म्हणतात. विठ्ठल भेटीच्या ओढीने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या मनात खूप उत्साह असतो. परतीच्या मार्गावर भेटीच्या समाधानाशिवाय त्यांच्या मनात इतर काही नसते. मनात असते ती फक्त एक कृतज्ञतेची भावना. वारीला आलेला प्रत्येक वारकरी विठ्ठलावर हवाला ठेवून आलेला असतो. मानसिक, शारीरिक, आर्थिक सगळ्याच विवंचनाचा भार विठूरायानेच पार पाडलेला असतो म्हणून तो मनोमनी विठ्ठलाचे आभार मानत असतो.
पंढरीला जाताना असलेली वारीची शोभा पार मावळून गेलेली असते. अंगभर दागिने लेऊन अख्ख्या लग्नसमारंभात मिरवलेल्या स्त्रीला लग्नानंतर अंगावरचे सगळे दागिने उतरवून नेसत्या वस्त्रानिशी पाहिल्या वर जशी दिसेल तसे काहीसे स्वरूप या परतवारीचे असते. पण शेवटी दिंडी ती दिंडीच. तिची शान काय अशाने कमी होणार आहे? दिंडीचे प्रमुख आणि काही वारकऱ्यांच्या संगतीने आलेल्या मार्गाने ही परतवारी चालत असते. पालखीचा परतीचा प्रवास फारच वेगाने होत असतो.
आषाढ वद्य प्रतिपदेला वाखरी मुक्कामी ही वारी असते. द्वितीयेचा मुक्काम वेळापूरला असतो. तृतीयेला वारी नातेपुतेला मुक्कामी येते. चतुर्थीला फलटण, पंचमीला पाडेगाव, षष्ठीला सासवड, सप्तमीला हडपसर, नवमीला पुणे आणि दशमीला आळंदीला मुक्कामी पोहोचते.
विठुरायाच्या दर्शनाने तृप्त झालेला वारकरी पुन्हा आपल्या प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळायला मोठ्या समाधानाने घराकडे येतो. वारीला निघण्यापूर्वी केलेली पेरणी आता शेतात तरारून वर आलेली असते. तिच्या मशागतीची वेळ आलेली असते. वारीत नामसंकीर्तनात वर्षभर पुरेल एवढी शक्ती त्या शेतकऱ्याला मिळालेली असते. वारीत माणसा माणसात माऊली शोधणारी माणसे आता पिकात भगवंत शोधू लागतात. त्याची पूजा करतात. हीच खरी आपल्या हिंदू संस्कृतीची विशेषता आहे.