मुक्तपीठ टीम
एमएमआरडीएच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे ऐन पावसाळ्यात मोरे, चाचड आणि गिरधर या कुटुंबियांवर बेघर होण्याची वेळ आली होती. घर पुन्हा त्याच ठिकाणी मिळण्याची कुठलीच धुसर आशा दिसत नव्हती. परंतु जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर या कुटुंबांच्या मदतीला धावून आले व यांच्यामुळेच प्रतापनगर येथील बेघर झालेल्या कुटुंबियांना पुन्हा त्याच ठिकाणी घरकुल तर मिळालेच त्याचबरोबर घरातील नुकसान झालेल्या सामानाची भरपाईही मिळाली. शिवसेना व कार्यकर्ता हा नेहमीच समाजकारणासाठी नेहमीच अग्रेसर असतो या घटनेवरुन पुन्हा एकदा सिद्ध झाल्याने या तिन्ही कुटुंबियांनी वायकर यांचे आभार मानले आहेत.
जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर सध्या मेट्रो-६ चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम सुरू असताना अडथळा ठरणारे पादचारी पुल एमएमआरडीएतफेॅ पाडण्यात येत आहेत. यातील मुंबई महानगरपालिकेने प्रतापनगर येथे उभारलेल्या पादचारी पुल एमएमआरडीएतफेॅ रात्रीच्यावेळी निष्कासित करण्यात येत होते. हे काम सुरू असताना या पुलाच्या खांबांचा काही भाग काही अंतरावर असलेल्या येथील रमेश मोरे, स्वप्नाली चाचड आणि राकेश गिरधर यांच्या घरांवर पडला. त्यामुळे येथील घरांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. घराच्या भिंतीला मोठ्याप्रमाणात तडे पडले तर घरांतील सामानाचे ही नुकसान झाले. सुदैवाने या घटनेमुळे जिवीत हानी मात्र झाली नाही. घराचा दर्शनी भाग संपुर्ण तुटल्याने या घरात रहायचे कसे असा प्रश्न या कुटुंबांना सतावू लागला. या घटनेची माहिती मिळताच विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व या कुटुंबांशी संवाद साधला. एवढेच नव्हे तर त्यांनी लगेचच एमएमआरडीएचे आयुक्त तसेच येथील मेट्रोचे काम करणार्या जे कुमार यांच्याशीही संपर्क साधून या तिनही कुटुंबांना तात्काळ त्याच ठिकाणी पुन्हा घरकुल बांधून देण्याचे तसेच घरातील सामानाची नुकसान भरपाई देण्याच्या सुचना संबंधितांना दिल्या.
त्यानुसार एमएमआरडीए तसेच जे. कुमार यांनी तात्काळ या तिनही कुटुंबांना त्याच ठिकाणी घरकुल बांधून दिले तसेच घरातील सामानाची झालेल्या नुकसानाची भरपाईही रमेश मोरे, स्वप्नाली चाचड व राकेश गिरधर या तीन कुटुंबांना मिळवून दिली. आमदार वायकर यांच्यामुळेच हे सगळे शक्य झाले. शिवसेना व शिवसैनिक नेहमीच जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतो, हे या घटनेवरुन सिद्ध झाल्याची, अशी भावना या तिनही कुटुंबांनी व्यक्त करीत वायकर यांची भेट घेऊ पुष्पगुच्छ देऊन आमदार वायकर यांचे आभार मानले. या कामासाठी स्थानिक नगरसेवक प्रविण शिंदे, उपविभागप्रमुख बाळा साटम व शाखाप्रमुख प्रदीप गांधी यांनी विशेष परिश्रम घेतले.