मुक्तपीठ टीम
संकट येतं. प्रतिकुलता घेरते. निराशा दाटते. म्हणून काय हतबल व्हायचं? परिस्थिती जशी आहे तशी. ओढवली असेल कशीही. जर निर्धार केला परिस्थिती बदलायचा, तर अशक्य नसतं काही. वाशिमच्या जामखेड गावातील पोफळे कुटुंबानं लॉकडाऊनचा सक्तीचा विश्रांतीचा काळ विहीर खोदण्यासाठी सत्कारणी लाववा. फक्त फावड्याचा वापर करत त्यांनी २२ दिवसात त्यांनी २० फुटी विहीर खोदली.
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जामखेड येथील रामदास पोफळे गुजरातमधील सुरतला नोकरी करत असत. कोरोनामुळे काम धंदा नसल्याने गुजरातहून गावाकडे परत आले. कोरोनामुळे कडक निर्बंधात घरी वेळ जात नाही, यावेळेस काय करावे असा प्रश्न पडला. मात्र त्याचवेळी गावात पाणी टंचाईचे चटके बसू लागले. त्यामुळे आपल्यासाठी घरीच विहीर खोदावी का यावर पत्नीसोबत चर्चा केली. दोघांची सहमती झाल्यानंतर दोघंही विहीर खोदण्याच्या कामाला लागले.
या दाम्पत्याने खोदकाम सुरु केले तेव्हा अनेकांनी त्यांची थट्टा केली. पण रामदास पोफळेंचा निर्धार पक्का होता. ते खणत राहिले. सोबत पत्नी आणि मुलगा विलासही मदत करु लागले. खूप खोदूनही पाणी काही लागत नव्हते. पण त्यांनी हिंमत हरली नाही. खोदत राहिले. पाहता पाहता २२ दिवस उलटले. पण अखेर २० फूट खोदकाम झाले आणि पाणी लागले.
घरी बोअरवेल न घेता विहीर फायदेशीर ठरते आणि आपल्याला असलेली पाण्याची गरजेबरोबर इतरांना पाणी मिळू शकले या भावनेतून त्यांनी विहीर खोदली आहे. यामध्ये पत्नी आणि १० वर्षाच्या मुलाचं योगदान मिळाले असल्याच रामदास सांगतात. कोरोनाची भीती आणि वाढता उन्हाचा पारा त्यामुळे बाहेर निघणे कठीण होऊन बसले अशा वेळेस एक दीड किलोमीटर वरून पाणी भरण्यासाठीचा त्रासमधून बाहेर पडण्यासाठी त्यांनी विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. यावेळी शेजाऱ्यांनीही हसण्यावर घेत त्यांची खिल्ली उडविली. मात्र, त्यांनी खचून न जाता आपला निर्णय कायम ठेवत विहीर खोदण्यास सुरुवात केली व पाणी लागले. कोरोना काळात कोरोनाशी दोन हात करत मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत खोदलेल्या विहिरीची चर्चा पंचक्रोशीत आहे.