डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
डॉ. तेजस वसंत लोखंडे
वामांगी विनाकारण रुसून बसणे हे काही देवालाही चुकले नाही. अर्थात स्त्रियांकडे प्रत्येक गोष्टीला कारण असतेच. पंढरपुरी विठ्ठल आणि रखुमाई एकत्र नाहीत. रखुमाई विठ्ठलाकडे पाठ करून बसली आहे. दिंडीत चालणाऱ्या बायकांच्या डोक्यावरील अनेक मूर्तीत रखुमाईने फिरवले तोंड दिसूनही येते. विठ्ठल रखुमाईच्या या वियोगाच्या अनेक अख्यायिका आहेत. विठ्ठल म्हणजेच श्रीकृष्ण आणि कृष्णाची पत्नी रुक्मिणी म्हणजेच विठ्ठलाची रखुमाबाई. राधेचे कृष्णावरचे प्रेम सर्वज्ञात आहे. एकदा राधेला कृष्णाच्या मांडीवर बसलेली पाहून रुक्मिणी चिडली आणि दिंडीरवनात येऊन बसली. तिचा रुसवा काढण्यासाठी कृष्णही गोपाच्या वेशामध्ये तिथे आला. राधेला आवडणाऱ्या त्या वेशात पाहून रुक्मिणीचा राग अजूनच वाढला. ते दिंडीरवन म्हणजेच आत्ताचे पंढरपूर अशी आख्यायिका आहे. (ही आख्यायिका वारकरी संप्रदायाला मान्य नाही.) अठ्ठावीस युगे येणाऱ्या भक्तांच्या मदतीसाठी सतत धावणाऱ्या या विठ्ठलाकडून रूसलेल्या रखुमाईचा रुसवा काढायचे काम काही झाले नाही म्हणून आजही दोघांची मंदिरे वेगवेगळी आहेत.
असे असले तरी दिंडी सोहळ्यातल्या विठोबाच्या संगतीने त्यांच्या रखुमाई चालतात. संत मुक्ताबाई, संत जनाबाई अगदी अलीकडे बारामतीच्या संत जैतूनबी यांनी विठ्ठल प्रेमाची परंपरा चालू ठेवली आहे. कृष्णाला अत्यंत प्रिय अशी तुळस वृंदावनासह डोईवर घेऊन जाणाऱ्या या रखुमाईला पाहिले की सोहळ्याला त्या कृष्णाची आठवण आल्याशिवाय रहात नाही. आणि त्यामुळेच दिवसभरात गवळणी गाण्याची वेळ आली की सगळ्यांची कळी फारच खुलते.
दिंडीचा मुदपाकखाना दिंडी सोबतच असतो. त्यात अनेक गडी माणसांबरोबर मदतीसाठी बाई माणसांचाही भरणा असतो. ही सारी मंडळी पायी चालणाऱ्यां दिंडीच्या जेवणाची तरतूद करतात. यातली काही ठराविक मंडळी सोडली तर इतर मंडळी स्वेच्छेने किंवा आळीपाळीने मुदपाकखान्यात सेवा म्हणून काम करतात. प्रत्येक दिंडीच्या जेवणाचे वेगळे वैशिष्ठ्य असते. कोणाच्या जेवणात दिवसांत गोड जेवण असते तर काही दिंडीमध्ये चार हात लांब चार हात रुंद अशा महाकाय तव्यावर चपात्या भाजल्या जातात. कुठे बायांच्या जोडीने बापये जेवण करतात तर कुठे फक्त बायकाच जेवण करतात. दिंडीतल्या या अशा गोष्टींचा खराखुरा आस्वाद घ्यायचा असेल तर दिंडीच्या विसाव्याच्या ठिकाणी लवकरच जायचे. निमूटपणे जेवणाची तयारी करणाऱ्या या माणसांना न्याहाळायचे. थोडे बारकाईने निरीक्षण केले की, एवढे काम करूनही ही मंडळी थकत कशी नाहीत या प्रश्नाचे उत्तर मिळून जाते. भाजी निवडण्या, चिरण्यापासून पीठ मळण्यापर्यंतच्या सगळ्याच गोष्टी करत असताना सगळ्यांच्या मुखातून सतत अभंग चालू असतात. अजून खोलात जायचे असेल तर ज्या दिंडीत उतार वयातील अनुभवसंपन्न बायका आहेत त्या बायकांच्या ओव्या ऐका, जात्या वरच्या ओव्या, दळणाच्या ओव्या केल्या जाणाऱ्या प्रत्येक क्रियेला साजेशी ओवी गात गात त्यांचे काम चालू असते. असे असले तरी बायांचे आणि बापयांचे इथे वेगळे काही नसते. चालू असलेला एकच अभंग सगळ्यांच्या मुखातून एकाच वेळी वहात असतो. एकमेकांना न ओळखणारी किंवा किंचित ओळख असलेली ही मंडळी एकमेकांसोबत एवढ्या प्रेमाने रहातात हे या सोहळयाचे यश आहे.
या अभंगामुळे मनात येणारा द्वैत भाव जरी नाहीसा होत असला तरी दिंडीत चालणाऱ्या या स्त्रियांना अनेक संकटांचा सामना करावाच लागतो. रोजची स्नानादीक कर्मे समाज जागृत होण्यापूर्वी साधून घ्यावी लागतात. कित्येकदा पाण्याअभावी रस्त्यात येणाऱ्या एखाद्या पाण्याच्या प्रवाहात नेसत्या वस्त्रानिशी अंघोळ करून तात्पुरता आडोसा तयार करून वस्त्रे बदलावी लागतात. ओली वस्त्रे सुकावण्यासाठी एकटोक झाडाला दुसरे हातात असे करून सुकवली जातात. या ठिकाणी रंगीबेरंगी पातळे वाऱ्याने फडकताना दिसणारा नजारा वारीच्या कठिणतेची जाणीव करून देतो. शरीरधर्म कोणाला चुकला आहे. एवढ्या सगळ्या जनसमुदायातून आपल्या शरीरधर्मासाठी वाट शोधायचे कष्ट प्रत्येक मुक्कामाला या रखुमाईला करायला लागतात. एका दिवसासाठी एका जागेवर जमणाऱ्या या समुदायाला प्रशासन तरी काय व्यवस्था करणार?
पण ही रखुमाई प्रेमाने चालले आहे तोवर गोड आहे. रागावलेल्या रखुमाईसमोर जिथे देवाचे काही चालले नाही तिथे सामान्य जनांनी तिच्या मार्गात न आलेलेच बरे. ही रखुमाई रागाला न येईल याची सगळ्यांनी काळजी घेणे सोयिस्कर.
रुसली रुखमीण। हीच रुसण वंगाळ।।
देवा विठ्ठलाला। गार पाण्याची आंघोळ।।
रुसली रुखमीण। जावून बसली तळ्याला।।
पिरतीचा पांडूरंग। हात घाली तो गळ्याला।।
रुसली रुखमीण। एक रात ना एकयीळ।।
देवा विठ्ठलाच्या भोजनाची। ना तारांबळ।।
रूसलेल्या रुखमिणीचा राग लय वंगाळ आहे. देवांसारख्या देवाला ती रागात गार पाण्याने आंघोळ घालते. राग घालवायला देवाने गळ्यात हात घालून विनवणी केली तरी ती बधत नाही. तिच्या रागाची अशी ठराविक वेळ नाही त्यामुळे बिचाऱ्या देवाची जेवणाचीही पंचाईत झाली आहे.
(लेखक डॉ. नरेंद्र भिकाजी कदम, BAMS, PGDHHAM, MBA, LLb. लेखनाची रुची आहे. सिक्सटीन डेज ऑन व्हील्स हे लदाखचे प्रवासवर्णन प्रकाशित झाले आहे. चाळ-वा-चाळ-व ही चाळ संस्कृतीची ओळख करून देणारी लेखमाला पुण्याच्या प्रभातमध्ये रुपगंध पुरवणीत प्रकाशित होते आहे.
त्यांच्या लेखनाला सुलेखनाची जोड दिली आहे ती डॉ. तेजस वसंत लोखंडे, BAMS, आयुर्वेद चिकित्सक यांनी. हा माणूस म्हणजे सुलेखन, रांगोळी, गड संवर्धन या गोष्टींसाठी सतत प्रयत्नशील असलेला अवलिया असंच म्हणावं लागेल.)