योगेश केदार / व्हाअभिव्यक्त!
लोकांना वेठीस धरून स्वतः चे राजकीय अस्तित्व तयार करणारे नेते आजपर्यंत महाराष्ट्राने पाहिले आहेत. एका जातीला दुसऱ्या जातिविरुद्ध लढवायचे, दंगली घडवून आणायच्या, जनसामान्यांची घरे उध्वस्त करायची, मग आपणच कसे कैवारी आहोत, हे सांगत पुढे यायचे. असे नेते आज आपल्याला प्रस्थपित राजकीय व्यवस्थेत अनेक दिसतील.
या पार्श्वभूमीवर सामाजिक ध्रुवीकरणाच्या चौकटी पलीकडे जाऊन एखाद्या पीडित समुदायाला किंवा समाजाला न्याय देण्याची प्रामाणिक भूमिका घेणारे छत्रपती संभाजीराजे वेगळे ठरतात.
मी वर उल्लेख केल्याप्रमाणे, मराठवाडा विद्यापीठाच्या नामकरण प्रकरणाची आठवण जरी झाली, तरी मन विषण्ण झाल्याशिवाय राहत नाही. प्रश्न अत्यंत साधेपणाने सुटू शकला असता. परंतु सत्तेवर असणाऱ्यांनी स्वतःची मतपेटी सुरक्षित करण्याच्या उद्देशाने, लोकांना विश्वासात न घेता एक प्रस्ताव ठेवला. त्यानंतर दुसऱ्या एका पक्ष प्रमुखाला वाटले की ही चालून आलेली संधी आहे. आता जातीय तेढ निर्माण होणारच आहे, तर आपण आपल्या पोळ्या भाजून घ्यायच्या. म्हणून शेकडो लोकांचे प्राण घेतले गेले. जाळपोळ दंगली घडवून आणल्या गेल्या. मराठा समाज विरुद्ध दलीत अशी सरळ सरळ मांडणी केली गेली. मतपेट्या भरून घेतल्या गेल्या. परंतु आजही आमच्या मराठवाड्यात जातीय विद्वेशाची जखम पूर्णपणे भरून आलेली नाही.
मला इथे एक मुद्दा निश्चित सांगावा वाटतो. छत्रपती संभाजीराजांच्या नेतृत्वात शिव शाहू दौरा झाला होता. संभाजीराजेंना महाराष्ट्राची तोंडओळख त्याच काळात झाली. खेडेकर साहेबांच्या मराठा सेवा संघाने हा दौरा यशस्वी करण्यात मोठी भूमिका निभावली. शेकडो कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. सांगायचा मुद्दा असा की, त्यावेळी संभाजीराजे म्हणत असत, की मी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बाहेर पडलो आहे. का? तर राजर्षी शाहू महाराजांनी सर्वात पहिल्यांदा बहुजन समाजाला आरक्षण देताना, मराठा समाजाचाही त्यात समावेश ठेवला होता. मी केवळ मराठा समाजासाठी नाही तर बहुजन समाजाला एका छताखाली आणण्यासाठी बाहेर पडलो आहे, असे राजे भाषणात बोलत असत. पण मराठवाड्यातील मराठा समाजाला बहुजन शब्द सुद्धा उच्चारलेला चालायचा नाही. हे मराठा समाजाचे आहेत का बहुजन समाजाचे आहेत? असे प्रश्न केले जात. मराठवाड्यात बहुजन शब्दाचा अर्थ आम्हाला केवळ दलीत समाज असाच माहिती होता. त्यात आमची काहीच चूक नव्हती. कारण आमच्या मस्तकामध्ये जातीय विष पेरून ठेवले होते. कोण? तर मतपेटी चे राजकारणाने.
तेंव्हा पासून आजपर्यंत संभाजीराजे महाराष्ट्रभर फिरत आहेत. मराठा आरक्षणाचे पोस्टर बॉय आहेत. आजही संभाजीराजे आपल्या भाषणात नेहमीच मी बहुजनांचे नेतृत्व आहे हे सांगत असतात. पण आता लोकांची मानसिकता बदल होत आली आहे. खेडेकर साहेबांच्या चळवळीतून तयार झालेल्या अनेक वक्त्यांनी सुद्धा यात योगदान दिले आहे, हेही नमूद करतो.
पुढे मी जेंव्हा संभाजीराजे सोबत जुडलो तो काळ आणि परिस्थिती वेगळी होती. भूमी सुद्धा वेगळी होती. संभाजीराजेंची आणि माझी महाराष्ट्राबाहेर राजधानी दिल्ली मध्ये भेट झाली, ते खासदार संभाजीराजे छत्रपती बनून आल्यानंतर. मी त्यांचा सचिव म्हणून काम पाहू लागलो.
त्यानंतर मला महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळी ची पुसटशी ओळख व्हायला लागली. पुरोगामी कोण? प्रतिगामी लोक कोण? हे मला समजून घेता येऊ लागलं. आजही माझी ठाम समजूत आहे, की वरीलपैकी दोन्ही शब्द हे केवळ शब्दछलासाठी वापरले जात आले आहेत. आजही केवळ राजकीय गणिताच्या मांडणी करिता या दोन शब्दाना वापरले जाते. एका जाती विरुद्ध दुसरी , एका संस्कृती विरुद्ध दुसरी अशी स्पष्ट लढाई आपल्याला दिसून येते. त्यांना नेमकेपणाने समजून घ्यायची कुणाचीही तयारी नाही. समाजाच्या उत्कर्षासाठी, समाजरचनेत खरोखर बदल करून त्यांच्या उद्धारासाठी कुणीही धडपडताना दिसत नाही. पण संभाजीराजेंनी जी मध्यममार्गी समाज बांधणीची भूमिका ठेवली ती मला जास्त प्रागतिक, उपयुक्ततावादी वाटते. शिवाजी महाराज शाहू महाराज हे समाज क्रांतिकारी महापुरुष होते, त्यांनी राष्ट्राची, राष्ट्र बांधवांची एकी निर्माण करण्यात आयुष्य पणाला लावले. ही खूणगाठ मनाशी बांधून आपले सामाजिक राजकीय जीवन पुढे घेऊन जाणारे संभाजीराजे दिसून आले.
भीमा कोरेगाव दंगली वेळी सर्वच राजकीय पक्ष जेंव्हा आपापली गणिते साधण्यासाठी सरसावून पुढे येऊ लागली. तेंव्हा संभाजीराजे ठामपणे पण त्यांच्या विनम्र भूमिकेने पुढे आले. सर्वांना शांततेचे सामोपचाराचे आवाहन केले. मला आठवतंय संभाजीराजेंनी शून्य प्रहरात संसदेमध्ये सुद्धा महाराष्ट्राला उद्देशून भाषण केले. त्यादिवशी पासून गणितं वेगळी दिसायला लागली. काही मातब्बर राजकीय लोकांनी सुद्धा आपापल्या भूमिकेत बदल करायला सुरुवात केली. अन्यथा महाराष्ट्रात आजही ती आग विझली नसती.
५ मे ला सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण काढून घेतले. त्या दिवशी सुद्धा महाराष्ट्र पेटला असता. कारण ज्या व्यक्तीने मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेतली होती. त्यांच्या जतीबाबत सर्वच जनतेला माहिती झाली होती. विद्यापीठाच्या नामकरण चा सामान्य मराठ्यांच्या जीवनात कसलाच फरक पडला नसता. तो केवळ अस्मितेचा प्रश्न केला गेला आणि महाराष्ट्र पेटला होता. पण आजच्या निकालाने प्रत्येक मराठ्याच्या जीवनात थेट फरक पाडणार होता. तरीही महाराष्ट्रात कसलीही प्रतिक्रिया उमटली नाही. का? तर संभाजीराजेंनी केलेले शांततेचे आवाहन. महाराष्ट्र दंगलीच्या आगीत झोकून देणे सहज शक्य झाले असते. पण समोर समाजाचा जो नेता होता तो नैतिकतेने परिपूर्ण होता. त्याला स्वतःचे राजकारण किंवा राजकिय भवितव्य सुरक्षित करायचे नव्हते. रस्त्यावर उभे राहून जाळपोळ करून, सरकारी संपत्तीचे नुकसान करणे कुणालाही अवघड नाही. पण संभाजीराजेंनी संपूर्ण सूत्रे हाती घ्यायला सुरुवात केली. पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढला. लोकांना वेठीस न धरता, वेगळ्या अनोख्या पद्धतीने आंदोलन करून, प्रसंगी आक्रमक भाषेत बोलून सरकार ला धारेवर धरले.
सर्व राजकीय पक्षांना त्यांच्या जबादारीपासून पळवाट काढायची संधी दिली नाही. त्यांना लोकांसाठी जमिनीवर आणले. मूक आंदोलन हे, नवीन हत्यार उपसले. यावेळी प्रकाशराव आंबेडकरांची उपस्थिती संपूर्ण महाराष्ट्र भर नव्हे तर देसभर चर्चेचा विषय ठरली. ही किमया फक्त संभाजीराजे साधू शकले. सरकारला चर्चे साठी बोलावून घ्यावे लागले. बऱ्याच लोकांना वाटून गेले की राजेंनी सरकार ला असेच ठोकत राहिले पाहिजे. परंतु संभाजीराजेंनी चर्चेचे एक दार उघडे ठेवले. राजकारण करण्याची संधी उपलब्ध असताना सुद्धा समाजहित डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचा पर्याय राजेंनी निवडला. यातच छत्रपती संभाजी राजेंच्या वेगळ्या विश्वासाचे कसोटीवर टिकणारी राजकीय मांडणीची झलक दिसून येते.
(योगेश केदार हे मुक्त लेखक आहेत. दिल्लीत १० वर्ष वास्तव्य केल्यामुळे राजकारणाची आवड आणि त्यातून निर्माण झालेली सामाजिक समज यामुळे ते लिहिते झाले आहेत. गेली पाच वर्षे संभाजीराजांच्या सोबत काम केल्यामुळे छत्रपती संभाजी राजेंची त्यांच्या राजकीय वाटचालीची वास्तवदर्शी माहिती ते देत असतात.)
संपर्क 9013181308
ट्विटर @yskedar2