डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
डॉ. तेजस वसंत लोखंडे
ज्ञानियांचे ज्ञेय, ध्यानियांचे ध्येय |
पुंडलिकाचे प्रिय सुखवस्तू |
जे तपस्वियांचे तप, जे जपकांचे जाप्य जे |
योगियांचे गौप्य, परमधाम |
ते हे समचरण, उभे विटेवरी |
पहा भीमातीरी विठ्ठलरूप ||
ज्याला ज्ञानाने जाणायचे, ज्याला ध्यानाने गाठायचे असे ते ज्ञेय, ध्येय, तपस्वियांचे तप, जपकांचे जाप्य, योगियांचे गौप्य जिथे विटेवर उभे आहे त्याला प्रेमाने आलिंगन द्यायला निघालेला महामेळा म्हणजे वारी आहे. या विठ्ठलाला भेटायला वारकरी भीमातीरी पंढरीला पायी वारी करत येतो.
वारीची परंपरा अनेक शतकांची आहे. ज्ञानेश्वराच्या घराण्यातही वारी चालू होती. गेलेल्या काळात वारीने अनेक स्थित्यंतरे पाहिली असतील. परकीय सत्तांच्या आक्रमणाच्या काळातही वारी अखंड चालू होती. मुघल शासकांनी हिंदू धर्म बुडवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. अनेक मंदिरे तोडली, मूर्ती भग्न केल्या. पंढरीच्या विठोबाला सुद्धा अनेकदा आपले स्थान सोडून सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागला होता. एकनाथ महाराजांच्या आजोबांनी म्हणजे भानुदास महाराजांनी एकदा आक्रमण काळानंतर विठू माऊलीला पंढरीत पुन:स्थापित केले. या वारीच्या संरक्षणार्थ राजे शिवछत्रपतींनी तसेच संभाजी महाराजांनी अनेकदा आपली फौज तैनात केली होती असे उल्लेख काही ठिकाणी ओझरते सापडतात.
देशातल्या अनेक भागातून भक्त विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. एवढ्या मोठ्या जनसमुदायाच्या लाडक्या देवाची मूर्तीही तशी विशेषच आहे.
विठ्ठलमूर्तीची वैशिष्ट्ये
विठ्ठलाच्या मूर्तीचा कटीच्या खालचा भाग ब्रह्मास्वरूप, कटीपासून मानेपर्यंतचा भाग श्रीविष्णुस्वरूप, तर मस्तकाचा भाग शिवस्वरूप आहे. मूर्तीचा रंग काळा असला, तरी खर्या भक्ताला सूक्ष्म दर्शनेंद्रियाने मूर्ती पांढरीच दिसते. मूर्तीच्या आज्ञाचक्रातून तेजाची उधळण चालू आहे. मूर्तीचा हात कटीवर आहे. कटीप्रदेशाच्या वर ज्ञानेंद्रिये, तर खाली कर्मेंद्रिये आहेत. कटीवरचा हात हे कर्मेंद्रिये अधीन असल्याचे द्योतक आहे.
भक्त पुंडलिकाची वीट
वीट हे पृथ्वीतत्त्वाचे प्रतीक आहे. संसाराचा प्रारंभ पृथ्वी तत्वापासून होतो. अशा प्रकारे संसार आणि अध्यात्म याची सांगड विठ्ठलाच्या मूर्तीत घातली गेली आहे. प्रपंच साधून परमार्थ साधण्याची ही शिकवण आहे.
पांडुरंग
योग मार्गामध्ये पांढरा रंग निर्गुण तत्वाचे प्रतीक समजला जातो. सगुण रूपाला ‘श्री विठ्ठल’, तर निर्गुण रूपाला ‘पांडुरंग’ असे म्हटले जाते. हिमालयात अधिकांश शिवलिंगे पांढर्या रंगाची आहेत. त्यामुळे पांडुरंग हाच महादेव आणि विठ्ठल आहे.
मुक्तकेशी दासी
मुक्तकेशी दासीची बोटे पांडुरंगाच्या पायांत रुतली आहेत. बोटाची तशी खूण श्री विठ्ठलाच्या चरणावर आहे. श्री विठ्ठलाच्या चरणांशी मुक्ती मिळते; परंतु पुंडलिकासाठी प्रत्यक्ष पांडुरंग अवतरला आहे. त्यामुळे मुक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. ‘भक्ती करूनच मुक्ती मिळते’ असा याचा आध्यात्मिक अर्थ आहे.
श्री विठ्ठलाचे समचरण
श्री विठ्ठलाला सर्व समान आहे. कुणी लहान नाही, मोठा नाही. पांडुरंग हा समानतेचे प्रतीक आहे.
श्री विठ्ठलाच्या पायांतील तोडे
मनुष्याने स्वतःला बंधन घालून घ्यावे. कोणत्या मार्गाने जायचे, ते ठरवून घ्यावे. वाममार्गाला जात आहोत कि चांगल्या मार्गाने हे पहावे. चांगल्या मार्गाने जाताना सुद्धा अहंकाराची बेडी पडता कामा नये. त्यामुळे चांगल्या मार्गाने जातानाही बंधने पाळणे आवश्यक आहे, असे हे तोडे सांगतात.
श्री विठ्ठलाच्या पायांतील घुंगरवाळ काठी
विठ्ठलाच्या काठीला घुंगरू लावलेले आहेत. तिला घुंगरवाळ काठी म्हणतात. यांचा वापर गोपाल करत असत. गुरे सहसा या आवाजाच्या दिशेनेच मार्गक्रमाणा करतात. गुरे सैरावैरा धावतात. गुराखी काठीच्या साहाय्याने त्यांना वळतो. तसेच आपले षड्रिपु उधळत असतात. त्यांना साधना रूपी काठीने नियंत्रित ठेवायचे असते. संयमाने रहायचे असते. त्याचे प्रतिक ही काठी आहे.
कमरेचा वासरीवेलाचा करगोटा
वासना, षड्रिपू देवाने स्वतःच्या कमरेला बांधले आहे. देव कंबर कसून सर्व गोष्टींसाठी सिद्ध आहे. तसेच मानवानेही करायचे आहे.
अर्धांगिनी रुक्मिणीला बसायला दिलेली जागा
स्त्री आणि पुरुष एकच आहेत. स्त्री शिवाय पुरुष अपूर्ण आहे, याचे प्रतीक ही जागा आहे. आजच्या आधुनिक युगाच्या विचाराने सांगायचे तर Women Empowerment चे याहून उत्तम उदाहरण अख्ख्या जगाच्या पाठीवर सापडणार नाही.
श्रीवत्सलांच्छन
भृगुऋषींनी देवाच्या छातीवर लाथ मारली. त्यांच्या पावलाची खूण आजही माऊलीच्या छातीवर आहे. देवाने ऋषींची ही लाथ छातीवर झेलली. या ठिकाणी देवाने कुठलाही अहंकार बाळगला नाही. त्रागा न करता संयमाने ती खूण देव छातीवर मिरवत आहे. यातून देव आपल्याला राग आणि अहं घालवायला सांगत आहे. रागावर नियंत्रण मिळवावे, हे श्री विठ्ठल यातून आपल्याला सांगत आहे.
उजव्या हातातील कमळ पुष्प
कमळ हे शांतीचे प्रतीक आहे. कमल विषणूला प्रिय आहे.
डाव्या हातात शंख
शंख आपल्या नादाद्वारे सृष्टीतील समस्त दुष्ट शक्तींचा नायनाट करून सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करतो.
कानातील मकराकार कुंडले
ही कुंडले आपल्याला विकार विसरण्यास सांगत आहेत. ध्यान साधनेद्वारे आपण नवद्वारांपैकी कान सोडून अन्य सर्व द्वारे बंद करू शकतो. कान बंद करणे, हे केवळ निर्विकल्प समाधी मध्येच शक्य असते. मत्स्य हे आप तत्त्वाचे प्रतीक आहे. जोपर्यंत आप तत्त्वावर विजय मिळवत नाही, तोपर्यंत वायू तत्त्वापर्यंत पोहोचू शकत नाही. वायू तत्त्वापर्यंत पोहोचल्यानंतर आपण निर्विकल्प समाधीत जाणे आणि ध्वनीवर नियंत्रण मिळवणे; म्हणजे कान बंद करणे सुलभ होते, हेच ही मकराकार कुंडले आपल्याला सांगतात.
श्री विठ्ठलाच्या मस्तकावरील महादेवाच्या पिंडीचा आकार
भ्रूमध्याच्या वर चिदाकाश आहे. या चिदाकाशातील शुद्ध जाणिवेलाच आपण परमात्मा म्हणतो. हे महादेवाचे निर्गुण तत्व आहे.
श्री विठ्ठलाच्या दर्शनाचा आरंभ होतो, तो वीटेपासून म्हणजे देवाच्या सगुण रूपापासून आणि शेवट होतो तो महादेवाच्या पिंडीच्या आकाराच्या दर्शनात. साधनेत ‘सोहम्, सोहम्’ सांगितले जाते किंवा ‘हंसोहम्’ असे म्हटले जाते. ‘सोहम्, सोहम्’ म्हणतांना आपला श्वास स्थिरावतो आणि हंस होतो. त्यानंतर तो चिदाकाशात जातो. या चिदाकाशातील जी अहंविरहीत पूर्ण शुद्ध जाणीव आहे, ती म्हणजे ‘सोहम्’ किंवा ‘अहं ब्रह्मास्मि ।’ म्हणजे ‘मी ब्रह्म आहे’, ही जाणीव. विठ्ठलाच्या दर्शनाने ही जाणीव होते.
(लेखक डॉ. नरेंद्र भिकाजी कदम, BAMS, PGDHHAM, MBA, LLb. लेखनाची रुची आहे. सिक्सटीन डेज ऑन व्हील्स हे लदाखचे प्रवासवर्णन प्रकाशित झाले आहे. चाळ-वा-चाळ-व ही चाळ संस्कृतीची ओळख करून देणारी लेखमाला पुण्याच्या प्रभातमध्ये रुपगंध पुरवणीत प्रकाशित होते आहे.
त्यांच्या लेखनाला सुलेखनाची जोड दिली आहे ती डॉ. तेजस वसंत लोखंडे, BAMS, आयुर्वेद चिकित्सक यांनी. हा माणूस म्हणजे सुलेखन, रांगोळी, गड संवर्धन या गोष्टींसाठी सतत प्रयत्नशील असलेला अवलिया असंच म्हणावं लागेल.)