मुक्तपीठ टीम
पूर्वीच्या काळी विज्ञान तेवढं प्रगत नव्हतं तरी ज्ञानाची कमतरता नव्हती. आपले शेतकरीही शेतीसाठी आणि त्यातून मिळालेलं धान्य साठवण्यासाठी खूप वेगळं तंत्र वापरत असत. पेव म्हणून ओळखली जाणारी धान्य व्यवस्था तशी आपल्या माहितीतीलच. ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमधील एका शेतात भूमिगत धान्य कोठार सापडले आहे. त्यातून त्या काळातील साठवणूक व्यवस्थेचं वेगळपण दिसून येत आहे. तसेच या जुन्या कोठाराच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशैलीमुळेही ते खूपच लक्षवेधी ठरले आहे.
आपल्या राज्यातील घाटावरील भागात धान्य साठवण्यासाठी जशी भूमिगत कोठारे असतात, तशा पद्धतीचे हे भूमिगत धान्य कोठार आहे. मुरबाडच्या भांगवाडीतील जयवंत लोभी या आदिवासी शेतकऱ्याच्या शेतात हे कोठार सापडलं आहे. सात फुट खोल आणि चार फुट रूंदीचे हे गोदाम आहे. धान्य साठवण्याच्या या भुमिगत गोदामांना पेव म्हटले जाते. कोकणात अधिक पाऊस पडत असल्याने पेवऐवजी धान्य साठविण्यासाठी बांबूच्या कणग्या वापरल्या जातात. त्यामुळे मुरबाडच्या शेत जमिनीत सापडलेल्या या गोदामाविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मुरबाडचं भूमिगत धान्य कोठार हे वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशैलीचा नमुना
• मुरबाडच्या भांगवाडीतील जयवंत लोभी या आदिवासी शेतकऱ्याच्या शेतात हे कोठार सापडलं आहे.
• सात फुट खोल आणि चार फुट रूंदीचे हे गोदाम आहे. धान्य साठवण्याच्या या भुमिगत गोदामांना पेव म्हटले जाते.
• कोकणात अधिक पाऊस पडत असल्याने पेवऐवजी धान्य साठविण्यासाठी बांबूच्या कणग्या वापरल्या जातात.
• त्यामुळे मुरबाडच्या शेत जमिनीत सापडलेल्या या गोदामाविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मुरबाडचे तहसीलदार अमोल कदम, यांनी घटनास्थळी भेट दिली. या भुमिगत गोदामाची पाहणी केली. या गोदामाची छायाचित्रे आणि मोजमापे घेऊन पुरातत्त्व विभागाला कळविण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे धान्याचे कोठार घरात अथवा अंगणात असते. मुरबाडमध्ये सापडलेले हे भूमिगत गोदाम चक्क शेतात आहे. या गोदामाची बांधणी अतिशय उत्तम आहे. त्यावरून स्थानिक लोकांच्या ठायी असणाऱ्या अभियांत्रिकी कौशल्याची प्रचिती येते.
भूमिगत कोठारं कशासाठी असावीत?
• धान्य साठवण्यासाठी पूर्वीच्या काळी कोणत्याही कृत्रिम रसायनांचा वापर केला जात नसे, त्यामुळे ते साठवून ठेवणे हे कौशल्याचे काम होते.
• शेतकरी त्यासाठी कणग्या वगैरे वापरत पण मोठ्या प्रमाणावर साठवण्यासाठी अशी भूमिगत कोठारे बनवत असत.
• स्थापत्य शास्त्राचा वापर करुन गावातीलच बलुतेदार ते बनवत असत.
• त्यांच्या रचनेमुळे त्यांच्याकडे दुसऱ्यांचे लक्ष जात नसेच, पण नैसर्गिक प्रकोपापासून ते सुरक्षित राहत असे.
• परकीय आक्रमक शेतकऱ्यांना लुटत असत. त्यांच्यापासूनही धान्याचे रक्षण होत असे.
• सरंजामी पद्धतीत जमीनदार मंडळी शेतकऱ्यांचे शोषण करीत असत, त्यांच्यापासून धान्य लपविण्यासाठी ही क्लुप्ती वापरली जात असावी.
• जमीनदार शेतकऱ्याने पिकवलेले धान्यापैकी, त्यांच्यासाठी तुटपुंजे धान्य ठेवून बाकी सर्व शेतमाल बैलगाडीतून भरून घेऊन जात.
• त्यामुळे जमीनदार अथवा त्याच्या माणसांच्या लक्षात येणार नाही, अशी शेतातच धान्य लपविण्याची ही व्यवस्था असावी, असा अंदाज व्यक्त केला जातोय.