तुळशीदास भोईटे
खरंतर हा लेख आज लिहिलेला नाही. मुक्तपीठ या आपल्या मुक्त माध्यम उपक्रमाची ६ जानेवारी २०२१ रोजी पत्रकारदिनी सुरुवात केली. त्या दिवशी प्रकाशित झालेला हा लेख आहे. पण मुद्दामच का्हीही बदल न करता तसाच प्रकाशित करत आहे. कारण राजकारण्यांच्या लक्षात यावं, मुलांचे बळी जातात. नाहक ते जीवन संपवतात. तुम्ही मात्र तेवढ्यापुरते नकाश्रू ढाळून पुन्हा तसेच वागता. आता स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येनंतर तरी सरकारनं जागावं. तुम्ही आधींच्याच्या विरोधात जे बोलायचा ते आठवावं. सत्तेवर आलात म्हणजे वास्तवाशी प्रतारणा केलीच पाहिजे असे नाही. जागा आता तरी जागा.
एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षा म्हणजे महाराष्ट्रातील युवावर्गासाठी चक्रव्यूह ठरू लागल्या आहेत. त्यांची अवस्था महाभारतातील अभिमन्यूसारखी होण्याची भीती आहे नव्हे बऱ्याच प्रमाणात झालीही आहे. त्या अभिमन्यूला चक्रव्यूह भेदून आत जाण्याचं ज्ञान होतं, पण पुन्हा बाहेर येणं अवगत नव्हतं. ऐन तारुण्यात तो तिथंच संपला. आपल्या महाराष्ट्रातील युवा वर्गाचं जीवन असं अकाली संपू नये. सर्व चालेल पण ऐन उमेदीत त्यांचं जीवन करपू नये, यासाठी आपण सर्वांनीच समाज म्हणूनही प्रयत्न केले पाहिजेत. चक्रव्यूहात शिरला असाल, पण तेच जीवन नाही. तिथं नाही मिळालं यश तरी आम्ही सोबत आहोत. एका चक्रव्युहानं जीवनाचं महाभारत तुम्ही गमावलं असं नाही. खूप आहे जीवनात. तुम्ही सर कराल अशी यापेक्षाही उंच शिखरं आहेत. तुमच्या त्या शिखरांकडच्या प्रवासात आम्ही सोबत असू. असा विश्वास आपण या सळसळत्या रक्ताला दिला पाहिजे.
समाज म्हणून ही आपली जबाबदारी, राजकारण्यांची त्यापेक्षा मोठी. तुम्ही सत्तेवर नसताना या तरुणांविषयी जे बोलता ते सत्तेवर आल्यावर कसे विसरता? कृपया तसं करू नका. आज सत्तेत असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस नेत्यांनी आठवून पाहावं, त्यांनी या मुलांना दिलेले शब्द. भाजपच्या नेत्यांनीही अशीच स्मरणशक्ती जागवावी. हे तरूण माझ्यासारख्या एका सामान्य पत्रकाराशी बोलताना मन मोकळं करतात. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांविषयी जे बोलतात. त्यांच्या कोलांट्याउड्यांविषयी जो संताप व्यक्त करतात. ते व्यवस्थेवरचा त्यांचा विश्वास उडत असल्याचं दाखवणारं आहे. हे आपल्याला परवडणारं नाही. लोकशाहीसाठी चांगलं नाही.
हे तरुण जास्त काही मागत नाहीत. त्यांना वेळेत संधी पाहिजे. गुणवत्तेच्या बळावर, ज्या प्रवर्गात ते असतील त्या प्रवर्गातून, रोजगाराची संधी त्यांना पाहिजे. खरं तर तो त्यांचा हक्क आहे. पण नादान राजकारणानं त्यांना तो हक्क सातत्यानं नाकारला आहे. मराठवाड्यातील एक तरूण माझ्याशी बोलताना हमसाहमशी रडू लागला तेव्हा मलाही भावना आवरणं कठिण झालं. कसंबसं त्याला समजावलं. कदाचित मला तसं वाटलं. पण आता या कोरड्या शब्दांनी या तरुणांचे समाधान होणार नाही. त्यांच्या रिकाम्या हातांना हक्काचा रोजगार दिलाचा पाहिजे. एमपीएससी परीक्षा व्यवस्थेतील सावळागोंधळ दूर झालाच पाहिजे. परीक्षा वेळेवर झाल्या पाहिजेत, निकाल वेळेवर लागले पाहिजेत, वेटिंग लिस्ट मार्गी लावत लवकरात लवकर नियुक्ती मिळालीच पाहिजे.
वय उलटू लागतं तरीही संधीची वाट पाहायची, मग वय उलटलं म्हणून संधी नाकारायची ही शकुनी फसवणूक आहे. सत्तेतील प्रत्येक पक्ष ती करत आला आहे. राजकारण्यांनी कल्पना करावी, तुम्हाला हक्क असतानाही जेव्हा निवडणुकीच्या संधीपासून डावललं जात तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? एवढी कल्पना करा तुम्हाला कळेल या एमपीएससीग्रस्त तरुणांच्या वेदना काय आहेत ते!
आशावाद त्या तरुणांच्या मनात जागत ठेवणं, त्यांची ऊर्जा कायम राखणं, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. जबाबदारीच्या या भूमिकेतूनच आपल्या मुक्तपीठच्या शुभारंभीच या तरुणांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करत आहोत. रोजच या विषयावर बातम्या, मत-मतांतरे मांडण्याचा प्रयत्न असेल.
तुम्ही पत्रकार असा नसा, मुक्तपीठ तुमचं आहे. मुक्तपीठचा उद्देश लक्षात ठेवा…”बजावा हक्क, व्हा अभिव्यक्त”
तुळशीदास भोईटे मुक्तपीठचे संपादक आहेत. संपर्क 9833794961 ट्विटर @TulsidasBhoite
मुक्तपीठच्या पहिल्या दिवशी प्रकाशित सरळस्पष्ट भाष्य लेखाची लिंक: