मुक्तपीठ टीम
आजवर कोरोना चाचणी म्हटलं एक त्रासदायक प्रक्रिया असा ज्यांचा समज असायचा त्यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता मोबाईलच्या स्क्रिनच्या माध्यमातून कोरोना चाचणीची पद्धत इंग्लंडमध्ये शोधण्यात आली आहे. चाचणीसाठी आता नाक किंवा घशातून नमुने घेण्याची गरज नाही, कारण लंडनच्या संशोधकांनी कोरोनाच्या चाचणीची एक नवीन पद्धत विकसित केली आहे. त्याला फोन स्क्रीन टेस्टिंग असे नाव देण्यात आले आहे.
स्मार्टफोनच्या स्क्रीनवरून नमुने घेतले जाऊ शकतात. संशोधकांचा असा दावा आहे की फोन स्क्रीन टेस्टिंगद्वारे घेतेले नमुने हे आरटी-पीसीआरइतकेच अचूक असतात आणि किंमतही कमी असते. लंडनचं युनिव्हर्सिटी कॉलेज आणि डायग्नोसिस बायोटेक स्टार्टअपच्या सहकार्याने या चाचणीला तयार केले आहे.
कोरोना चाचणीसाठी स्मार्टफोनच का?
• एखादी व्यक्ती खोकते किंवा बोलते तेव्हा थुंकीचे थेंब तोंडातून बाहेर पडतात आणि सभोवतालच्या पृष्ठभागावर गोळा होतात.
• कोरोनाने संक्रमित झालेल्या व्यक्तीच्या थेंबांमध्ये विषाणू अंश असतात.
• तोंडातून बाहेर पडणारे हे थेंब स्मार्टफोनच्या स्क्रीनवर जमा होतात.
• स्वॅब स्टिकच्या सहाय्याने, स्क्रीनवर असलेल्या विषाणूच्या कणांचे नमुना घेऊन आणि ते सलाईन वॉटरमध्ये ठेवले जाते.
• मग ते प्रयोगशाळेत पाठवले जाते.
८१ ते १००% अचूक परिणाम
• शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की फोन स्क्रीन चाचणी ८१ ते १०० टक्क्यांपर्यंत अचूक निकाल देते.
• संशोधनाच्या वेळी ५४० लोकांवर केलेल्या तपासणीत हे देखील सिद्ध झाले आहे.
• या रुग्णांची आरटी-पीसीआर आणि फोन स्क्रीन चाचणी घेण्यात आली.
• ५४० पैकी ५१ लोक संसर्गित असल्याचे आढळले.
• नवीन चाचणीतही अशीच प्रकरणे नोंदवली गेली.
• संशोधकांचे म्हणणे आहे की फोन स्क्रीन चाचणी नकारात्मक प्रकरणांचा ९८.८ टक्के अचूक निकाल देते.
• तपासणी दरम्यान, केवळ ६ नमुने सकारात्मक दर्शविले जे स्वॅब टेस्टमध्ये नकारात्मक असल्याचे सिद्ध झाले.