डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
डॉ. तेजस वसंत लोखंडे
जिवा शिवाची बैलजोSSSSड
लाविन पैजेला आपली पुढं
डौल मोराच्या मानाचा र मानाचा
येग रामाच्या बानाचा र बानाचा
माऊलीच्या दिंडीचा मार्ग अत्यंत खडतर आहे. वीस दिवसांत साधारण अडीचशे किलोमीटरचे अंतर पार करून दिंडी पंढरपूरला येते. जवळपास तीन टनांचा माऊलीचा रथही हे अंतर चालून येतो. एवढ्या वजनाचा रथ ओढणे आणि हे अंतर न थकता चालणे यासाठी रथाला ओढून आणायला बैलजोडीही तशीच खंबीर असावी लागते.
रथाच्या या बैलजोडीच्या मागे ही एक परंपरा आहे. माऊलीचा रथ ओढण्याचे भाग्य सहज कोणाच्या पदरात पडणारे नाही. आळंदीतल्या ठराविक सहा कुटुंबांकडे हा मान आहे. रानवडे, कोंढरे, भोसले, वरवडे, कुऱ्हाडे आणि वहिले या कुटुंबांकडे दरवर्षी हा मान आलटून पालटून जात असतो. याउलट तुकाराम महाराजांच्या पालखीला मात्र हा मान मिळवण्यासाठी कोणीही शेतकरी अर्ज करू शकतो. अर्ज केलेल्या बैलजोड्याचे व्यवस्थित परीक्षण करून त्या वर्षासाठी हा मान निवडलेल्या दोन शेतकऱ्यांना दिला जातो. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहोळयात एकच बैलजोड रथाला जुंपली जाते. तर तुकाराम महाराजांच्या सोहोळयात एक आड एक दिवस अशा दोन बैलजोड्या रथ ओढण्याचे काम करतात.
माऊलींचा रथ दिमाखदारच असतो. या रथावर नक्षी काम केलेल्या दहा महिरपी आहेत, रथाचे चार गज आणि तीन घुमट हे तोलण्यासाठी आठ मजबूत स्तंभ, गरुड हनुमंतांच्या प्रतिकृती आणि रथाचे सौंदर्य खुलवणारे अकरा कळस, या साऱ्यांच्या मुळे रथाचे वजन भरभक्कम झाले आहे. शिवाय रोजच्यारोज होणारी रथाची पुष्प सजावट रथाच्या वजनात भर घालत असते. रथाला पुष्प सजावट करण्यासाठीही नोंदणी करावी लागते. केवळ पैसा आहे म्हणून कोणालाही पुष्प सजावट करता येईल असे नाही.
एवढा अवजड रथ ओढण्यासाठी बैल हे जातिवंतच असावे लागतात. दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेली ‘खिलार’ जातीची जातिवंत बैलजोडी रथाला जोडली जाते. खिलार बैल दिसायला अत्यंत दिमाखदार, पांढरे शुभ्र, उंचपुरे आणि देखणे असतात. इतर बैलांच्या मानाने यांची शिंगेही आकर्षक आणि ऊंच असतात. माऊलीच्या रथाला जुंपल्यानंतर शिंगांना लावलेल्या गोंड्यामुळे ती लांबूनही दिसून येतात.
ज्यांना रथाच्या बैलजोडीचा मान मिळतो त्यांचे काम वारी चालू व्हायच्या दीड दोन महीने आधी चालू होते. घरातली जुनी खिलार बैलजोडी चपळ असली तरच ती जोडी रथाला वापरतात, पण सहसा नवीनच बैलजोडी आणण्याकडे या लोकांचा कल असतो. आजच्या घडीला चार, साडेचार लाखांच्या पुढे या जोडीची किंमत आहे, हे मुद्दाम इथे नमुद करतो. अत्यंत काटक असलेली ही बैले रथ ओढताना थकून जाऊ नयेत म्हणून त्यांना रीतसर प्रशिक्षण दिले जाते. अंगाला कामाची सवय लागावी म्हणून न थकता त्यांच्याकडून नांगरणी, कुळवणीची इत्यादी कामे करून घेऊन त्यांचा दम वाढवला जातो. रोजच्या रोज त्यांना चालण्याचा व्यायामही घडवला जातो. वजनदार बैलगाडी चढावरून ओढणे इत्यादी कामे त्यांच्याकडून करवून घेतली जातात. त्याचबरोबर त्यांना योग्य प्रमाणात खुराकही रोजच्यारोज दिला जातो. त्यांच्या तब्बेतीचे निरीक्षण करायला डॉक्टरही तैनात केला जातो.
माऊलीच्या पालखीचा पहिला महत्वाचा टप्पा म्हणजे पुणे ते सासवड. जवळजवळ अडतीस किलोमीटरचा हा टप्पा दिवे घाटातून जातो. तीव्र चढणीच्या या घाटात मोकळे चालायलाही कष्ट पडतात. इतके असूनही या सगळ्यात वारकऱ्यांच्या मनातलं उल्हास खूप असतो. घाटाच्या वरच्या टोकाला उभे राहून मागे नजर टाकली तर घाटाच्या खालच्या टोकाच्याही मागे असणारी माणसांची न संपणारी रांग पाहिली की विठ्ठल दर्शनाची यांची तीव्र इच्छा लक्षात येते. आपण आजपर्यंत डोंगर माथ्यावरून खाली झेपावणाऱ्या नदीचा जलप्रवाह पाहिला आहे, मात्र पंढरपूरकडे मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांच्या भक्तीगंगेचा हा विशाल जनप्रवाह सपाटीकडून घाटाकडे असा खालून वर उलट दिशेने प्रवास करतो. संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक घाटमाथे, डोंगरशिखरे ओलांडून दिंड्या विठ्ठलाच्या भेटीसाठी सर्व श्रम सहन करत चालतच असतात. हा ऊर्ध्वगामी जाणारा पालख्यांचा सोहळा म्हणजे जणू काही आश्चर्यच आहे. पाण्याप्रमाणे अधोगामी असणारा भक्तीचा प्रवाह ऊर्ध्वगामी झालेला बघून संत एकनाथ महाराज लिहितात.
आज सई म्या नवल देखिले ।
वळचणीचे पाणी आढयाला लागले ।
नाथा घरची ही उलटी खुण अर्थपूर्ण आहे. जनलोकांचा प्रवाह प्रपंचाकडून परमार्थाकडे, अविचार अविवेकाकडून विचार विवेकाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे असा ऊर्ध्वगामी दिशेने जातो.
आचार्य अत्रेंनी लिहून ठेवले आहे. वारकऱ्यांच्या जीवनात दोनच सण आहेत ते म्हणजे आषाढी आणि कार्तिकी पण हे सण इतर सणांसारखे भोजनाचे नाहीत तर ते भजनाचे आहेत.
चला पंढरीसी जाऊ | रखुमादेवीवरा पाहू ||
डोळे निवतील कान | मना तेथे समाधान ||
(लेखक डॉ. नरेंद्र भिकाजी कदम, BAMS, PGDHHAM, MBA, LLb. लेखनाची रुची आहे. सिक्सटीन डेज ऑन व्हील्स हे लदाखचे प्रवासवर्णन प्रकाशित झाले आहे. चाळ-वा-चाळ-व ही चाळ संस्कृतीची ओळख करून देणारी लेखमाला पुण्याच्या प्रभातमध्ये रुपगंध पुरवणीत प्रकाशित होते आहे.
त्यांच्या लेखनाला सुलेखनाची जोड दिली आहे ती डॉ. तेजस वसंत लोखंडे, BAMS, आयुर्वेद चिकित्सक यांनी. हा माणूस म्हणजे सुलेखन, रांगोळी, गड संवर्धन या गोष्टींसाठी सतत प्रयत्नशील असलेला अवलिया असंच म्हणावं लागेल.)