मुक्तपीठ टीम
कोरोना संकटात ज्यांच्याकडे देवापेक्षाही जास्त श्रद्धेने लोक पाहू लागली ते म्हणजे आपले आरोग्य रक्षक डॉक्टर. त्यातच एक नाव सारखं समोर येत होतं, ते डॉ. अविनाश सुपे यांचं. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून सतत, अविरत आणि अथक आरोग्य सेवेत झटणारे डॉ. अविनाश सुपे यांचं आणखी एक वेगळंपण आहे. ते गेली अनेक वर्षे सातत्यानं रक्तदान करतात. त्यांनी नुकतेच १२५व्यांदा रक्तदान केले आहे.
डॉ. अविनाश सुपे यांना केंद्र सरकारने शतकवीर रक्तदाता म्हणून गौरवले आहे. त्यानंतरही ते थांबले नाहीत. आजवर त्यांनी १२५ वेळा रक्तदान केले आहे. सध्या सुरु असलेल्या रक्तदान सप्ताहात केवळ सांगत न बसता डॉ. सुपे यांनी आपलं सव्वाशेवं रक्तदान केलंय. वयाच्या पासष्टीतील डॉक्टर सुपेंचं रक्तदान करतानाचं छायाचित्र व्हायरल झालं आणि त्यांचा रक्तदानासाठी आवाहन करणारा संदेशही हजारोंच्या मनाला भिडला. त्यांनी म्हटलं, हे कदाचित माझं सेकंड लास्ट रक्तदान असेल. यानंतर मी एकदाच रक्तदान करू शकेन. तुम्ही मात्र नियमितपणे रक्तदान करा. दर तीन महिन्यांनी रक्तदान करणे म्हणजे दुसऱ्यांचे प्राण वाचवणे.
आजवर मिळवलेलं ज्ञान आणि आपल्या अनुभवाचं संचित पुढच्या पिढीला वाटण्यासाठीही डॉ. अविनाश सुपे झटत असतात. त्यांनी केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता व मुंबई मनपाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या असामान्य योगदानामुळे वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या डॉ. बी. सी. रॉय पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आले आहे. डॉ. अविनाश सुपे यांचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लोकल टू ग्लोबल ख्याती मिळवत असताना आपली सामाजिक बांधिलकी ते कधीच विसरले नाहीत. त्यातूनच मग मनपा रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी ते कायम आग्रही राहिले.
सतत अविरत अथक सेवाव्रती
• डॉ. सुपे हे गेल्या तीन दशकांहून अधिक काळ मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापनाचे काम करीत आहेत.
• केईएममधून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी टाटा सोशल सायन्सेसमधून रुग्णालय व्यवस्थापनाची पदव्युत्तर पदवी घेतली.
• अमेरिकेतील शिकागो येथील इलिनॉयस विद्यापीठातून मास्टर्स इन हेल्थ प्रोफेशन एज्युकेशनची पदवी प्राप्त केली.
• सर्जिकल गॅस्ट्रोएंट्रॉलॉजीतील तज्ज्ञ असलेले डॉ. सुपे यांनी पुढाकार घेऊन केईएम रुग्णालयात लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियांना सुरुवात केली.
ज्ञान वाटणारे ज्ञानयोगी
• डॉ. अविनाश सुपे हे केवळ वैद्यकीय विद्यार्थ्यांचेच नव्हे तर व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांचेही आवडते शिक्षक आहेत.
• डॉ. सुपे यांची आतापर्यंत पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
• त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये २६२ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.
• जगभरातील परिषदांमध्ये ३७० हून अधिक वेळा गॅस्ट्रोएंट्रॉलॉजीवर त्यांनी प्रेझेंटेशन दिले आहे.
• अमेरिकेतील ‘फिमर’या संस्थेतून त्यांनी २००२ मध्ये फेलोशिप घेतली.
• डॉ. सुपे यांची असामान्य गुणवत्ता लक्षात घेऊन ‘फिमर’ संस्थेने त्यांच्यावर आशियात वैद्यकीय क्षेत्रातील नेतृत्व घडविण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यांनी अर्थातच ती कुशलतेने हाताळली.
• मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून देशातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय अभ्यासक्रम तयार करण्यातही त्यांचे मोलाचे योगदान आहे.