मुक्तपीठ टीम
कोरोना महामारीमुळे यंदाच्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द कराव्या लागल्यानंतर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार यंदा वर्षातून दोनवेळा बोर्ड परीक्षा घेण्यात येणार आहे.
सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ला दोन भागात विभागलं आहे. प्रत्येक सत्रात जवळपास ५० टक्के अभ्यासक्रम असेल. पहिल्या सत्राची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तर दुसऱ्या सत्राची मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात येईल. या सत्र परीक्षा ९० मिनिटांच्या असतील. याबाबत या महिन्यात नोटिफिकेशनही काढण्यात येणार आहे
दोन्ही सत्रांच्या आधारे निकाल लागेल-
- विभाजित अभ्यासक्रमाच्या आधारावरच सीबीएसई वर्षात दोन वेळा परीक्षा आयोजित करणार आहे.
- परीक्षांचे पेपर बोर्डच तयार करेल.
- सत्र-१ चा पेपर बहुपर्यायी प्रश्नावर आधारित असेल.
- तो ओएमआर शीटवर असेल.
- परिस्थिती पूर्णपणे अनुकूल राहिल्यास सत्र परीक्षा बाहेरील पर्यवेक्षकाच्या उपस्थितीत वा बाह्य केंद्रांवर होऊ शकतात.
- विद्यार्थ्यांना पहिल्या आणि दुसर्या सत्रामध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे अंतिम निकाल तयार केला जाईल.
- दोन्ही सत्राच्या परीक्षांव्यतिरिक्त ९ वी व १० वीसाठी अंतर्गत मूल्यांकन म्हणून शाळांना वर्षभरात किमान ३ पीरियोडिक टेस्ट घ्याव्या लागतील.
- तसेच स्टुडेंट एनरिचमेंट, पोर्टफोलिओ व प्रॅक्टिकल आणि कार्यानुभव यांचाही प्रकल्पात समावेश करण्यास सांगण्यात आले आहे.
- ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठीही शाळांना अंतर्गत मूल्यांकनात प्रत्येक युनिटची चाचणी, प्रॅक्टिकल आणि प्रोजेक्ट वर्कचा समावेश करावा लागेल.
- सर्व शाळांना सीबीएसईच्या आयटी पोर्टलवर विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन गुण अपलोड करावे लागतील.
कोरोनामुळे निर्णय घेण्यात आला-
- सीबीएसईने शाळांना विद्यार्थ्यांची प्रोफाइल तयार करण्यास सांगितले आहे.
- शाळा विद्यार्थ्यांचे प्रोफाइल तयार करेल आणि वर्षभरात केलेल्या सर्व मूल्यांकनांसाठी डिजिटल स्वरूप तयार करेल.
- कोरोना महामारी लक्षात घेता सीबीएसईने हा निर्णय घेतला आहे.
- २०२२ च्या दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या योजनेसंदर्भात सीबीएसईने म्हटलं की इंटरनल असेसमेंट/ प्रॅक्टिकल/प्रोजेक्ट वर्कला अधिक विश्वासार्ह बनवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.