डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
डॉ. तेजस वसंत लोखंडे
वारीत नोंदणीकृत दिंड्यांचे काम फार नियोजनबद्ध असते. दिंडी मालक, चालक आणि त्यात असणारे वारकरी यांचे जणू एक कुटुंबच झालेले असते. वारकऱ्यांच्या जोडीला इतरही अनेक माणसांची दिंडीला गरज असते. सुरुवातीला पंढरीला पायी जाणे ही प्रथा होती. कालांतराने पायी चाळणाऱ्यांसोबत बैलगाड्या येऊ लागल्या. वारीची गोडी समाजात वाढीला लागली. दिंडीला पालखी सोहळ्याचे स्वरूप आले. मोटार गाड्या रस्त्यावरून धावायला लागल्यानंतर कालांतराने बैलगाडीची जागा ट्रकने घेतली. लोकांच्या सामानाचा भार वाहून नेणारी सुविधा प्राप्त होताच दिंडीतला जनसमुदाय आणखी वाढीला लागला. दिंडीचे ट्रक सकाळी पालखी हलण्यापूर्वी दुपारच्या विसाव्याच्या ठरल्या ठिकाणी जाऊन जेवणाची तयारी करतात.
दिंडी विसावताच जेवणावळी उठतात आणि पुन्हा दुपारी पालखी हलण्यापूर्वी रात्रीच्या मुक्कामाला पोहोचून पाले लावणे, जेवणाची तयारी करणे आणि रात्रीच्या भजन, कीर्तनाची तयारी अशी तयारी करतात. सध्याच्या काळात वाढलेल्या जनसमुदायाने दिंडी मालकांना सकाळच्या व रात्रीच्या मुक्कामाला दोन स्वतंत्र ट्रकची सोय करायला लागली आहे. दिंडीला वीस बावीस दिवस लागणारा अन्न साठा, दिंडीच्या भोजनाची सोय, रात्रीच्या मुक्कामाची पाले(यांचे स्वरूप काहीसे लष्कराच्या तंबू सारखे आहे), पालांच्या ठिकाणी दिवाबत्तीची सोय करणे इत्यादी अनेक कामे या ट्रकमध्ये असलेल्या सेवेकऱ्यांना करावी लागतात. रात्री दिवाबत्तीसाठी असणारे टेंभे, कंदील, गॅस बत्त्या जाऊन आता डायरेक्ट महावितरणच्या लायनीवर आकडा टाकून उजेडाची सोय झाली. काही दिंडयानी रीतसर जनरेटर ठेवले आहेत. पूर्वी या ट्रकमध्ये सरपणासाठी लागणारा लाकूड फाटा फार जागा व्यापत असे. मुक्कामाच्या प्रत्येक ठिकाणी सरकारने गॅस सिलेंडर्स मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिल्याने ट्रकचे ओझे पार कमी झाले आहे. ट्रकात बसलेले एखाद दोन म्हातारे वारकरी, दिंडीच्या संख्येप्रमाणे आवश्यक सेवेकरी, वारकऱ्यांच्या वळकट्या, ट्रकच्या दोन्ही बाजूला लटकत असलेली टमरेले, स्वयंपाकाची, जेवणावळीची भांडी हे सगळे रूप वारीच्या काठिणतेची साक्ष देत असते. दिंडीच्या या सगळ्या वाढलेल्या लवाजम्याने पालखीच्या मार्गावर वाहतुकीचा ताण प्रचंड प्रमाणात वाढला आहे. अनेकदा तर रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेलाही महत प्रयासाने यातून मार्ग मिळतो. पालखी निघण्याच्या ठिकाणापासून पालखीच्या मुक्कामापर्यंत एक दिशा मार्ग केलेला असतो. अगदी मंत्र्यांच्या गाडीलाही विरुद्ध दिशेने पोलिस प्रवेश देत नाहीत. पालखीच्या मार्गाने जाणाऱ्या गाड्याही अगदी मुंगीच्या गतीने चालत असतात.
दिंडीचा वारकरी फक्त आणि फक्त आपल्या दिंडीतच जेवण करणार. अनेक दिंडीमध्ये अत्यंत सुग्रास, सात्विक जेवणावळी घडत असतात. आठवड्यातून दोन तीन वेळा गोडांचे जेवण असते. या साऱ्यांचा खर्च अंदाज दिंडी मालक दिंडी सुरू करण्यापूर्वीच लावतात आणि त्या प्रमाणात वारकऱ्यांना दिंडीत चालण्यासाठी पैसे भरावे लागतात. रोजच्या जेवणासाठी लागणारा भाजीपाला सोडला तर एकूणएक सामान ट्रकात भरून ट्रक दिंडीत सामील होतात. आजकाल दिंडीच्या मार्गावर आजूबाजुचे गावकरी ताजा भाजीपाला विकण्यासाठी आणतात. जीवनात आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट आता दिंडीच्या मार्गात उपलब्ध आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात वारीचे रूप खूपच पालटले आहे. पिढ्यानपिढ्या वारीची परंपरा असणाऱ्या वारकऱ्यासोबत अनेक नवे वारकरी जोडले जात आहेत. बदलत्या परिस्थितीला लक्षात घेऊन वृक्ष दिंडी, पर्यावरण दिंडी, स्वच्छता अभियान दिंडी अशा नवनवीन दिंडी वारीची शोभा वाढवीत आहेत. पर्यायाने पर्यावरण रक्षणाची माहिती सगळ्यांसामोर आणत आहेत. या सगळ्यांचा हा आटापिटा केवळ एकाच गोष्टीसाठी आहे.
माझे जीवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ।।
पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणी वेधले ।।
जागृति स्वप्न सुषुप्ति नाठवे । पाहता रूप आनंदी आनंद साठवे ।।
बाप रखुमादेविवर सगुण निर्गुण । रूप विटेवरी दाविली खूण ।।
टाळ, मृदुंगाच्या तालावर विशेष आवडीने गायला जाणारा हा अभंग वारकऱ्यांच्या विठ्ठल भेटीची उत्कटता नमूद करतो. प्रत्येक वारकऱ्याचा पंढरपूरला वारीबरोबर जाणे हा ध्यास आहे ही त्याच्या मनाची आत्यंतिक आवड आहे. वारीत चालत असताना त्याचे मन पांडुरंगाच्या भक्तिरंगात पार बुडून गेले आहे. गोविंदाचा अवतार मानला गेलेल्या विठ्ठलाच्या गुणांनी त्याच्या मनाला वेधून टाकले आहे. त्याचे जागृत, अर्धजागृत आणि स्वप्न या तिन्ही अवस्थांचे भान हरपले असून त्याच्या डोळ्यासमोर सतत येणाऱ्या विठुरायाच्या सावळ्या रूपाला पाहताच त्याच्या मनात आनंदाच्या लाटा दाटून येतात. हा विठुराया जसा निर्गुण, निराकार आहे, तसाच सगुण आहे. विटेवरचे त्याचे देखणे रूप ही सगुणपणाची खूण आहे.
(लेखक डॉ. नरेंद्र भिकाजी कदम, BAMS, PGDHHAM, MBA, LLb. लेखनाची रुची आहे. सिक्सटीन डेज ऑन व्हील्स हे लदाखचे प्रवासवर्णन प्रकाशित झाले आहे. चाळ-वा-चाळ-व ही चाळ संस्कृतीची ओळख करून देणारी लेखमाला पुण्याच्या प्रभातमध्ये रुपगंध पुरवणीत प्रकाशित होते आहे.
त्यांच्या लेखनाला सुलेखनाची जोड दिली आहे ती डॉ. तेजस वसंत लोखंडे, BAMS, आयुर्वेद चिकित्सक यांनी. हा माणूस म्हणजे सुलेखन, रांगोळी, गड संवर्धन या गोष्टींसाठी सतत प्रयत्नशील असलेला अवलिया असंच म्हणावं लागेल.)