सुमेधा उपाध्ये / अध्यात्म
योग एक जीवन पद्धती याचा विचार गेल्या भागात केल्यानंतर आज आपण योगाच्या अष्टांगांशी थोडी ओळख करून घेऊया.
योग म्हणजे शारीरिक आणि मानसिक वृत्तींची शुद्धी याकडे महर्षी पतंजलींनी जास्त भर दिलेला आहे. योग म्हणजे केवळ शारीरिक नव्हे तर मन स्थिर राहणे, आत्मिक शुद्धिकरण व्हावे यासाठी आठ प्रकारचे मार्ग नाही तर एकाच मार्गाचे आठ भाग आहेत. त्यांच्यातील योग्य समतोल योगाची निश्चित फळ देणारी आहेत. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधयोड:ष्टांगानि||
ही योगाची आठ अंग आहेत
यम नियम यामुळे योग्यांच्या भावना आणि विषय वासना नियंत्रणात राहतात. आसनांमुळे शरीर निरोगी बलवान होते. निसर्गाच्या समीप जाते. नंतर नित्य सरावानं योग्याची शरीरासंदर्भातील जाणीव कमी कमी होत जाते आणि तो देहभानावर नियंत्रण मिळवतो. यातून आत्म जागृती होते. यम नियम आसन ही तीन अंगं बाह्य आहेत. तर प्राणायाम आणि प्रत्याहार ही दोन अंग साधकांना आपल्या श्वासांवर नियंत्रण मिळवण्यास सहाय्य करतात. ही अंतरंगसाधना यात येतात. धारणा ध्यान समाधी ही अंगं योग्याला आत्म्याच्या केंद्रापर्यंत नेण्यास सहाय्यक होतात. परमात्म्याचा शोध साधक आपल्या अंतरंगात घेतो. आत्मा हाच परमात्मा आहे ही जाणीव पक्की होत जाते.
मनावर नियंत्रण मिळवले की तो राजयोगी होतो. राजयोग याचा अर्थ स्व वर स्वामित्व. पतंजलींनी यास अष्टांगयोग म्हटलं आहे. त्यांच्यामते या आठ टप्प्यांचा योग आहे. यातून स्व वरील प्रभुत्वच महत्वाचं असल्यानं हा राजयोग होय.
यम म्हणजे नैतिक आचरणाचे सिद्धांत. अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य आणि परिग्रह म्हणजे लोभाचा अभाव. हे समाज आणि व्यक्ती यांच्यासाठी नैतिक नियम आहेत. ते मोडले तर समाजात अराजकता वाढून ज्यास दृष्ट प्रवृत्ती म्हणतो त्या वाढण्यास निमंत्रणच दिल्यासारखं आहे. माणसाचे लक्ष या पाच यमांकडे वळवून पतंजलींनी समाजात आदर्श निर्माण करण्यासाठी पहिला पायाच घातला.
यम हे सार्वत्रिक आहेत. मात्र, नियम हे वैयक्तिक आहेत. शौच म्हणजेच स्वच्छता, समाधान तपस् स्वाध्याय आणि भक्ती (ईश्वराप्रती). स्नान वगैरे बाह्य शरीर स्वच्छ ठेवतात तर प्राणायाम अंत:करण शुद्ध करतात. आपण जे अन्न ग्रहण करतो ते ही शुद्ध असावे. अन्नशुद्धी महत्वाची असते. त्याचेही नियम असतात. शरीराची निर्मलता ही निरोगी जीवनासाठी अत्यावश्यक आहे. ही निर्मलता केवळ बाह्यच नव्हे तर आंतरीकही हवी. द्वेष वासना राग काम क्रोध लोभ मद या भावनांचा निचरा करणं मन शुद्ध करणं महत्वाचं.
समाधान हे मनातच झिरपत राहायला हवं. समाधानी वृत्ती असेल तर शांतता लाभते. भेदाभेदामुळे तुलनेमुळे माणसामाणसात तेढ निर्माण होते. ज्याची बुद्धी परमात्म्यात स्थिर झाली आहे अशांच्या मनातील विकार मनातून गेलेले असतात. तेव्हाच शांतताही लाभते.
तपस म्हणजे ध्येयासाठी सतत जागृक राहणं आणि नित्य प्रयत्न करीत रहाणं. कायिक वाचिक आणि मानसिक तपाचा विचार पतंजलींनी केला आहे. तपाने शरीर मन आणि शील यांचे सामर्थ्य योगी वाढवतात.
स्वाध्याय हा स्वत:च्या प्रगतीसाठी स्वत:च करणे आहे. आत्म शिक्षणास फारच महत्व आहे. दुसऱ्यातील चांगले असेल त्याचे अनुकरण करून स्वत:मधील दोष दूर सारणं यालाच अभ्यास म्हणतात. अशी व्यक्ती सतत स्वत:त बदल घडवत असते.
भक्ती परमात्म्यावर विश्वास दृढ होत राहणं. आपले कर्म त्या परमात्म्याच्या चरणी अर्पण करणं. ज्याची परमात्म्यावर श्रद्धा असते ती व्यक्ती कधीच हताश निराश होत नाही. ती नेहमी चैतन्याच्या अनुभूतिने तेजस्वी होत असते. सर्व काही परमात्म्याच्या अधीन आहे हा विश्वास असल्याने ती व्यक्ती कधी कर्तेपणा स्वत:कडे घेत नाही त्यामुळे अहंकार उत्पन्न होत नाही पर्यायाने दु:खही होत नाही.
आसन हे योगाचे महत्वाचे अंग आहे. आसनाने स्थिरत्व येतं. स्थिर आणि सुखमय अशा आसनाने मनाचा समतोलपणा टिकतो. स्थिर आसनाने मनाचे चंचलत्व कमी होते.
प्राणायाम यामुळे आपल्याच श्वासांच्या गतीचे निरिक्षण करायचे असते. वायू हा अत्यंत सूक्ष्म आहे. आपल्या श्वसनामुळे होणाऱ्या सूक्ष्म हालचालिंचा परिणाम आपल्या शरीरातील अनेक कार्यावर होत असतो. आपली फुफुसे हृदय यात प्राणाचा संचार असतो. अपानवायू जो पोटाच्या खालच्या भागात असतो आणि आपल्या शौचातील महत्वाचे कार्य करतो. समान पचन क्रियेला मदत करण्यासाठी जठाराग्नी तेवत राहण्यासही सहाय्य करतो. उदान वायू छातीच्या पोकळीत फिरतो. तो अन्न आत घेण्याची क्रिया नियंत्रित करीत असतो. व्यान सर्व शरीरात व्यापून आहे. त्यामुळे प्राणायामाचा नित्य सराव महत्वाचाच आहे.
प्रत्याहार टप्पा इंद्रीयांना विषय वासनेपासून दूर करणे. विषय वासना व्यक्तिला बहिर्मुख करतात. त्यांना अंतर्मुख करणे म्हणजेच प्रत्याहार. प्रत्याहाराच्या अभ्यासाने योगी ‘स्व’कडे वळण्याचा अभ्यास करतात.
चित्ताची एकाग्रता साधणे म्हणजेच धारणा. एका स्थानावर केंद्रीत करणे. चित्ताची एकाग्रता साधली की योगी सूक्ष्म आणि चंचल मनाचे तंत्र असल्यानं सहज ते नियमित होत नाही. संयत मनाने एकाग्रता साधली तर उत्कृष्ट कार्य होत असतं. त्यामुळे चित्ताची एकतानता महत्वाची. एकाग्रतेशिवाय कोणतेच कार्य सिद्धीस जात नाही. म्हणून प्रत्याहाराचे विशेष महत्व आहे.
प्रत्याहाराच्या सरावानंतर ध्यानाची अवस्था येते. ध्येयाचं चिंतन करता करता जेव्हा त्यात विलिन होतो. ते म्हणजे ध्येय आणि ध्येय साध्य करणारा एकरूप होतो. ती अवस्था म्हणजेच ध्यान. पूर्ण ध्यानावस्था साधली की अन्य कोणत्याच गोष्टीची जाणीव रहात नाही आणि विचारही आत शिरत नाहीत. सरावानं अशी स्थिती होते की ज्याचे ध्यान करतो त्यातच विरघळून जातो. तसाच आकार घेतो.
समाधी हा साधकाच्या शोधाचा अखेरचा टप्पा आहे. ध्यानाची पूर्णावस्था झाली की साधक समाधी अवस्थेत पोहचतो. त्याची इंद्रीये अविचलित असतात. तो जागृतीत असला तरीही जाणीवांच्या पलिकडे गेलेला असतो. त्याच्यात अहंत्व किंवा ममत्व असा भाव उरत नाही. तो पूर्णत:परमात्म्यात मिसळलेला असतो.
म्हणूनच भगवान श्रीकृष्णांनी अर्जूनाला म्हटलेय की जो श्रद्धेने मला भजणारा आणि ज्याचा अंतरात्मा माझ्यात वसत आहे असा योगी सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ आहे. तू योगी हो.
(सुमेधा उपाध्ये या पत्रकारितेतील दीर्घ अनुभवानंतर आता सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत)
Khup chhan lekh