सुमेधा उपाध्ये / अध्यात्म
जून महिना सुरू होताच अलिकडे अनेकांना वेध लागतात ते २१ जूनचे. कारण हा दिवस अंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून ठिकठिकाणी साजरा केला जातो. या दिवसाला आता उत्सवाच रूप आलं. कारण जगभरात ठिकठिकाणी छोटे मोठे कार्यक्रम होतात. सोशल मीडियावर काही आसनांचे फोटो पोस्ट करतात. उत्साहाने योगा क्लासला जाणारे आपल्या थोड्या सोप्या आणि जरा जमणाऱ्या आसनांचे फोटो अपलोड करतात. नंतर पुन्हा सर्व आपापल्या व्यग्र जीवनात गुंततात. नंतर कधी तरी अचानक आठवण होते की आपण योगा क्लासला पैसे भरलेत आणि मग पुन्हा आसनांची कसरत सुरू होते. हे चक्र सुरू राहतं. यातील काही जण आपल्या शरीर स्वास्था बद्दल जागृत असतात. त्यांचा नियमित सराव सुरू राहतो.
या सर्वात खरोखर योग म्हणजे काय? योग म्हणजे केवळ काही ठराविक आसनंच आहेत का? योगिक जीवनशैलीचा खरा अर्थ कोणता? गुरू-शिष्य परंपरा हा या जीवनशैलीचा आधार आहे. योग शिकण्यासाठी गुरूंची आवश्यकता असतेच. सुरूवातीची काही आसनं आणि प्राणायाम शिकवण्यासाठीही गुरूंची आवश्यकता आहेच. कारण एक चूक इथं थेट तुमच्या जीवनमरणाशी गाठभेट करून देऊ शकते. त्यामुळे योग शिकण्यासाठी गुरू असावेत ही प्रथम अटच आहे. तसंच योग साधनेतून आपली आपल्याशी नव्याने ओळख होते. प्रमाणबद्धता निर्मण होत असल्याची जाणीव होते. आपले संपूर्ण शरीर, मन, विचार, चैतन्य या सर्वांच्या शुद्धतेची तयारी यातून होत असते. रोजची योगिक क्रिया ही आपल्यातील एक एक पेशी शुद्ध करत असते. एक नियमबद्धता एक लय आपल्यात निर्माण होत जाते. म्हणूनच योग केल्यामुळे एक लयबद्धता निर्माण होते. आपल्या जीवनासंदर्भात आपल्या प्रमुख वृत्तींना सम असे पैसू आपल्या शरीरात असतात. त्यामुळे उजव्या आणि डाव्या बाजूच्या शरीरांमधील एक सूत्रता; त्यांचा अधिकाधिक सूक्ष्म मेळ घालणे, त्यासाठी प्रयत्न करणे. आपल्या अनिर्बंध अवयवांच्या हालचालींसह वजन व गती यांची जाणीव होत जाते.
योग साधनेत आठ अंगांच्या स्वरूपाला महत्व आहे. योग क्लासला जाणे म्हणजे केवळ ठरावीक आसनं शिकून वाहवा मिळवणं नव्हे. योग ही साधना आहे. योगचा प्रथमदर्शनी अर्थच मुळी जोडणे असा आहे. त्यामुळे पतंजलींनीही परमात्म्याच्या प्राप्तीसाठी असलेल्या साधनांचा उल्लेख करताना अष्टांगयोग महत्वाचा आहे हे स्पष्ट केलंय. यात – यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशा आठ पायऱ्या सांगितल्या आहेत. अत्यंत चिकाटिने आणि निष्ठेने या एक एक पायरीवर चढत जायचे आहे. योगाने स्वत:चा खरोखरच आत्मोद्धार करावयाचा असेल तर या आठ अवस्थांना आत्मसात केल्याशिवाय पर्याय नाही. शरीर आणि मन यांच्यात एकरूपता साधायची असेल. मन एकचित्त करावयाचे असेल तर यम नियम पाळणे अत्यावश्यक आहे. आसनांमळे शरीर निरोगी राहतं आणि बलवान शरीर निसर्गाशी संवादी राहतं. हळू हळू या देहाची जाणीव विरत जाते, म्हणजेच देहावर ताबा मिळवला जातो आणि आत्म्याची जाणीव वाढत जाते. ही तीन अंगे म्हणजे योगाची बाह्य साधना आहे. हा अभ्यास पक्का झाला की जाणीवपूर्वक प्राणायाम आणि प्रत्याहार याकडे मोर्चा वळवायचा असतो. श्वसनावर नियंत्रण मिळवणं आणि मनाला लगाम घालण्याचा सराव सुरू होतो. मोहाच्या विषयांच्या अधिन झालेली इंद्रिये सहज सुटू लागतात. यालाच अंतरंग साधना असं म्हटलं जातं. धारणा, ध्यान आणि समाधी ही योग्याला आत्मजाणीव करून देतात. परमात्म्याचा शोध आकाशात न करता आपल्या आत आपल्या देहांतर्गत करण्याचा ध्यास सुरू होतो. आत्मा हाच परमात्मा ही जाणीव होते. हाच प्रवास अंतरात्मा साधनेचा ठरतो.
अलिकडे योग संदर्भात असंख्य स्वरूपात माहिती उपलब्ध आहे. मात्र, प्रत्यक्षात या आठही अंगांचा सूक्ष्म विचार आणि तेथवर पोहचवणारे गुरू दुर्लभ आहेत. नाथसंप्रदायाने हठयोगाला विशेष महत्व दिलं आहे. गोरक्षनाथांनी याचा प्रचंड प्रसार प्रचार भारतभर केला. त्यामुळे या संप्रदायात असे हठयोगी आजही आहेत. त्यातील काहींचे दर्शन कुंभमेळ्यात होते. मात्र, संसारात राहून हठयोग साध्य करणं तसं कठिणच असतं. त्यामुळे योग जीवन पद्धती कितीही आकर्षक वाटली तरीही त्याच्या योग्य प्रशिक्षणाची आणि अष्टांगांची साधना करणं तितकंच महत्वाचं आहे. योग का शिकत आहोत आणि आपलं ध्येय कोणतं आहे. हे स्पष्ट असेल, परिश्रमांची आणि नियमितपणाची जोड असेल तरच या मार्गावर चालण्यास सुरूवात करावी. चिकाटिनं अंतिम ध्येय प्राप्त करावं.
पुढील लेखात अष्टांगाची ओळख करून घेऊया.
(सुमेधा उपाध्ये या पत्रकारितेतील दीर्घ अनुभवानंतर आता सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत)