मुक्तपीठ टीम
कैलास मानसरोवर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना आता रस्त्यात एक वेगळं मोहत दृश्य दिसणार आहे. त्यांना कैलास मानसरोवर यात्रा मार्गावरील गावांमध्ये सफरचंदाच्या बागा दिसतील. पहिल्यांदाच हिमालयातील दारमा खोऱ्यात शेतकऱ्यांनी व्यावसायिकदृष्ट्या सफरचंद लागवड सुरू केली आहे.
या भागातील गावकरी रॉयल डिलीशियस, गाला अॅपल सारख्या प्रजातींची लागवड करत आहेत. यापूर्वी केवळ व्यास खोऱ्यातील नाभी, कुटी आणि बुंदी या गावातील शेतकरी सफरचंदाची लागवड करीत होते. सीमेचे रक्षण करण्यात गुंतलेली आयटीबीपी थेट गावकऱ्यांकडून सफरचंद खरेदी करत आहे. शेतकरीदेखील सफरचंदांच्या बागायतीसाठी उत्सुक आहेत.
भारत-चीन सीमेला लागून १५०० ते ३२०० मीटर उंचीवर असलेल्या दारमा खोऱ्यातील गावे एका वर्षामध्ये ५ महिन्यांपेक्षा जास्त काळ बर्फाच्छादित असतात. तज्ञांच्या मते, येथे सफरचंद उत्पादनाची मोठी क्षमता आहे. परंतु गेल्या दशकांतील पर्यटन व्यवसायामुळे येथील ग्रामस्थांनी याकडे लक्ष दिले नाही. आता कोरोनापासून बदललेल्या परिस्थितीत लोकांचा कल सफरचंद लागवडीकडे झपाट्याने वाढला आहे.
दहा गावांमध्ये सफरचंदाच्या बागा
• दारमा खोऱ्यात फिलम, बाऊन, मार्छा, सिप्पू, नागलिंग, बालींग, बगलींग, डार, चल आणि सेला येथे सफरचंदाच्या बागांची झपाट्याने वाढ होत आहे.
• सध्या २० हेक्टरपेक्षा जास्त शेतात रॉयल डिलीशियस, गाला अॅपलच्या रोपांची लागवड केली आहे.
• सरकारने हिमाचल येथून सफरचंद बागायती तज्ज्ञांना बोलावून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी, त्यामुळे चांगले उत्पादन येईल, अशी मागणी होत आहे.
आयटीबीपीची गावकऱ्यांसाठी बाजाराची सुविधा
• उच्च हिमालयीन व्यास खोऱ्यात, ४० हून अधिक शेतकरी नाभी, कुटी, बूंदी येथे सफरचंदाची लागवड करतात आणि त्या भागातील भारत-चीन सीमेवर असलेल्या आयटीबीपीला विकत आहेत.
• सफरचंद उत्पादक जीतसिंग म्हणाले की, यामुळे दरवर्षी त्यांना सरासरी ४ ते ५ लाखांचे उत्पन्न मिळत आहे.
• त्याचे इतर सहकारी शेतकरीही सफरचंद लागवडीपासून चांगले उत्पन्न घेत आहेत.